नाशिक : आपली आवड, छंद जोपासण्यासाठी वयाचं कोणतही बंधन नसतं हे पुन्हा एकदा नाशिकचे ज्येष्ठ लेखक शशिकांत जागीरदार यांच्याकडे पाहून सिद्ध होतं. व्यवसायाने मूळ ते आर्किटेक्ट पण निवृत्तीनंतर त्यांनी आपली लिखाणाची आवड जोपासली. आज वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे ‘कॅलिडोस्कोप’, ‘शुरांच्या शौर्यगाथा’ आणि ‘ओंजळभर शिंपले’ हे तीन कथासंग्रह ग्रंथाली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहेत. त्यानिमित्त त्यांची ही विशेष मुलाखत घेण्यात आली. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली.
तू चांगला लिहू शकतो. आयुष्यात असं कोणतरी सांगणं हे खूप महत्त्वाच असतं. सुरुवातीपासून दृश्यकलेकडे माझा कल होता. बाहेरचं सौंदर्य मी कागदावर उमटवण्याचा प्रयत्न करायचो. दृश्यकलेची हीच आवड नंतर हळूहळू शब्दकलेत घट्ट होत गेली. वडिलांच्या नोकरीमुळे ग्रामीण भागात राहण्याचा योग आला. तिथे निसर्गाशी मैत्री झाली. निसर्गातील मनोहारी अनुभव हळूहळू मी शब्दांकित करत गेलो.
कथासंग्रहाच्या अनुभवाविषयी ते म्हणाले की, माझ्या नोकरीच्या निमित्ताने मला विविध देशात फिरण्याची, जाण्याची संधी मिळाली. विविध देशाची संस्कृती जाणून घेता आली. त्या अनुभवांचे तीन कथासंग्रह तयार झाले. सर्वप्रथम मी गल्फ देशात गेलो. तिथे गेल्यावर लक्षात आले की तिथली राजसत्ता आणि आपले राजकारण यात खूप भिन्नता आहे. तिथे आपल्यासारखे मतस्वातंत्र्य नाही. त्या देशातील शिक्षा खूप भयंकर आहेत. त्यामुळे तिथले नागरिक स्वातंत्र्याचा वापर मर्यादित पध्दतीने करतात. त्या काळात आम्ही काही मंडळींनी एकत्र येऊन हिंदुस्थानातील पुलं देशपांडे, पं भीमसेन जोशी यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांना आमंत्रित केले. अनेक मोठमोठ्या कलाकारांना जवळून बघता आले त्यांच्याशी बोलता आले. त्यानंतर इतर देशात प्रवास केला. काही गमतीदार अनुभव आले तर युद्ध सुरू असल्यामुळे काही भीतीदायक अनुभवही आले. हे सगळे अनुभव या पुस्तकांतून मांडले आहेत.
दुबईत असताना आलेला एक गमतीदार अनुभव त्यांनी सांगितला, अरेबियन लिपी ही उलट्या बाजूने लिहिली आणि वाचली जाते. एकदा कपड्याच्या साबणाची जाहिरात करायची होती. अमेरिकन कंपनीने ती जाहिरात केली. नॉर्मल इंग्रजीभाषेप्रमाणे आधी कपडा घाणेरडा असतो, त्यानंतर साबण वापरून तो कपडा स्वच्छ होतो अशी थीम होती. अरेबियन लोकं आले त्यांनी पाहिलं आणि ते हसायला लागले. बऱ्याचवेळानंतर कळले की त्यांच्या लिपीनुसार उलट घडले आहे. आधी कपडा स्वच्छ असतो त्यानंतर साबण वापरून तो घाणेरडा होतो, म्हणजे लिपीच्या पध्दतीमुळे जाहिरात क्षेत्रही गोंधळले. असे अनेक अनुभव या काळात आले, असे ते म्हणाले.
ग्रंथाली विषयी ते म्हणाले की, उदयोन्मुख लेखकांना प्रोत्साहन देण्याचं ग्रंथाली प्रकाशन संस्थेचं धोरण होत आणि सरकार त्यांना यात मदत करत होते, त्यामुळे मी आकर्षित झालो आणि त्यांना भेटायला गेलो. मला खूप छान अनुभव आला. या सगळ्या प्रवासात घरच्यांच्या पाठिंब्याविषयी त्यांनी सांगितले की, घरच्यांची अविरत साथ होती. या काळात माझं घराकडे लक्ष नव्हत पण पत्नी, मुलगा, मुलगी यांनी खूप सांभाळून घेतलं. परदेशातून मुलं लिखाणाविषयी चौकशी करायचे. या वयातही त्यांचा उत्साह हा तरुणाला लाजवेल असा आहे, त्यामागचं रहस्य सांगताना ते म्हणाले की, आयुष्यात जे मिळालं, नशिबानं जे लाभलं त्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. ती संधी मी घेत गेलो, हेच यशाचं गमक आहे.