इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांना दागिने विकावे लागत आहेत. गरजेच्या वस्तूंच्या किंमतींमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली असल्याने तेथील नागरिकांवर ही वेळ आली आहे.
कोलंबो गोल्ड सेंटरच्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी दागिने विकावे लागण्याची वेळ आली आहे. श्रीलंकेत असे संकट कधीच पाहिले नाही. श्रीलंकेच्या चलनाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी आणि विक्रेत्यांची संख्या जास्त आहे.
श्रीलंका आजवरच्या सर्वात वाईट आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकन रुपया हे सर्वात कमकुवत चलन बनले आहे. शनिवारी एका श्रीलंकन रुपयाची किंमत ३१५ डॉलर इतकी होती. खाजगी मनी एक्सचेंजेस १ डॉलरसाठी ३४५ – ३८० श्रीलंकन रुपये आकारत आहेत. २४ कॅरेट सोन्याची किंमत २.०५ लाख श्रीलंकन रुपयांवर पोहोचली आहे
अर्थमंत्री अली साबरी म्हणाले की, येत्या सहा महिन्यांत देशाला ३ अब्ज डॉलर्सच्या मदतीची गरज आहे. ते म्हणाले, ‘हे खूप अवघड काम आहे.’ साबरी म्हणाले की, आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चेसाठी तयार आहोत. आंतरराष्ट्रीय सार्वभौम रोख्यांची पुनर्रचना करण्यासाठी, कर्जाच्या पेमेंटवर स्थगिती आणि जुलैमध्ये १ अब्ज डॉलर कर्ज फेडण्यासाठी अधिक वेळ मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या संसदेचे अधिवेशन १९ ते २२ एप्रिल दरम्यान सुरू होणार आहे. ३ एप्रिल रोजी २६ कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. ४२ खासदारांसह सरकार गेल्याने अल्पमतात आले आहे.