विशेष मुलींचे विशेष ‘घरकुल’
– अशोक पानवलकर (ज्येष्ठ पत्रकार)
‘घरकुल’ च्या संकेतस्थळावरील पहिलेच वाक्य या प्रश्नाची भयाणता दर्शवते. कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरातले पती – पत्नी असोत, त्यांना आपले मूल कोण्याही व्यंगाशिवाय, कोणत्याही त्रासाशिवाय जन्माला यावे असे वाटत असते. तसे कोणत्याही आजाराविना ते मूल जन्माला आले की जे समाधान, आनंद मिळत राहते त्याचे शब्दात वर्णन करता येण्यासारखे नसते. ‘घरकुल’चे संकेतस्थळ सांगते की भारतात दोन टक्के लोकसंख्येला हे सुख मिळत नाही. तो आनंद उपभोगता येत नाही. भारताची लोकसंख्या लक्षात घेतली तर ही संख्या किती असेल याची कल्पनाच केलेली बरी.
या Mental Retardation चे अनेक प्रकार आहेत, अनेक कमी अधिक परिणाम आहेत, हा प्रकार बरा होण्याची शक्यता, ती व्यक्ती त्यातून बऱ्यापैकी सावरण्याची शक्यता अथवा तसे सावरणे शक्य नसेल तर आहे त्या परिस्थितीत त्या व्यक्तीचे (व कुटुंबातील इतरांचेही) जगणे जरा तरी सुसह्य व्हावे यसाठीचे प्रयत्न हा सगळा प्रकार खूप गुंतागुंतीचा आहे. या आजाराच्या लोकाना केवळ सहानुभूती नको असते, हवा असतो तो किमान सन्मानजनक जगण्यासाठी एक मदतीचा हात, योग्य वैद्यकीय आणि कौटुंबिक मार्गदर्शन. अनेक कुटुंबांना यश लोकांचे पालनपोषण, सगळं खर्च परवडणारा असतोच असे नाही. मुलीनाहा आजार असेल तर त्यांचे अधिक आणि वेगळे प्रश्न निर्माण होतात. पालक हयात असेपर्यंत त्यांना शक्य असेल ते सर्व करतात, परंतु त्यांच्या निधनानंतर या मुलींचे / प्रौढ स्त्रियांचे काय हा मोठा प्रश्न आज समाजात आहे. तो फक्त काही घरांपुरता आहे, आपल्याला काय त्याचे असे समजून दुर्लक्षित करून चालणार नाही.
अशा आजाराच्या लोकाना काय आवश्यक असते? योग्य देखभाल, पुरेसा सन्मान, जगण्यासाठी सोपे व छोटे काम करण्याची क्षमता आणि आपल्यालाही घरात, समाजात स्थान आहे ही जाणीव. आपण घराला / समाजाला डोईजड झालो आहोत ही जाणीव देखील त्यांचा आजार बळावू शकते आणि त्यातून अधिक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्यासाठी महाराष्ट्रात / देशभरात अनेक संस्था काम करत आहेत. सरकारी पातळीवर आणि खासगी एनजीओ म्हणूनही. प्रत्येकाची क्षमता आणि परिणामकारकता वेगवेगळी असली तरी त्या सर्वांची आवश्यकता आज आहेच, खूपच आहे. नाशिकमधल्या ‘घरकुल’ने यातला आपला खारीचा वाटा उचलला आहे. तोही अगदी प्रभावीपणे. सतरा वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही एनजीओ आज १८ ते ६३ या वयोगटातील महिलांसाठी मोठा आधार झाली आहे. दोनचार नव्हे, तर साठ महिलांसाठी. त्यांना भेटल्यावर कोणीही सहृदयी माणूस सध्याच्या आभासी जगामधून बाहेर येईल.
