श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-6ः
अध्यापनाची शैली
श्रीअरविंद घोष १८९३ ते १९०६ या तेरा वर्षांच्या कालखंडामध्ये बडोदा संस्थानच्या सेवेत होते. सुरुवातीला ते महसूल खात्यात व महाराजांच्या सचिवालयात काम करत असत. नंतर ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि शेवटी बडोदा कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते. श्रीअरविंदांच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल एका विद्यार्थ्याने सांगितलेली एक आठवण —
“इंटरमिजिएटच्या वर्गामध्ये त्यांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. पुस्तकातील आशयाशी विद्यार्थ्यांची ओळख व्हावी म्हणून सुरुवातीला ते त्या विषयासंबंधी प्रास्ताविकपर व्याख्याने देत. आणि नंतर पुस्तक वाचत, मध्येच थांबून जिथे आवश्यक आहे तेथे अवघड शब्दांचे, वाक्यांचे अर्थ सांगून स्पष्टीकरण देत असत. आणि शेवटी त्या पुस्तकातील आशयासंबंधी साररूपाने काही व्याख्याने देत असत.
“पण वर्गातील या व्याख्यानांपेक्षा, त्यांची व्यासपीठावरील भाषणे ही आम्हासाठी एक पर्वणी असायची. कॉलेजच्या वादविवाद मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ते कधीकधी सभांना उपस्थित राहत असत. ते जेव्हा स्वत: भाषण करायचे तेव्हा कॉलेजमधील सेंट्रल हॉल श्रोत्यांनी भरून जात असे. ते उच्च दर्जाचे वक्ते होते, लोक खूप लक्षपूर्वक त्यांचे भाषण ऐकत असत. विद्यार्थ्यांसमोर ते कोणतेही हावभाव, हालचाली न करता उभे राहत. त्यांच्या वाणीतून शब्द एखाद्या झऱ्याप्रमाणे माधुर्याने, सहजतेने बाहेर पडत असत; लोक त्यांचे भाषण ऐकून मंत्रमुग्ध होत असत… पन्नास वर्ष उलटून गेली तरी आजही माझ्या कानांमध्ये त्यांची ती सुमधुर वाणी रुंजी घालत आहे.”
(क्रमश: …)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Series ShreeArvind Teaching Style