इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आज आपण एक वेगळी आणि अनोखी यशकथा जाणून घेणार आहोत. अंतिम पंघल असं तिचं नाव आहे. खरं तर तिच्या कुटुंबात ती नकोशी होती. कारण, सलग तीन मुली झाल्यानंतर वडिलांना मुलाची अपेक्षी होती. पण, झाली मुलगी. सहाजिकच वडिलांसह अनेकांनी निराशा झाली. पण, आज याच पोरीनं त्या कुटुंबाचंच नाही तर भारताचंही नाव उज्ज्वल केले आहे. २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली महिला भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. चला, तर जाणून घेऊया तिच्याविषयी…
भारताची 17 वर्षीय कुस्तीपटू अंतिम पंघलनं इतिहास रचला. बुल्गारियाच्या सोफिया येथील 20 वर्षांखालील कुस्ती जागतिक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. 53 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या अॅटलिन शागायेवाचा 8-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. तसेच 20 वर्षांखालील कुस्ती जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.
2004 सालची ही गोष्ट असून रामनिवास पंघाल आणि कृष्णा कुमारी चौथ्यांदा एका मुलीचे माता-पिता बनले. त्यांनी आपल्या मुलीच नाव अंतिम ठेवलं. याचा अर्थ फायनल किंवा शेवट होतो. पण अंतिमला अंतिम बनायच नव्हतं. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तिने कमाल केली. ‘अंतिम’ अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियन बनणारी पहिली महिला कुस्तीपटू बनली आहे.
17 वर्षांपूर्वी रामनिवास यांनी आपल्या चौथ्या मुलीच्या नावाबद्दल फार विचार केला नव्हता. पण आता मुलीने या नावाची इतिहासात नोंद केली आहे. अंतिमने ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये फक्त गोल्ड मेडलच मिळवलं नाही, तर 53 किलो वजनी गटात तिने वर्चस्व गाजवलं. तिने युरोपियन चॅम्पियन ओलिविया एंडरिचवर टेक्निकल सुपरियोरिटीने विजय मिळवला. एका मिनिटात जापानच्या अयाका किमुराला हरवलं. युक्रेनची नताली क्लिवचुत्सका अशी एकमेव कुस्तीपटू होती, जिने पूर्ण 6 मिनिट अंतिमला लढत दिली. पण अंतिमने तिच्या विरुद्धही विजय मिळवला. फायनल मध्ये तिने कजाकिस्तानच्या अल्टिन शगायेवाला 8-0 ने हरवून इतिहास रचला.
अंतिमच्या वडिलांना 3 मुलींनंतर मुलगा हवा होता. त्यांनी स्वत: ही गोष्ट मान्य केली. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील भागना गावचे ते रहिवासी आहेत. त्या गावात एक प्रथा आहे, तुम्हाला भरपूर मुली असतील, तर त्यांचं नाव तुम्ही अंतिम ठेवू शकता. जेणेकरुन तुम्हाला पुन्हा मुली होणार नाहीत. मुलीच नाव ठेवताना मी त्या बद्दल फार विचार केला नव्हता, असं रामनिवास म्हणाले. तुम्हाला जास्त मुली असतील, तर सांभाळ करणं कठीण असतं. मुलीच्या लग्नाची भीती त्यांच्या मनात होती. पण रामनिवास कधी आपल्या मुलींच्या स्वप्नांच्या आड आले नाहीत. त्यांनी मुलींना पूर्णपणे पाठिंबा दिला.
कुस्ती स्पर्धेत अंतिम पंघलनं सातत्यानं चांगली कामगिरी केलीय. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत अंतिमनं जर्मनीच्या अमोरी अँड्रिचचा क्निकल सुपीरियॉरिटीनं (11-0) पराभव केला. तसेच उपांत्यपूर्व फेरीत जपानची कुस्तीपटू अयाका किमुरा हिचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत युक्रेनच्या नतालिया क्लिव्हचुस्तकाचा 11-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली. सुवर्णपदक सामना जिंकल्यानंतर अंतिम म्हणाली की, ‘मला रेकॉर्डबद्दल माहिती नव्हती. सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रशिक्षकानं मला सांगितले की, ही स्पर्धा जिंकणारी तू पहिली भारतीय मुलगी आहेस. मला कुस्तीमध्ये करिअर करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी माझ्या पालकांचं आभार मानते. विशेषत: दीदीनं (कबड्डीपटू सरिता) मला खूप पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिलं. ऑलिम्पिकमध्येही भारतासाठी पदक जिंकण्याचं माझं ध्येय आहे.
विशेष म्हणजे अंतिमनं यापूर्वी कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप (2021) मध्ये कांस्य आणि आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप (2022) मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. तिनं यावर्षी अंडर 23 आशियाई चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक जिंकलं होते.20 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतानं 12 पदक मिळवली आहेत. अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल अमित शाह यांनी अंतिम पंघालचे अभिनंदन केले आहे.
Sports Wrestler Antim Panghal Success Story