या महिलाना भेटून काय जाणवते? त्यांना ‘मतिमंद’ का म्हणायचे हा प्रश्न पडतो. एखादी महिला कुकसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता खणखणीत म्हणून दाखवते, एखादी मुलगी दुसरी कविता म्हणून दाखवते, एखादी चित्रकलेत पारंगत असल्याचे दिसते, एखादी वा काही कंदील बनविण्यात पारंगत असतात असे दिसते, काहीजणी गणपतीची सुंदर मूर्ती बनवतात, कोणी गोधड्या तयार करतात, कोणी नृत्य उत्तम करतात, कोणी आलेल्या पाहुण्यांसाठी छान शुभेच्छा पत्र तयार करून देतात, कोणी अप्रतिम वारली पेंटिंग करतात, कोणी पेनाचे aseembling करून देतात. थोडक्यात, प्रत्येकीच्या क्षमता इथे दिसतात. गरज असते ती त्यांच्या कौतुकाची. प्रत्येकजण सगळी कामे करू शकत नाहीत हे उघड आहे, परंतु प्रत्येकीतील कौशल्य ओळखून तिला ते करायला सांगणे हा महत्वाचा भाग असतो. येणाऱ्या पाहुण्यासामोर आपली कला सादर करण्यासाठी सगळ्या उत्सुक असतात आणि एखादीला संधी मिळाली नाही तर त्या हळूच तक्रार करतात ही बाब त्यांच्यातला कमालीचाआत्मविश्वास दर्शवतात. ‘आम्ही काहीतरी करू शकतो, त्यातून आनंद घेऊ शकतो आणि तुम्हालाही देऊ शकतो’, ही भावना त्यांच्या असणे, तिला योग्य वाव मिळणे आणि त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत जाणे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. याच मुलीना नाही, तर सर्वानाच.
‘घरकुल’मधील महिलांमध्ये हा आत्मविश्वास एक दिवसांत आलेला नाही. ‘बदल एक दिवसात होणार नाही, पण एक दिवस जरूर होईल’, या तत्वाला खूप मोठा अर्थ आहे. ते होण्यासाठी संस्थेच्या सचिव विद्याताई फडके यांना या मुलींच्या ‘आई’ व्हायला लागले, सगळ्या स्वयंसेविकाना, शिक्षिकाना ‘ताई’ /’मैत्रीण’ व्हायला लागले. महिला सुरक्षा कर्मचाऱ्याना धाक नाही, तर आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी आहोत ही भवन या मुलींच्यात रुजवावी लागली. ही सारी प्रक्रिया सोपी नव्हती. एखादी नवी मुलगी ‘घरकुल’मध्ये आली तर ती सारी प्रक्रिया तिच्यासाठी नव्याने सुरू करावी लागते. आधीच्या मुली तिला लगेच सामावून घेतात,मग काम तुलनेने कमी कठीण होते, तरी नवीन मुलगी स्थिरस्थावर करणे आणि तिच्या जगण्याला नवा अर्थ मिळवून देणे ही प्रक्रिया सोपी नसते. ‘घरकुल’मध्ये हे सारे होते. तसेच अनेक इतर संस्थानाही ते करावे लागत असेल. फरक परिणामकारकतेचा असतो, पद्धतीचा असतो, ममत्वाचा असतो. ‘घरकुल’मध्ये ते सारे प्रभावीपणे आणि सकारात्मक पद्धतीने जाणवते. या मुलीना मे महिना आणि दिवाळी या काळात १५ दिवस सुटी दिली जाते. त्या आपापल्या घरी जातात. ज्याना असे कोणीच नाही अशा सुमारे वीसएक मुली ‘घरकुल’मध्ये राहतात. बाकी मुली घरी जाताना त्यांची अवस्था किती बिकट होते, डोळ्यातले अश्रू कसे आवरत नाहीत याच्या कथा ऐकवत नाहीत. काही मुलीना लिहायला वाचायला येत नाही, त्या इतर मुलींकडून शिकायचा प्रयत्न करतात. हे ‘सहकाराचे’ तत्व किती ‘शहाण्या’ माणसांत असते कोणास ठाऊक, पण या मुलींमध्ये नक्की आहे. तोच त्यांना जगण्याचा आनंद मिळवून देते आहे हे नक्की. मुलींमध्ये रमण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, संवेदनशीलता व संवादाची कला अंगी असणे आवश्यक आहे. ती इथे उत्तम प्रकारे दिसते.
या मुलीना दिलेला आत्मविश्वास, लोकांसमोर आपली (मर्यादित का असेना ) कौशल्ये सादर करण्याचे धारिष्ट्य, आहे ती परिस्थिती स्वीकारून आनंदात जगण्याची वृत्ती, आपण सुधारत असल्याने पालकांच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल बघण्याने झालेला आनंद हे आपल्यावर सारे विलक्षण प्रभाव टाकणारे आहे. तसा प्रभाव अनेकांवर पडायला हवा. कारण एकटे ‘घरकुल’ किती महिलाना पुरणार? म्हणूनच सरकारचे या बाबींकडे अधिक लक्ष हवे. इथे प्रसारमाध्यमांना कोणतीही ‘ब्रेकिंग न्यूज ‘ मिळणार नाही, म्हणून अशा संस्थांकडे दुर्लक्ष करणे हेही बरोबर नाही. एखाद्या संस्थेत काही दुर्घटना घडली तर लगेच धावणाऱ्या प्रसारमाध्यमाना एरवी या लोकांची दखल का घ्यावीशी वाटत नाही? नको त्या लोकाना रोज पडद्यावर दाखवताना ‘घरकुल’सारख्या संस्थांकडे दुर्लक्ष नको, हे सांगावे लागते हे दुर्दैव आहे. असो !
माझी ही पोस्ट केवळ ‘घरकुल’चे कौतुक करण्यासाठी नाही (ते कौतुक तर आहेच, त्यांना श्रेय द्यायला हवेच), तर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आहे, ‘घरकुल’ची कॉपी होऊन जेव्हा अनेक ‘घरकुल’ तयार होतील तेव्हा हा प्रश्न सुटण्यासाठी खरा मार्ग मिळेल यात शंका नाही. या ‘घरकुल’ची स्मरणिका पाहण्यात आली. काही पालकांचे लेखही यात आहेत, शिक्षकांचे आहेत, पाहुण्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि संस्थेची माहितीही आहे. त्यातील तीन लेख इथे देण्याचा मोह आवरत नाही. एक लेख आहे या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या विद्याताईंचा , एक लेख संस्थेत अवघी दोन वर्षे झालेल्या सोनल खाडीलकर यांचा आणि तिसरा लेख आहे ‘घरकुल’ला भेट देऊन प्रभावित झालेल्या स्वातीताई फाळके यांचा !
मनोगत
१९७७ साली प्रबोधिनीमध्ये मानसिक दिव्यांग विद्यार्थ्यांबरोबर दिवसातले दोन-तीन तास काम करायला सुरवात केली आणि या दोन तासांचे चोवीस तास कधी व कसे झाले हे माझे मला कळले नाही. आज २०२३ म्हणजे थोडा थोडका नाही तर तब्बल ४६ वर्षाचा कालखंड. या इतक्या वर्षाच्या प्रवासात अनेक आव्हानांना सामोरे जातांना मी तावून सुलाखून निघाले. अनेक चांगल्या वाईट अनुभवातून खूप काही शिकत गेले, समृद्ध होत गेले. या कामात मी इतकी रमले की या कामाने माझं अवघ आयुष्यच व्यापून टाकलं जगण्याचं प्रोत्साहन बनून गेलं. या मुलींसाठी, घरकुलसाठी काहीही करत असतांना मला ते कधीच काम आहे असं वाटलच नाही! प्रत्येक उपक्रमातून, अॅक्टीव्हीटीमधून मला भरभरून आनंदच मिळतो. एखाद्या मुलीला खूप प्रयत्नांनंतर एखादे काम यायला लागल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद व तिच्यात आलेला आत्मविश्वास मला खूप काही उर्जा देऊन जातो. रोजच काहीतर नवीन आव्हानं, नवीन समस्या व मग त्यावर शोधलेले उपाय, सापडलेली उत्तरे, त्यासाठी अनेकांचं लाभलेलं सहकार्य या सगळ्यात एवढे दिवस, महिने, वर्षे कशी गेली ते कळलच नाही !
माझी मुलं चारूदत्त व सारिका, माझं सारं कुटुंब, घरकुलच्या मुली, मावश्या-ताया, पालक आमचे हितचिंतक, देणगीदार या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे माझा २ वेळ पुनर्जन्म झाला. या सर्व आजारपणात सर्वात जास काळजी वाटत होती ती घरकुलची ! पुढे अजून घरकुलचे काम करायचे आहे. या ध्येयाने जिद्दीने मला दुखण्यातून बाहेर काढले. डोळ्यासमो काहीतरी ध्येय होते. त्यामुळे थोडे बरे वाटल्याबरोबर मिळालेल्या संधीचा व वेळेच अधिक चांगला उपयोग घरकुलच्या कामासाठी करुन घ्यायचा असं ठरवलं आणि अधिक जोमाने कामाला लागून तिसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. आता मुख्यतः दोन आघाडीवर काम करायचे आहे. एक म्हणजे घरकुलच्या भविष्यासाठी योग्य असे व अधिकाधिक मनुष्यबळ मिळवणे व तयार करणे. दुसरं म्हणजे प्रत्यक्ष काम करत असलेल्या शिक्षिकांचा सर्वार्थाने विकास करून, सक्षम करून घरकुलच्या CORE VALUES त्यांच्यात रुजवून त्यांना उत्तम प्रकारे घडवायचे, अधिकाधिक माणसं घरकुलशी जोडायची व घरकुलचे हात बळकट करायचे. मला अनेकजण विचारतात, ‘मॅडम दुसरी फळी तयार केलीत का? तुमच्यानंतर घरकुल कोण सांभाळणार? वगैरे वगैरे ….. एखादी वस्तू तयार करण्यासारखे हे काम सोपे नाही. मशिनमध्ये घातली व ही व्यक्ती हवी, तशी कामांसाठी तयार झाली. हे काम खूप अवघड.
घरकुल आहे. तयार करायचे म्हणून कोणी तयार होत नसतं. त्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे काम करण्याची मानसिकता, आवड मुळातच रक्तात, स्वभावात असायला पाहिजे. अशा विशेष मुलींच्यामधे रमण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, संवेदनशीलता व संवादाची कला अंगी असणे आवश्यक आहे. दुसऱ्याचे ऐकून त्याला समजून घेणे महत्वाचे आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी, क्षमाशील वृत्ती, नम्रता, , सचोटी, प्रामाणिकपणा, माणसं जोडण्याची कला, अशा एक नाही शंभरशेसाठ गोष्टी आवश्यक आहेत. एका दिवसात कोणी तयार होत नाही. दुसऱ्यांनाही तयार व्हायला, शिकायला, रुजायला ६-७ वर्षांचा कालावधी सहज लागतो. मी अजूनही रोज शिकतेच आहे. रोज येणाऱ्या चॅलेंजेस मधून, समस्यांमधून, अनुभवातूनच प्रत्येकजण शिकत असतो. सुनिताताई, साधनाताई, सोनल, पल्लवी, क्षमा, सुचेता, वल्लरी, सारिका या सगळ्या मैत्रीणी वेगवेगळ्या अधिकाधिक जबाबदाऱ्या घेऊन काम करत आहेत. यात खूप समाधान व अत्यंत आनंद आहे, त्यामुळे घरकुलची दुसरी फळी छान तयार होईल याचा पूर्ण विश्वास आहे. इतकी वर्षे काम करत असतांना काही मूल्य तत्व उराशी बाळगून, ती सांभाळत सर्वांना धरून सर्वांच्याबरोबर वाटचाल केली. म्हणून लोकांनी मोलाचे सहकार्य केले व योगदान दिले. हितचिंतक, देणगीदार व संस्था यांचा रॅपो राहाणे व दोघांमध्ये एक स्नेहसंबंध तयार होणे महत्त्वाचे असते.
माणसं जोडता, वाचता व समजता येणं फार महत्वाचं आहे. आमच्या सर्व शिक्षिका, मावश्या अतिशय चांगल्याच आहेत. पण प्रत्येकात संयमी, संवेदनशील, प्रेमळ, कल्पक, प्रयोगशील, आनंदी हे सर्व गुण रुजण्यास काही कालावधी तर नक्कीच लागेल, पण प्रत्येकीत हे सर्व रुजण्याचा व घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या या शिक्षिकांनाच घरकुल रिप्रेझेंट करायचे आहे. त्यामुळे त्यांना चांगले बोलता येणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, बॉडी लँग्वेजमधून संस्थेची प्रतिमा लोकांपर्यंत पोचणार आहे. म्हणून त्यासाठी प्रयत्नशील आहोत. मुली, शिक्षिका या संस्थेचा आरसा आहेत. त्यांना विचारांची प्रगल्भता यावी, त्यांनी चांगले वाचावे म्हणून छोटीशी लायब्ररी सुरु केली आहे. आठवड्यातून दोन दिवस १ तास वाचनासाठी देत आहोत. महिला दिनाच्या निमित्ताने पुस्तकाचे हॉटेल असलेल्या भीमाबाई जोंधळे यांची मुलाखत घेण्यात आली व कवयित्रींच्या २-२ कविता आमच्या शिक्षिकांनी सादर केल्या. तसेच सगळ्या शिक्षिकांना गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे १ महिन्याचे नर्सिंग ट्रेनिंग देण्यात आले. आर्ट थेरपी फॉर हॅपीनेससाठी सोनाली जोशी यांनीही मार्गदर्शन केले. घरकुलमधील एकेका कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. यातूनच त्या तयार होत आहेत.
