मुंबई – राज्यातील दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. या निकालाची माहिती देण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालाची घोषणा केली. यावर्षी दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून त्यात मुलींनी बाजी मारली आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता http: //result.mh-ssc.ac.in या सकेतस्थळावर बघता येणार आहे. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागात कोकणने बाजी मारली आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी आहे. राज्यात केवळ ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे.
नऊ विभागात कोकण विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर पुणे ९९.९६, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अमरावती ९९.९८, नाशिक ९९.९६, लातूर ९९.९६ इतके टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे २७ विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहे. या नऊ विभागात परीक्षेला नोंदणी केलेले एकुण विद्यार्थी १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी होते. त्यात ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. इयत्ता यात मुलांची संख्या ९ लाख ९ हजार ९३१ होती. तर मुलींची संख्या ७ लाख ७८ हजार ६९३ असे एकूण- १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थीप्रविष्ट होते. एकूण आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट आहेत.
या संकेतस्थळावर निकाल
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी ) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http: //result.mh-ssc.ac.in या सकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: //result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळाना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
असा तयार केला परीक्षेचा निकाल
सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इ. ९ वीचा अंतिम निकाल, १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ.१० वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळामार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली.