लखनऊ (उत्तर प्रदेश) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने इयत्ता १०वी व १२वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारनेही असेच जाहिर केले आहे. मात्र, निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल गुणवत्ता यादी शिवाय जाहीर केला जाणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या तयारीबरोबरच उत्तर प्रदेश सरकार शालेय शिक्षणासह अन्य कामांवरही सतत नजर ठेवून आहे. यंदा कोरोनामुळे बाधित हायस्कूल आणि इंटरकॉलेजमधील १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी या परिक्षा घेण्यात येणार नाहीत, तसेच निकाल देखील गुणवत्ता यादी शिवाय जाहीर केला जातील, असे निर्देश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून आभासी माध्यमातून (व्हीसीद्वारे) कोविड व्यवस्थापनाची बैठक घेतली. यावेळी योगी म्हणाले की, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण परिक्षा मंडळाने या परीक्षेच्या निकालाची तयारी करावी तसेच निकाल लवकरच तयार करावा. यंदा कोरोना संसर्गामुळे दहावी आणि बारावी परीक्षा होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे गुणवत्ता यादी तयार होऊ नये. याशिवाय तंत्रशिक्षण विभागाने ऑनलाईन परीक्षा घ्यावी. यासह उच्च शिक्षण विभागाला लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
उत्तर प्रदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण परिक्षा मंडळा मार्फत १०० वर्षाच्या इतिहासात प्रथमच १०वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. अशा प्रकारे राज्यातील एकूण ५६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर यूपी बोर्डानेही विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.