नाशिक – टपाल खात्याद्वारे रक्षाबंधन निमित्त विशेष पाकिटे तयार केली गेली आहेत. या पाकिटांद्वारे बहिणी आपल्या भावांना राखी पाठवू शकतील. भाऊ-बहिणीचे अतूट नाते कायम ठेवण्यासाठी, ग्राहकांसोबत तितकेच अतूट नाते असणाऱ्या टपाल खात्याद्वारे निर्मित या विशेष राखीच्या पाकिटांमधून स्पीड पोस्ट द्वारे राखी पाठवण्याची व्यवस्था केली गेली आहे. ११ ऑगस्ट या दिवशी राखी पौर्णिमा आहे. या विशेष पाकिटाची किंमत केवळ दहा रुपये अशी आहे. आजच्या या डिजिटल शुभेच्छांच्या युगामध्ये टपालाद्वारे प्रत्यक्ष रूपाने राखीच्या माध्यमातून भावंडांना बहिणींचे प्रेम प्राप्त होते आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. भावासाठी अतिशय प्रेमाने घेतलेली व त्याच प्रेमाने व स्नेहासहित टपाल खात्याच्या या विशेष पाकिटाद्वारे पाठविलेल्या राखीचा आनंद अवर्णनीय आहे. प्रत्येक भावापर्यंत आपल्या बहिणीची राखी वेळेत पोहोचावी यासाठी टपाल खात्याने विशेष योजना आखली आहे.
नाशिक विभागाचे प्रवर अधीक्षक मोहन शंकर अहिरराव यांनी माहिती देताना सांगितले की, प्रत्येक वर्षी राखीच्या पाकिटांची मागणी वाढतच आहे. आमचे ग्राहक स्पीड पोस्टाद्वारे राखी पाठवू शकता आणि आता परदेशात देखील राखी वेळेवर पोहोचविली जाईल. या पाकिटांवर राखी या शब्दाचा उल्लेख केला असल्याने इतर टपालांमधून त्यांचे वर्गीकरण करणे सोपे झाले आहे. याच सोबत सर्व टपाल कार्यालयांना सूचना देण्यात आली आहे की राखीचे टपाल शीघ्रतेने वितरित करावे. आम्ही टपाल विभागातर्फे नाशिक जिल्ह्यातील (शहर व ग्रामीण) सर्वच नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यास आवाहन करीत आहोत, तसेच सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत.