इंडिया दर्पण विशेष – ज्ञानेश सोनार यांची कथामाला
राणी टरबुजातील!
ऋणांनुबंधांच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी। कुमार गंधर्वांच्या अतिशय मधुर आवाजातील या उत्कट स्नेहाच्या, नात्याच्या ओळी. खरेच आपण कोण, कोठले , कोठून आलो, कसे भेटलो यात कोणतीही सुसंगती नाही. केवळ नियतीचे संकेत तिने ठरवावे व आपण पुढे जावे इतकेच. यानिमित्ताने एक सुंदर गोष्ट आठवते ती सांगायचा मोह होतो. कारण ऋणानुबंध. तुमचे आणि माझे.
स्वाती आणि सुदेश हे पती पत्नी. स्वाती सुंदर. सुदेशही स्मार्ट. अत्यंत सुखवस्तू आणि आनंदी जोडपे. पण देवाची नेहमीची खेळी. त्यांना अपत्यच नव्हते. भरपूर उपाय करून पाहिले. परंतु लक्षात आले की, आता अपत्य सुख नाही. मग स्वातीच सुदेशला म्हणाली, “आपण एखादी मुलगी दत्तक घ्यायची का? दिवसभर तू ऑफिसला जातोस. मी मन रमवायचा पुष्कळ प्रयत्न करते. पण वेळ जाता जात नाही. कंटाळून जाते .सुदेश म्हणाला “चालेल तुला सोबत हवीच ना घरात. तिसरं माणूस असले की छान सोबत होते. घरात मूल हवे ते आपणच जन्म दिलेलं असावं असे संकेत आता कालबाह्य झालेत. त्याच्यावरही प्रेम करता येतं. त्याला प्रेम दिले की ते ही आपल्यावर करतं.
अती उत्साहात, हुरहुरीने त्यांनी अनाथाश्रमात जायचे ठरविले. दत्तक संबंधातील सर्व प्रोसिजर्स पूर्ण करून एके दिवशी स्नेहाला घेऊन ते घरी आले. स्नेहा दहा अकरा वर्षांची होती. सावळ्या वर्णाची, नीटस टपोर डोळ्यांची, आणि थोडी मितभाषी. गोरी गोमटी मुले व मुली होत्या. पण स्वाती म्हणाली, “सावळ्या मुलींनाही कुणी तरी जीव लावायलाच हवाय ना. आपण स्नेहाचे मस्त लाड करू! स्नेहासाठी एक छान खोली सजविलेली होती. छानसा बेड त्यावर स्वच्छ चादर, पुस्तकांसाठी कपाट. अभ्यासासाठी टेबल, लॅम्प, खुर्ची. स्वच्छ वाॅशरुम. स्वातीने दार उघडून तिला रूम दाखविली व म्हणाली,”स्नेहा हातपाय धू. तुझे सुटकेसमधील कपडे, पुस्तके, कपाटात ठेव. ते झाले की जेवायला हॉलमध्ये ये. आपण दोघी बरोबर जेऊ.
स्नेहा म्हणाली, चालेल! जराशाने दोघींनी जेवण केले. पण स्नेहा गप्प गप्पच होती. थोडी संकोचलेली. स्वाती म्हणाली, जरा झोपायचे तर झोप वा अभ्यास कर. मी बेडरूममध्ये पडते. दिवस सरत होते. स्नेहा तिच्या खोलीत अभ्यास करत बसे. बोलावले की येई. छोटे, मोठे काम सांगितले की करी. विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरेही देई. पण पुन्हा गप्प गप्प होई. स्वातीला वाटे तिने नाचावे, बागडावे, हसावे, हट्ट करावा. पण सूर जुळेनात. तशी स्नेहा चपळ होती. स्वच्छ व नेटकी राही. रूम स्वच्छ ठेवी. पुस्तके आवरुन ठेवी. वेळच्या वेळी शाळेत जाई. अभ्यासात हुशार होती. सकाळी अंघोळ झाल्यावर स्वातीला व सुदेशला न चुकता नमस्कार करी. सुदेशने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देई.
