[7/9, 5:37 PM] Sagar Abp:
पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजमधील प्राध्यापकांच्या रजांचा सध्या मोठा गोंधळ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या विषयावरुन कॉलेजपासून ते थेट विद्यापीठापर्यंत वाद सुरू असल्याचेही निदर्शनास येत आहे. प्राध्यापकांच्या रजा संदर्भात परिपत्रक काढावे आणि सुस्पष्टता आणावी, अशी आग्रही मागणी मॅनेजमेन्ट कौन्सिलचे सदस्य सागर वैद्य यांनी कुलगुरूंकडे केली आहे.
सध्या प्राध्यापकांच्या किरकोळ रजांबाबत मोठा गोंधळ आहे. कारण, जुन्या कायद्याप्रमाणे किरकोळ रजा या १५ आहेत. तर, नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे किरकोळ रजा ८ करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नक्की कोणत्या रजांचा अवलंब करावा याबाबत महाविद्यालयीन स्तरावर गोंधळाचे वातावरण आहे. या किरकोळ रजे संदर्भात प्रत्येक विद्यापीठाचे वेगवेगळे नियम आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १५ रजांचा नियम आहे. नव्या शैक्षणिक कायद्याची अंमलबजावणीसाठी पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत जुन्या नियमाप्रमाणे प्राध्यापकांच्या १५ किरकोळ रजा ग्राह्य धराव्या. तसेच या संदर्भात स्पष्ट निर्देश देणारे आपले परिपत्रक काढून स्पष्टता आणावी, अशी विनंती वैद्य यांनी केली आहे.
दरम्यान, या रजांसंदर्भात प्राध्यापक, प्राचार्य, संस्था चालक यांंच्यात गोंधळाचे वातावरण आहे. प्रत्येक जण आपआपल्या सोयीने याचा अर्थ काढून रजेचे धोरण ठरवत आहे. त्यामुळे वादही होत आहेत. म्हणूनच विद्यापीठाने परिपत्रक काढल्यास सर्वांनाच स्पष्टता येणार आहे.