पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे, नाशिक आणि नगर या तीन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फक्त या जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यापीठाने प्रचंड फी वाढ केल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ही वाढीव फी तातडीने कमी करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. या संदर्भात अनेक वेळा आंदोलन करूनही निर्णय झाल्याने आता पुन्हा एकदा ११ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.
विद्यापीठातील शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले असून विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने या आंदोलनाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्याशी चर्चा केली आहे. शुल्कवाढी विरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने शुल्कवाढी संदर्भात चर्चा करत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी कॉफी वीथ स्टुडेंटस् या कार्यक्रमाचे दि. ३ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या करण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक व राजकिय संघटनांचे प्रतिनिधी व विद्यार्थी यांच्यामध्ये शुल्क वाढ तसेच इतर विद्यार्थी प्रश्नांवर संवाद व चर्चा झाली आहे.
जबरदस्त फी वाढ
कोरोना काळानंतर विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमांची फी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या फी सोबतच होस्टेल, पुस्तके स्टेशनरी आणि अन्य स्वरुपाच्या खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. अभ्यासक्रमांची फी कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलन करावे लागत असल्याची खंतही व्यक्त होत आहे.
लेखी आश्वासनानंतरही
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शुल्कवाढी विरोधात जुलै महिन्यात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने भर पावसात तीन दिवस आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या मात्र शुल्कवाढीच्या मागण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन देखील अद्याप मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांनी ११ ऑक्टोबरला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने फि वाढ रद्द करा ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या सोबतच इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आहेत मागण्या
विद्यार्थी व विद्यार्थी संघटना यांना असभ्य वागणूक देणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू अशी धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करावी. कमवा आणि शिका योजनेच्या सुट्ट्या रद्द कराव्यात आणि मानधनामध्ये प्रती तास १० रू वाढ करावी. पीएच.डी व पी.जीच्या हॉस्टेलचे वाढीव शुल्क तातडीने पूर्ववत करण्यात यावे. तसेच ते सेमिस्टर वाईज आकारण्यात यावे. पीएचडी प्रवेशित विद्यार्थ्यांना हॉस्टेल देण्यात यावे, विद्यापीठाला पूर्ण कुलगुरूंची नियुक्ती करावी, आदि मागण्यांचा यात समावेश आहे.
अनेकांचा पाठिंबा
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दि.८ ऑक्टोबरला विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे, त्यावेळी आंदोलनांच्या संबंधित आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे समन्वयक तुकाराम शिंदे यांनी दिली. तसेच कॉफी विथ स्टुडन्ट या कार्यक्रमाला बाबा आढाव, असीम सरोदे व इतर समविचारी सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यामुळे शुल्क वाढ आंदोलनाला बळ मिळाले आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
SPPU Pune University Fee Hike Students Agitation
Education