इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रीलंकेची अर्थव्यवस्था गाळात रुतत चालली असून, महागाईचा प्रचंड भडका उडाला आहे. परिणामी जनतेमध्येसुद्धा असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष आता आंदोलनाच्या मार्गाने बाहेर पडत आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या हिंसक निदर्शनात पत्रकारांसह जवळपास दहा जण जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांचा पोलिसांशी संघर्ष होऊन जखमी झालेल्या सहा जणांना कोलंबोच्या राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर चार जणांना कलुबोविला येथील कोलंबो साउथ टीचिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माध्यमांच्या वृत्तांनुसार, हिंसक निदर्शनात जखमी झालेले सर्व पुरुष आहेत. यामध्ये बहुतांश पत्रकारांचा समावेश आहे. श्रीलंकेमधील आर्थिक परिस्थितीवर तोडगा काढण्यास अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. यादरम्यान राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनतर्ते पोलिसांशी भिडले.
आंदोलनकर्त्यांच्या जमावाने श्रीलंका लष्कराच्या बस आणि जीपला आग लावली. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी कोलंबोच्या अनेक भागात संचारबंदी लावली आहे. कोलंबो नॉर्थ, कोलंबो साउथ, कोलंबो सेंट्रल आणि नुगेगोडा पोलिस विभागात पुढील सूचना मिळेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे.
https://twitter.com/NewsWireLK/status/1509583276377137166?s=20&t=5__yN9vTbPX2bvRQUhw36A
कोविड महामारीमुळे संपूर्ण जगात पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात झळ सोसावी लागली आहे. आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
सध्याच्या परिस्थितीत श्रीलंकेत परदेशी चलनाची कमतरता भासत आहे. त्यामुळे इंधन, वीज आणि गॅस सिलिंडरचा भीषण तुटवडा जाणवत आहे. श्रीलंकेने आर्थिक सहाय्यतेसाठी भारतासह अनेक मित्र देशांकडून मदतीची मागणी केली आहे. श्रीलंकेत दररोज किमान दहा तास वीजकपात केली जात आहे. लंकेचे चलन आठ मार्च रोजी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत एसएलआर ९० चे अवमूल्यन झाले आहे.
https://twitter.com/Reuters/status/1509766315539673135?s=20&t=5__yN9vTbPX2bvRQUhw36A