मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादीत करणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत पाचपट वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे १७ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे १० सामने होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत आणि फिफा (१७ वर्षा आतील) महिला फुटबॉलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना यश संपादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – २०२२ मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ध्वज प्रदान आणि १७ वर्षाखालील मुलींची वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा – २०२२ यजमान शहर बोधचिन्ह अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा मंत्री गिरीष महाजन, क्रीडा विभागाचे सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे, फिफाचे प्रतिनिधी रोमा खान, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते चिराग शेट्टी, महाराष्ट्र कबड्डी संघाच्या सोनाली शिंगटे यांना ध्वजप्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, फिफा महिला फुटबॉल वर्ल्ड कप सारख्या जागतिक दर्जाच्या आयोजनात राज्याने घेतलेल्या पुढाकारामुळे महिला फुटबॉल क्रीडा प्रकाराचा राज्यामध्ये प्रसार होण्यास व महिलांनी या खेळात सहभागी होण्यास उत्तेजन मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी. तसेच, युवकांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतात पहिल्यांदाच फिफा महिला (१७ वर्षाखालील) फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यजमान पद राज्याला मिळाल्याचा आनंद असल्याचे सांगून या स्पर्धांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-२०२२ गुजरात येथे २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील ७ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये राज्यातील ८०० खेळाडूंचे पथक रवाना होणार असून, ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे हे पथक प्रमुख असणार आहेत. कबड्डी, खो-खो, हॉकी, स्केटिंग, कुस्ती, मल्लखांब, फुटबॉल, वॉटरपोलो, बॉक्सिंग अशा ३४ क्रीडा प्रकारांत सहभागासाठी महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यावश्यक सुविधांसह पूर्व प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
क्रीडा मंत्री गिरीष महाजन म्हणाले, राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत वाढ केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना १० लाख रूपये देण्यात येत होते. आता ती रक्कम ५० लाख एवढी करण्यात आली आहे. रौप्य पदक विजेत्यांसाठी ७.५० लाखाऐवजी ३० लाख, तर कास्यपदक विजेत्यांसाठी ५ लाखाऐवजी २० लाख रक्कम करण्यात आली आहे. त्यांनीही यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याचबरोबर दि. ११ ते ३० ऑक्टोबर पर्यंत नवी मुंबई येथे फिफा (१७ वर्षाखालील) महिला वर्ल्ड कप इंडिया २०२२ चे आयोजन शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. भारतात हे सामने पहिल्यांदाच होणार असून १२ ते ३० तारखेपर्यंत डी. वाय. पाटील स्टेडियमवर १० सामने होणार आहेत. हे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त खेळाडूंसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन क्रीडा मंत्री श्री. महाजन यांनी केले आहे.
Sports Winner Prize Amount Fifth Times CM Eknath Shinde
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD