विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढाई लढताना आता भारताला रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीचे सहकार्य लाभणार आहे. कोरोना विरोधात लढताना जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे हाच पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर एक्स्ट्राजेनेकाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनसोबत आता स्पुतनिक-५ लसीमुळे लसीकरण अभियानाला वेग येणार आहे.
हैदराबादमधील डॉ. रेड्डी प्रयोगशाळेकडून आयात करण्यात आलेल्या स्पुतनिक लसीचे १.५ कोटी डोस पुढील आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आगामी आठ ते दहा महिन्यात स्थानिक निर्मितीतून आणखी २५ कोटी डोस मिळण्याची सरकारला आशा आहे. भारतात स्पुतनिक लसीचे उत्पादन करण्याच्या भागिदारीला सुरुवात होणार असून, तिचा पुरवठा लवकरच करण्यात येईल, अशी डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेला आशा आहे.
परंतु रशियाने सुद्धा अद्याप आपल्या लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात डोसचे उत्पादन केलेले नाही. ही लस बनविणे अवघड आहे. कारण दोन वेगवेगळ्या शॉट्समध्ये तिचे उत्पादन केले जाते. त्यामुळे तिचे उत्पादन करण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.
कधी उपलब्ध होणार
जूनच्या मध्यापर्यंत लसीचे डोस लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. डॉ. रेड्डीजने गेल्या आठवड्यात लसीचे लोकार्पण केले. शुक्रवारी फक्त एकाच व्यक्तीला डोस देण्यात आला. डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे कस्टम फार्मा सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड दीपक सपरा यांना हैदराबाद येथे पहिला डोस देण्यात आला.
किंमत किती
सुरुवातीला लसीची किंमत ९९५.४० रुपये प्रति डोस ठरविण्यात आली आहे. त्यामध्ये ५ टक्के जीएसटीचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे ही लसीचा एक डोस ९९९ रुपयांना मिळणार आहे. परिणाम दोन डोससाठी १९९८ रुपये मोजावे लागणार आहेत. स्थानिक पातळीवर लसीचे उत्पादन झाल्यावर तिची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
प्रथम कुठे उपलब्ध होणार
स्पुतनिक-व्ही प्रथम ३५ शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. बहुतांश महानगरांमध्ये आणि ठरवलेल्या इतर शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. लसीला १८ डिग्री सेल्सिअस तापमानात साठवण्याची गरज आहे. या गरजेनुसार शहरांची निवड करण्यात येणार आहे. या प्रकरची व्यवस्था असलेल्या रुग्णालयांचीच निवड करण्यात येणार आहे. लसीला २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात साठविण्यासाठी फ्रीज-ड्राय फॉर्मच्या मंजुरीसाठी डॉ. रेड्डी प्रयोगशाळेकडून मागणी करण्यात येत आहे.
कोविन अॅपमध्ये नोंदणी
व्यापक प्रमाणात उत्पादन झाल्यानंतर स्पुतनिक लसीसाठी कोविन साइट आणि आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी करता येणार आहे. कोविन साइट आणि आरोग्य सेतू अॅपवर स्पुतनिकची नोंद तिसऱ्या स्थानावर करण्यात आली आहे.
किती परिणामकारक
स्पुतनिक-५ चे उत्पादन करणाऱ्या कंपनीचा दावा आहे की, लस ९१.६ टक्के परिणामकारक आहे. इतर आकडेवारीमध्ये कोविड विरोधात या लसीला उच्च परिणामकारकतेच्या श्रेणीत जागा देण्यात आली आहे.
स्पुतनिक लाइट
रशियाने कोरोनाला मात देण्यासाठी स्पुतनिक ५ या लशीचे उत्पादन सर्वात प्रथम केले होते. याच लशीचे नवे व्हर्जन स्पुतनिक लाइट आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्पुतनिक लाइटच्या यशस्वीतेचे प्रमाण ८० टक्के आहे. लशीचा एक सिंगल शॉट (डोस) पुरेसा आहे. स्पुतनिक लाइटच्या आयातीसाठी डॉ. रेड्डी प्रयोगशाळा जूनमध्ये भारतीय नियमकांशी चर्चा करणार आहे.
रशियामधील लसीकरण
स्पुतनिक ५ चे २३ लाखांहून कमी डोस रशियाच्या लोकांना देण्यात आले आहेत. १२ मेपर्यंत रशियाने स्पुतनिक व्हीचे फक्त ३३ लाख डोसचे उत्पादन करण्यात आले होते. तसेच १५ लाखांहून कमी डोसची निर्यात करण्यात आली आहे. लसीच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असून, काही आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.