कोलंबो – भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामध्ये आणखी एक वाईट बातमी आहे. आपल्या शेजारचा देश श्रीलंकेत सर्वात घातक असलेला नवा स्ट्रेन आढळला आहे. या स्ट्रेनची हवेतून उत्पत्ती झाली असून त्याचा संसर्ग हवेतूनच होत आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले नसले तरी हवेतून तुम्हाला संसर्ग होऊ शकतो.
श्रीलंकेमधील जयवर्देनापुरा विद्यापीठातील इम्युनॉलॉजी अँड मॉलिक्युलर सायन्स विभागाच्या प्रमुख निलिका मालाविगे म्हणाल्या, हा स्ट्रेन खूपच सोप्या पद्धतीने आणि वेगाने पसरतो. तो हवेमध्ये एक तासापर्यंत टिकू शकतो. श्रीलंकेत आढळलेल्या आतापर्यंतच्या सर्व कोरोना विषाणूच्या प्रकारांमध्ये हा स्ट्रेन अधिक घातक आणि वेगाने फैलावणार आहे.
श्रीलंकेच्या आरोग्य विभागानुसार गेल्या आठवड्यात नववर्षाच्या सोहळ्यापासून या स्ट्रेनचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देशात सर्वाधिक रुग्ण तरुण असल्याचे आढळले आहे. पुढील आठवड्यापर्यंत हा स्ट्रेन अधिक पसरल्याने तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे आरोग्य अधिकारी उपल रोहाना यांनी सांगितले. कोविडपासून संरक्षण करण्यासाठी ३१ मेपर्यंत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. आधीच्या संसर्गाचे लक्षणे इतके स्पष्ट नव्हते. मात्र आता या स्ट्रेनमुळे संसर्ग अधिक फैलावत असल्याचे चित्र आहे.