पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी सहायक कुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर कॅम्पससाठी आवश्यक मनुष्यबळाचा विस्तृत प्रस्ताव शासनाला पाठवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक उपकेंद्रात लवकरच बॅचलर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन (BBA) अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषेदेचे सदस्य आणि नाशिक उपकेंद्र विकास समन्वय समितीचे निमंत्रक सागर वैद्य यांनी सदरचे प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर केले होते. या विषयांना विद्यापीठाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच, नाशिक उपकेंद्रात लवकरच बॅचलर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन (BBA) अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. BBA अभ्यासक्रम सुरू करण्यासही विद्यापीठाने तत्वतः मंजुरी दिली आहे. अकॅडमीक काऊन्सिल सह संबंधित विभागांकडून प्रक्रिया पार पाडून लवकरच नाशिक उपकेंद्रात ३ वर्ष कालावधी असलेला BBA अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
अनेक कामांसाठी नाशिक जिल्ह्यातील २००पेक्षा अधिक महाविद्यालय आणि हजारो विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठात काही न काही कामांसाठी नियमित पुणे विद्यापीठात पायपीट करावी लागते. काही पदांची भरती नाशिक उपकेंद्रात केल्यास नाशिककरांची ही परवड थांबेल आणि वेळ,श्रम पैशाची बचत होईल. सहायक कुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली तरी ४० टक्के कामे नाशिकमधून होऊ शकतील असा प्रस्ताव सागर वैद्य यांनी मांडला होता. त्यामुळे या पदाला तत्काळ मंजुरी देण्यात आली. या पदभरतीची प्रक्रिया विद्यापीठ सुरू करीत आहे.
तसेच, भविष्यात नाशिक कॅम्पस अधिक सक्षम करण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. सदर मनुष्यबळ भरतीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यासाठी एक विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या समितीत सागर वैद्य यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. राजेंद्र विखे पाटील, श्री. संदीप पालवे, विद्यापीठाच्या अधिकारी श्रीमती वैशाली साकोरे यांचा समावेश करण्यात आला आहे. Pumba च्या मॅनेजमेन्ट अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. MBA पाठोपाठ BBA चा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाने सुरू करावा ही मागणी अनेक वर्षापासून केली जात होती.
SPPU Pune University Nashik Sub Centre New Course