नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – विमान प्रवास हा अत्यंत धोकादायक मानला जातो. कारण या प्रवासात सर्व काही आकाशात अधांतरी असते. त्यामुळे बहुतांश प्रवासी हे जीव मुठीत धरूनच प्रवास करत असतात. दिल्ली विमानतळावर सोमवारी एक धोकादायक दुर्घटना टळली. दिल्लीहून जम्मूला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेले स्पाईसजेटचे विमान उड्डाणाच्या आधी विजेच्या खांबाला धडकले. त्यामुळे विमान आणि खांबाचे दोन्ही नुकसान झाले.
पुशबॅक दरम्यान, म्हणजेच विमान प्रवासी टर्मिनलवरून धावपट्टीकडे वळवले जात असताना ही टक्कर झाली. याबाबत स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, आज स्पाईसजेटची फ्लाइट एसजी 160 दिल्ली आणि जम्मू दरम्यान चालणार होती. पुशबॅक दरम्यान, उजव्या बाजूचा मागचा कोपरा खांबाच्या जवळ आला, ज्यामुळे आयलरॉनचे नुकसान झाले. उड्डाणासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या घटनेनंतर विमान वळवण्यात आले असून प्रवाशांना दुसऱ्या फ्लाइटमध्ये हलवण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सोमवारी स्पाइसजेटने गोरखपूर-वाराणसीसह सात उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे याचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले. स्पाइसजेटने प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत गोरखपूर-वाराणसी फ्लाइट सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय हैदराबाद-पुडुचेरी-हैदराबाद, वाराणसी-कानपूर-वाराणसी आणि वाराणसी-पाटणा पर्यंत उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘उडान’ योजनेअंतर्गत ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.