आता उपचारासाठी मी पुण्यात असताना अनेकांचे कामासाठी फोन येत असत. तेव्हा ते घरकुलमध्ये गेल्याचे शिक्षकांनी त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत करून माहिती दिल्याचे सांगितले. शिक्षीकांचे कौतुक ऐकून मला खूप समाधान वाटते व आनंद झाला. सगळ्यांसमोर आज घरकुलचे एक ‘रोल मॉडेल’ तयार झाले आहे. सर्व मुली व मुख्यतः मुलींचा आनंद, हित जपत एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला यावी हीच इच्छा आहे. मुलींच्या आनंदी व सुखी जीवनासाठी तर हा सगळा प्रयत्न सुरु आहे. पालक मुलींना दिवाळीत १५ दिवसांसाठी घरी नेतात, तेव्हा परत सोडायला आल्यावर प्रत्येक पालक समाधानी दिसतो व प्रत्येकजण मला भेटून मॅडम तिच्यात खूप चांगला बदल झाला आहे, ती आता आमचं ऐकते, काम करते, हट्टीपणा कमी झाला आहे, असं भरभरून बोलत असतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील भाव, आनंदाश्रू खूप काही सांगून जातात. ते पाहून खूप समाधान वाटतं. कारण पालकांकडून चांगल्या कामासाठी मिळालेली ती पावती असते. त्यातून आम्हाला सगळ्यांना खूप बळ मिळते, प्रोत्साहन मिळते आणि हीच खरी घरकुलची कमाई आहे.
घरकुल परिवाराला कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. संस्था पूर्णतः समाजाच्या सहयोगावरच चालते. आज घरकुलात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या ६० विद्यार्थिनी व काम करणाऱ्या २८ शिक्षिका, मावश्या, ताया, सेविका आहेत. त्यांच्या दरमहा पगाराचा खर्च घरकुलासमोर असतो. आणि या आमच्या सगळ्या शिक्षिकांचं, मावश्यांचं, तायांचं या मुलींना २४ तास सांभाळण्याचं मोठं अवघड काम आहे. रोज त्यांची तारेवरची कसरत व संयमाची कसोटी असते.
श्रीमती विद्या फडके
निर्मल आनंद
निर्मल आनंद – भौतिक किंवा प्रापंचिक सुखापलीकडील आनंद. आनंद जो थेट हृदयापासून निघून आपल्याला आपलं अस्तित्वच विसरायला लावतो. असा निर्मल आनंद आपल्याला मिळतो, घरकुलात आल्यावर. गेली अनेक वर्ष प्रपंच जबाबदाऱ्या, करियर, पैसा आणि भौतिक सुखाच्या पाठीमागे अविरत धावणाऱ्या मला नियतीने एक आकस्मित, अकल्पित आणि अनाकलनीय घाव घालून आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या जीवनाच्या उद्देशाचा सखोल विचार करायला भाग पाडलं. अठरा वर्षे एवढा मोठा काळ भारताबाहेर राहून परत भारतात परतले तेव्हा समोर फक्त एकाकीपणा आणि कधीही न भरुन येणारी पोकळी होती. पण साथ दिली ती अध्यात्माने, गीतेने. आपण परत उभे राहू शकतो, परत आनंदी उत्साही बनू शकतो हा विश्वास दिला आणि स्वतःवर काम करायला सुरुवात केली. वाट खडतर होती; पण विश्वास आणि श्रद्धेच्या जोरावर परत एकदा उभी राहिले. आणि एक दिवस विद्याकाकूंचा फोन आला विचारपूस करायला. त्यांनी मला सहानुभूती न दाखवता तू नक्की काहीतरी करू शकशील, एकदा घरकुलात ये असा विश्वास मला दिला आणि मी ठरवलं की आपण हेमंतचा वाढदिवस घरकुलमध्ये साजरा करायचा. त्याचा पहिला वाढदिवस त्याच्या फिजिकल प्रेझेंन्स शिवाय.
