इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– क्रिकेटच्या मैदानातून –
सत्यजित बच्छावचे ‘सुवर्ण’बळी!
महाराष्ट्राचा आणि नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छावने रणजी क्रिकेमध्ये १०० बळी टिपून विक्रम केला आहे. त्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. सध्या तो आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये सराव गोलंदाज म्हणून कार्यरत आहे. लवकरच तो आयपीएलमध्ये दिसला तर त्यात फारसे नवल वाटणार नाही. त्याच्या या कारकीर्दीचा आढावा घेत आहेत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार दीपक ओढेकर…

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
महाराष्ट्राचा आणि नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव याच्या आयुष्यात आणि नाशिकच्या क्रिकेटच्या इतिहासात १६ डिसेंबर २०२२ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. त्याला कारण तसे आहे. त्याने पुणे येथील एमसीए स्टेडियमवर रणजी कारकीर्दीतील १००वा बळी मिळविला. २०२२/२३ क्रिकेट मोसमातील पहिला रणजी सामना त्याने दिल्लीविरूध्द खेळला. या सामन्यातील चौथ्या आणि अखेरच्या दिवशी उपहारानंतर स्वतःच्या विसाव्या शतकात दिल्लीच्या समरजीत सिंगला पायचीत केले. हाच त्याचा १००वा बळी होता.
अशा रितीने रणजी सामन्यात सत्यजितने आपल्या केवळ २७ व्या सामन्यात बळींचे शतक नोंदविण्याचा महापराक्रम केला. यापूर्वी नाशिकच्या फक्त अन्वर शेखने महाराष्ट्रातर्फे खेळताना असा पराक्रम केला आहे (१४९ बळी ५५ सामने, १९६५ ते ७७) सत्यजित आता महाराष्ट्रातर्फे बळीची शंभरी पार करणाऱ्या पांडुरंग साळगावकर (४८ सामने १५५ बळी), विठ्ठल जोशी (४२ सामने १४२ बळी), निकी सालढाणा (५५ सामने १३८ बळी), सदानंद मोहोळ (२८ सामने ११२ बळी) समद फल्लाह (५५ सामने २१४ बळी) या महान आणि मोजक्या गोलंदजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
नाशिकच्या अविनाश आवारेनेही हा पराक्रम केला आहे पण गोवा संघाकडून खेळताना (२९ सामने १०८, १९९९ ते २००५). अर्थात तो गोवा संघाकडून खेळला म्हणून त्याचा पराक्रम काही कम अस्सल ठरत नाही. तोही पराक्रम तितकाच अमूल्य आहे. सत्यजितने क्रिकेट कारकीर्द नाशिक जिमखाना येथे प्रशिक्षक संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली २००८/९ मध्ये सुरु केली ती जलद गोलंदाज म्हणून. पण संजय मराठे यांच्या चाणाक्ष नजरेने सत्यजितमधील फिरकी गोलंदाज ओळखला आणि त्याला फिरकी गोलंदाज बनवले.
स्थानिक सामन्यांमध्ये सातत्याने दणदणीत कामगिरी केल्याने त्याला २०१२/१३ रणजी मोसमात महाराष्ट्रातर्फे मद्रास येथे तामिळनाडू विरूध्द खेळण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर त्याचवेळी अक्षय दरेकर हा दुसरा डावखोरा स्पिनर संघात सत्यजितपेक्षा चांगली कामगिरी करीत असल्याने २०१८-१९ पर्यंत सत्यजित संघाच्या आतबाहेर राहिला. पण त्यानंतर मात्र सत्यजितने आपले आर्मर हे हुकमी अस्त्र अधिक धारदार बनवून आणि जिद्दीने भरपूर सराव करून जास्तीत जास्त बळी घ्यायला सुरुवात केली. व संघातील जागा पक्की केली.
२०१९ च्या मोसमात तो इंग्लिश वातावरण सराव व्हावा आणि अधिक अनुभव मिळावा म्हणून काही महिने इंग्लंडमधील बी आणि सी डिवीजनचे सामने खेळला. तिथे त्याने आपली गोलंदाजी बरोबर फलंदाजीही चांगल्यापैकी सुधारली. त्याच्या १०० बळीत त्याने सामन्यात १० पेक्षा अधिक बळी एकदा (११ बळी ७० धावात आसामविरूध्द १८ फेब्रुवारी २०२२) मिळविले. तर डावात पाच किंवा अधिक बळी चार वेळा आणि चार बळी सहा वेळा घेतले आहेत. त्याचा रणजीतील बेस्ट आहे ८/१०८ असा आहे. एका मोसमात म्हणजे २०१८/१९ मध्ये सात सामन्यात २८ बळी ही त्याची आतापर्यंतची उत्तम कामगिरी आहे. त्यात एका डावात ७ बळी दोनदा!!
त्याला शंभरावा बळी घ्यायला सामन्याच्या चवथ्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागली. कारण पुणे येथील हवामान हे चारही दिवस जलद गोलंदाजाना जास्त पोषक होते. आणि महाराष्ट्राचे चारही जलदगती गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी करीत होते. आपल्या धारदार गोलंदाजीने तो आता संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज झाला आहे. महाराष्ट्र संघ इलाईट म्हणजे अव्वल गटात असल्याने त्याला अव्वल संघाविरूध्द आपले कौशल्य दाखविण्यासाठी आणि बळीची संख्या वाढविण्याची भरपूर संधी आहे. तसेच आयपीएल मध्येही संधी मिळू शकते. सत्यजित सध्या चेन्नई सुपर किंग्ज मध्ये सराव गोलंदाज आहे.
Spinner Satyajit Bacchav 100 Wickets Record by Deepak Odhekar
Nashik Cricket Ranaji Maharashtra Sports