पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या आठवड्यात अश्लील भाषेतील रॅप सॉंगचे शुटींग केल्याचे प्रकरणी शुभम जाधव या तरुणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून शुभम जाधवचे हे रॅप साँग काही दिवसांच्या आधी व्हायरल झाले. त्या गाण्यात काही शिवराळ शब्दांचा वापर करत काही दृश्यांमध्ये शुभमच्या हातात पिस्तूल आणि तलवार सारखी हत्यार दिसत आहे. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केला होता, तर अजित पवार यांनी राज्यपालांना या संदर्भात पत्र लिहिले होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेने देखील रॅप सॉंग प्रकरणी विद्यापीठ परिसरात आंदोलन करीत मोठा राडा घातला. विद्यापीठ प्रशासनाने अश्लील गाण्याचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी कागदपत्रे फाडत ती हवेत फेकत विद्यापीठातील दरवाजे आणि खिडक्यांच्या काचाही फोडल्या. विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या या राड्यामुळे विद्यापीठात मोठी खळबळ उडाली.
महत्त्वाचे म्हणजे राड्यामुळे कुलगुरुंनाही बैठक थांबवावी लागली. सुमारे तासभर या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. विद्यापीठात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड जमाव या बैठकीच्या ठिकाणी शिरला. कुलगुरुंशी कोणतीही चर्चा न करता या आंदोलकांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. खिडक्यांच्या आणि दरवाजाच्या काचा फोडल्या. तसेच तोडफोड करत असताना आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत होते. काहींनी तर बैठकीच्या ठिकाणीच ठिय्या मांडून जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला.
विशेष म्हणजे बैठकीच्या ठिकाणी केवळ ५ सुरक्षा रक्षक होते. त्यांनी या आंदोलकांना अडवले नाही. या सुरक्षा रक्षकांनी कुलगुरूंच्या भोवती संरक्षक कडे केले होते. विद्यापीठात अश्लील गाण्याचे चित्रीकरण झालेच कसे? ज्यांनी हे गाणे चित्रीकरण करण्यास परवानगी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांनी यावेळी केली. आम्ही संवैधानिक मार्गाने आंदोलन करत आहे. आम्ही कोणतीही तोडफोड केली नाही. तसेच कुलगुरू त्याच ठिकाणी बसले आहेत. पण कारवाई करत नाही. त्यामुळेच आम्ही आंदोलन पुकारले आहे, असे एका आंदोलकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून त्या समितीचीच बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर कारवाईबाबतचा निर्णय होईल, असे कुलगुरु कारभारी काळे यांनी स्पष्ट केले.
आज अभाविपच्या वतीने पुणे विद्यापीठ येथे व्यवस्थापन परिषद बैठकीच्या वेळी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले यावेळी माध्यमांसोबत संवाद साधला..!@AbvpPaschimMaha @ChDadaPatil @ABVPPune pic.twitter.com/ijmUXDPsY8
— Adv. Anil Thombare (@AHThombare) April 24, 2023
SPPU Pune University ABVP Protest Crime