इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या श्रीलंकेमधील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक आणि वीज संकटाच्या विरोधात कोलंबोमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी कर्फ्यू मोडून राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर निदर्शने केली. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आधी पाण्याच्या तोफांचा मारा केला आणि नंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
हिसांचार प्रकरणी 54 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. देशातील गंभीर परिस्थिती आणि नागरिकांचा असंतोष पाहता राष्ट्रपती राजपक्षे यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली असून ती तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. श्रीलंका सरकारने राष्ट्रपती निवासस्थानाबाहेर झालेल्या हिंसाचाराला ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले, तसेच हा प्रकार विरोधी पक्षांशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.
देशाच्या पश्चिम प्रांतात मध्यरात्री ते पहाटे 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला असून तो 2 एप्रिलपासून लागू होईल. श्रीलंकेची 22 दशलक्ष लोकसंख्या देखील गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि त्यामुळे वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या देशभरात दररोज 13 तास वीज खंडित होत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.
श्रीलंकेतील अनेक वर्षांतील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या काळात देशभरात अनेक तास वीज खंडित करण्यात आली आहे. उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांची कामेही ठप्प झाली आहेत. याच्या निषेधार्थ नागरिकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर निदर्शने सुरू केली. हळूहळू या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि संतप्त आंदोलकांनी दोन बस, एक पोलिस जीप आणि अनेक मोटार सायकली जाळल्या. या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
श्रीलंकेचे पर्यटन मंत्री प्रसन्न रणतुंगे यांनी सांगितले की, श्रीलंकेची मुख्य समस्या ही परकीय चलनाचे संकट आहे. अशा वेळी देशातील पर्यटनालाही फटका बसणार असून, त्याचे वाईट आर्थिक परिणाम भोगावे लागणार आहेत. जनतेला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण ते सकारात्मक असले पाहिजे. मात्र राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर असे घडले नसावे.