तसे नाव ठेवण्याला जागा नव्हती. पण स्वातीचे एकाकीपण संपेना. एके दिवशी स्नेहाबरोबर तिच्या शाळेतल्या मैत्रिणी घरी आल्या. त्यातील एकजण स्वातीला म्हणाली, आंटी, माझा वाढदिवस आहे. स्नेहाला चार वाजता माझ्या घरी पाठवाल का?” स्नेहा जायचं तुला? स्वातीने विचारले. आपण पाठवाल तर! स्नेहा म्हणाली. चार वाजता स्वातीने स्वतः तिचा नट्टापट्टा केला. मैत्रिणींसाठी एक प्रेझेन्ट दिले. मैत्रिणीच्या वाढदिवसा वरुन परतलेली स्नेहा खूप आनंदात दिसत होती. तिचा हसरा चेहरा पाहून स्वातीने तिला विचारलं,” तुझा असाच वाढदिवस करायचा का?”
“आई आपण म्हणाल तर!” ती पुटपुटली. तिच्या वाढदिवसाची तारीख शोधून स्वातीने मुलींना निमंत्रण दिले. दोघी मायलेकींनी छान तयारी केली. स्नॅक्स केले. तिच्या रुममध्ये फुगे लावले. माळा लावल्या. छान सजावट केली. वाढदिवस खूप छान झाला. स्नेहा तर मोहरली होती. कारण या आधी तिचा वाढदिवस कधीच साजरा झाला नव्हता. तो दिवस सरला. स्वातीला वाटले आता स्नेहा बदलेल, मोकळी होईल. पण कसचे काय. पुन्हा अंतर होते तसेच राहिले. स्नेहाची वार्षिक परीक्षा संपली. तिला सुटी लागली. स्वातीलाही कंटाळल्या सारखे झाले होते.
म्हणून तिने स्नेहाला म्हटले, “आपण बाजारात जायच का?” “आपण म्हणाल तर जाऊ.” स्नेहाने म्हटले. दोघी बाजारात निघाल्या. बराच वेळ दोघी गप्प गप्प होत्या. मग स्वातीने विचारले,” तुला कोणते फळ जास्त आवडते ते आपण घेऊ.” सगळी आवडतात.” अगं पण त्यातल्या त्यात एखादे खास आवडीचे असेल ना? मला टरबुज खूप आवडतं. स्नेहा हळूच म्हणाली . छान! पण टरबूज का आवडतं? उगाचच. स्नेहाने म्हटलं. खरे खरे सांग ना स्नेहा! मग स्नेहा म्हणाली, अहो आई, मला आठवतं तेव्हापासून अधून मधून मला एक स्वप्न नेहमी पडतं. लाल भडक टरबूज माझे राज्य आहे. काळ्या, पांढर्या शुभ्र बिया माझ्या सैनिक आहेत. आणि त्यांची मी राणी आहे.
अजूनही ते स्वप्न तुला पडत का स्नेहा? हो! अजूनही पडतं आई! स्वाती मनाशीच हसली. तिने स्नेहाला आवेगाने कवटाळले. म्हणाली, मी तुझी सख्खी आई व तू माझी सख्खी मुलगी, अगं लहानपणापासून हेच स्वप्न मला सुध्दा पडायचं अजूनही पडतं. खरं सांगतेस आई? स्नेहाने डोळे विस्फारून विचारले. होय गं. माझ्या बाई! भरल्या डोळ्यांनी स्वातीने तिला कवटाळत म्हटले. आई.. माझी आई! स्फुंदत स्नेहाने तिला मिठी मारली. कितिक दिवसांचे दोघींचे गुदमरलेले श्वास मोकळे झाले.