घरकुलात जाण्याआधी प्रचंड विचार डोक्यात होते, कशा असतील या मुली? काही करणार तर नाही ना? आपल्याला एकदम डिप्रेसींग वाटेल कदाचित, असे अनेक विचार… पण प्रत्यक्षात जेव्हा घरकुल मध्ये आले आणि घरकुलाचीच होऊन गेले. घरकुलमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या प्रचंड पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आल्या, प्रत्येक मुलगी काही ना काही कामात व्यग्र होती. काकू प्रत्येक मुलीशी अतिशय आत्मियतेने, प्रेमाने आणि लाघवीपणाने बोलत होत्या. त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होत्या. सगळ्या टीचर्स अत्यंत हसतमुखाने स्वागत करत होत्या. वाढदिवस साजरा करण्याची सगळी व्यवस्था चोख होती. त्याचप्रमाणे तिथली स्वच्छता, टापटीप, सर्वत्र ग्रीनरी हे सर्व पाहून मी खूपच अचंबित झाले. हे एखादे एनजीओ तर अजिबात वाटत नव्हते. खरोखरच नावाप्रमाणे हक्काचं घर होतं या मुलींचे. त्यादिवशी घरकुल मध्ये खूप धमाल केली. मुलींबरोबर गाणी, नाच, खाणं, पिणं, खूप गप्पा, प्रेमळ स्पर्श आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मुलीचा एकच प्रश्न ‘ताई उद्या येशील परत ?’ या सर्व गोड आठवणी घेऊन मी घरी आले आणि घरकुल डोक्यात असंख्य विचार थैमान घालू लागले.
या मुलींना परमेश्वराने असं आयुष्य देऊनही ह्या आज इतक्या आनंदाने, प्रेमात राहू शकतात आणि शिवाय काहीतरी काम करून स्वतःला स्वावलंबी, कॉन्फिडंट बनू शकतात. आणि ही कल्पना सत्यात आणण्यासाठी विद्याकाकू आपलं सगळं आयुष्य वेचत होत्या. तर आपण आपला छोटासा खारीचा वाटा म्हणून आपल्याकडे जे आहे ते या मुलीबरोबर नक्कीच शेअर करू शकतो. आणि मी घरकुलामध्ये जायला सुरुवात केली. पहिल्या पहिल्यांदा फक्त मुलींबरोबर गप्पा, गोष्टी, गाणी आणि हाय फाय देत, कधी आणखी कामात आनंद घेत गेले कळलंच नाही. त्यायोगे रोज नवीन नवीन शिकत गेले आणि शिकते आहे. विद्या काकूंची ऊर्जा, त्यांचे व्हिजन, त्यांचे परफेक्शन, त्यांची पॉझिटिव्हिटी आणि अविरत कष्ट आणि नवनवीन गोष्टी इंट्रोड्युस करून घरकुलाच्या मुलींसाठी, शिक्षिकांसाठी त्यांनी काहीतरी नवीन शिकावं, कॉन्फिडंट व्हावं यासाठीची तळमळ, सगळं काही अफाट, अचाट आहे. आपल्याकडील शिक्षिकांनी अधिक सक्षम बनण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या नवीन नवीन संधी उपलब्ध करून देणे असो किंवा आदितीचं नाचातलं कौशल्य ओळखून तिला त्यानुसार मिळाला. स्पेशल ट्रेनिंग देणं असो. मुलीकडून कविता पाठांतर करून घेणे असो किंवा आल्या गेल्यांचे आदरातिथ्य करणे, नवनवीन क्रिएटिव्ह क्राफ्ट शोधून काढून ते बनवून घेणे असो. काकूंची प्रत्येक अॅक्शन ही एक शिकवण आहे, असे मला वाटते. एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीच्या सीईओला लाजवेल अशा काह क्वालिटीज्. आज घरकुलला एक वेगळ्या उंचीव पोहोचण्यासाठी आपल्या वैयक्तिक कोणत्याह गोष्टीची पर्वा न करता पूर्ण झोकून देऊन समाजकार करणाऱ्या विद्याकाकूंना त्रिवार सलाम.
घरकुलमध्ये आल्यावर समजलं ग्राऊंडेड किंवा डाऊन टू अर्थ असणं म्हणजे काय… इथे साधनाताईंची भेट झाली, त्या कायम हसतमुख, अतिशय सालस आणि नॉलेजने परिपूर्ण असं व्यक्तिमत्व घरकुलच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज तसेच काही कार्यक्रम असेल तर त्याच नियोजन. असे सर्व गोष्टींमध्ये विद्याकाकू व साधनाताईच्या हाताखाली काम करणे हा सुद्धा खूप काही शिकवणारा व सुखद अनुभव. घरकुलामधील सगळ्यांच्याच व्यक्तिमत्त्वात खूप मोठ्या व्यक्ती असूनही सादगी आहे याची अनुभूती घरकुलच्या अध्यक्षा आडके मॅडमना भेटल्यावर येते. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की मला घरकुल मध्ये येऊन अशा अनुभवी व्यक्तीबरोबर काम करण्याची, शिकण्याची संधी मिळाली. तसेच निरागस मुलींबरोबर राहून, त्यांच्यामध्ये वेळ घालवून निर्मल आनंदाचा ठेवा मिळाला.
श्रीमती सोनल खाडिलकर
जिवंत कळ्या
त्यांना मतिमंद का म्हणायचं तेच मला कळेना !
मतिमंद मुलींनी केलेले आकाशकंदील, दोहर, महिरपी, पिशव्या, पर्सेस, ग्रिटिंग कार्डस, तोरणं, फ्लॉवर पॉट्स, शिवाय पापड, पापड्या, भाजण्या आणि कितीतरी वस्तू त्या शाळेच्या वस्तू | भांडारात हारीने मांडून ठेवलेल्या पाहून तर कोणी विश्वास सुध्दा ठेवणार नाही की या वस्तू कुणी विशेष मुलींनी केलेल्या आहेत….! आपल्याच नाशिक जवळच्या पिंपळगाव बहुल्याच्या घरकुल या अशा विशेष मुलींच्या शाळेत, त्यांच्या शिक्षिकांना कागदी फुले शिकवायला गेले होते.
खूपच आग्रहाचं आणि प्रेमाचं आमंत्रण ! मनात थोडं दडपण आणि खूप सारे प्रश्न. मी तुम्हाला घ्यायलाच येते पावणे अकराला. पावणे अकराला विद्याताई गाडीतून उतरुन थोड्या पुढेच येऊन थांबलेल्या ! हो, त्या | शाळेच्या सर्वेसर्वा विद्याताई फडके ! एक टवटवीत आणि प्रसन्न व्यक्तिमत्व ! शाळेत जातांना त्या मला या विशेष मुलींच्या शाळेची, वसतिगृहाची माहिती सांगत होत्या. शब्दांत किती सहजता, खूप उर्जा मतिमंद ! आणि खूपच सकारात्मकता ! शाळेचं फाटक प्रत्येकासाठी उघडणारी, बंद करणारी आणि रजिस्टरमध्ये नोंद करायला | लावणारी प्रौढा रेणुका समोर आली. कळलं की शाळेत सर्व कामे फक्त महिलाच करतात. | आवारातली सुंदर फुलझाडे आणि प्रसन्न करणारी रांगोळी आपलं स्वागत करतात. खूपच प्रशस्त हॉल, स्वच्छ प्रकाश, लांब व्हरांडे आणि त्या लागून फुलझाडे! मुली आंघोळ, नाष्टा करून एका मोठ हॉलमध्ये जमलेल्या होत्या आणि बॉलपेनच असेम्बलिंगचे काम चाललं होतं. सत्तरी पर्यंतच विद्यार्थिनी तिथे दिसल्या. हसत-खेळत क चाललं होतं. मला प्रश्न पडला की का म्हणायचं मुलींना मतिमंद ? मुली स्वयंपाकघरात मदत करतात. भाज चिरतात, कणीक मळून देतात तर कोणी वाढप्या काम छान करतं. विद्याताई भरभरून माहिती सांगत होत्या उत्साहाने आणि आनंदाने!
