नाशिक – नाशिक शहरातील क्रिडा क्षेत्रात एक महत्वपूर्ण योगदान देणारे आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु.स.रुंगटा हायस्कूल नाशिक या शाळेचे क्रिडा शिक्षक प्रशांत शांताराम भाबड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. गेल्या २३ दिवसांपासून ते कोरोनाशी झुंजत होते.
कबड्डी या खेळात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. अत्यंत तळमळीचा क्रिडा शिक्षक व मनमिमाऊ मित्र गमावल्याचे दु:ख नाशिकच्या क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शन केले असून विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. गेले २३ दिवस ते कोरोनाशी झुंजत होते. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे बंधू शेखर भाबड यांनी तशी माहिती दिली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ते अनेक खेळाडू आणि विद्यार्थी यांचे मार्गदर्शक व गुरू तसेच आधारस्तंभ होते. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे, कबड्डी खेळाचे ते उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक होते. मार्गदर्शक, प्रेरणास्थान, मनमिळाऊ नेतृत्व, प्रशांत भाबड यांच्या निधनाने गमावले, अशी भावना अनेक खेळाडू आणि त्यांच्या मित्रपरिवाराने व्यक्त केली आहे.
—
नाशिकमधील प्रख्यात क्रीडा प्रशिक्षक प्रशांत भाबड यांचे दुःखद निधन झाले. कब्बडी क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान होते.नाशिकच्या क्रिडा क्षेत्रातील अनेक खेळाडू आणि विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक होते. नाशिक जिल्हा कब्बडी असोशिएशनमध्ये त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. कब्बडी खेळातील राष्ट्रीय खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले होते. नाशिक फेस्टिव्हलच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. मनमिळावू स्वभावाचे असलेले प्रशांत भाबड यांच्या निधनाने नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मी व माझे कुटुंबीय भाबड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
– छगन भुजबळ, मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री