मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकूल योजना तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
यावेळी आमदार श्री. कडू यांनी दिव्यांग तसेच गावोगावी पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी घरकूल योजना असावी, अशी मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वतंत्र घरकुल योजना तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. राज्यात बांधकाम महामंडळाच्या धर्तीवर घरेलू कामगार यांच्यासाठी मंडळ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतमजुरांसाठी योजना करण्याबाबतच्या मुद्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमीहिन शेतमजुरांसाठी योजना करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
चिखलदरा येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक केला जात आहे. त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीतूनच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी संवाद साधला आणि या कामाला वन विभागाकडून आवश्यक ते सहकार्य मिळण्याची मागणी केली. या बैठकीत अचलपूर जिल्हा निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, माधान ता. चांदूरबाजार येथे शासकीय सीट्रस इस्टेट करणे, फीन ले मिल पूर्ववत सुरू करणे आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या मुद्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
Special Scheme for Divyang Peoples Cm Shinde