मुलींबद्दलचं कौतुक प्रेम शब्दांमधून जाणवत होतं. मुलींना सगळ्या गोष्टी विद्याताईंना सांगायच्या असतात, दाखवायच्या असतात! मुली त्यांना ‘आई म्हणतात. ह्या आईच्या सर्व भावभावना मुली कळतात. बरं वाटत नसेल, कामाचा ताण असेल तर मुली तसं विचारतात. कोण म्हणेल या मुलीना मतिमंद ! कुणी मुलगी सर्वसामान्य गटातून नृत्य सादर करुन सिंगापूरहून बक्षीस घेऊन आली. कुणी मशिनवर उत्तम पर्सेस शिवते. कुणी कलाकुसर करते तर कुणी गाणं. इथे येऊन मुली हुशार होतात. त्यांची कौशल्ये वाढतात. घरी त्यांना एकटं पडल्यासारखं होत. कधी कुठे त्यांच्या घरातील किंवा शेजारीपाजारी नीट वागवत नाहीत. त्यांना हसतात, रागवतात मारतात सुद्धा! ‘घरकुल’मध्ये मुलींना त्यांचा पिअर ग्रुप मिळतो. मग त्या हसतात, फुलतात आणि वेगवेगळी कामे शिकून घेतात.
सकाळी मुलींकडून श्लोक म्हणून घेतात, तर संध्याकाळी शुभंकरोती, ओमकार आणि काही श्लोक ! मला परत प्रश्न पडला की आता मतिमंद कोणाला म्हणावे ? आम्ही दोन्ही वेळेस त्यांना ताजा स्वयंपाक करून देतो. सकाळी दूध देतो, विद्याताई सांगत होत्या……. या मुली येतात कुठून? अहो प्रत्येकीची कहाणी वेगळी. एक तेरा वर्षांच्या मुलीला तिच्या पालकांनी रेल्वेत सोडून दिली. ती नंतर मतिमंद म्हणून आमच्याकडे आली. आता छान मशीनवर वाती तयार करते. एक मुलगी आठ दिवसांसाठी घरी गेली. आई आठ दिवसांनी सोडायला आली. बसली, रडत होती… म्हणाली बाई, ही आली तर मी आजारी बघून, माझ्या उशापायथ्याशी बसून सेवा केली हिनं, खाऊ घालायची, औषध कळत नव्हतं तर नुसतीच आठवण करून द्यायची. मुलगा आला, मला पाहिलं आणि निघून गेला. हिचा भार वाटला होता, पण तीच आधार झाली. विद्या ताई म्हणतात, ‘या मुली खूप प्रेमळ असतात !
आता निघायची वेळ झाली होती. शिक्षिकांनी फुले शिकून गुच्छही केले. पाय निघत नव्हता. खू काही बघायचं राहून गेले असे वाटतंय. विद्याताई म्हणाल्या, मी तुम्हाला सोडायला येते. अगदी संकोचून गेले. घरापाशी आल्यावर मी गाडीतून उतरायच्या आधी स्वतः उतरल्या. माझ्यापाशी आल्या. हात हातात घेऊन म्हणाल्या “तुम्ही आलात बरं वाटलं. खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली.” खरं तर मी काय केलं होतं ? माझ्याकडे होती फक्त कागदी फुलं ! त्यांच्याकडे होत्या. जिवंत कळ्या ! कळ्यांची फुलं त्या करत होत्या! ज्ञानकमळांची एक-एक पाकळी त्या उघडत होत्या! अशा सेवाव्रती, स्निग्ध ज्योती आज समाजाचा आधार आहेत. ज्ञानाची शलाका पेटती ठेवत आहेत. पद्म पुरस्कार त्यांना मिळेल. मी मनातून कालच तो त्यांना दिलाय!
स्वातीताई फाळके
‘घरकुल’ परिवार संस्था – आनंद नगर, त्रिंबक रोड, पिंपळगाव बहुला, नाशिक – ४२०२१३
ईमेल – gharkulparivar@gmail.com
Website – www.gharkulparivar.org
Special Women Girls Mental Health Gharkul Institute
Vidya Deshpande