ब्रिज विश्वचषक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिल पाध्ये यांच्याशी बातचीत
विश्वचषक ब्रिज सुरु झाल्यापासून ४५ वर्षात भारताला एकदाही अंतिम फेरी गाठता आली नाही. पण आर कृष्णन, सुब्रतो सहा, सुकोमल दास, अशोक गोयल , राजेश दलाल आणि अनिल पाध्ये या सहा जणांच्या भारतीय संघाने या वेळी मात्र इटली येथे अलिकडेच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. भारत पोलंडकडून पराभूत झाला पण २३९-१९४ अशा अत्यंत थोड्या फरकाने. त्यातही पहिल्या तीन डावात भारताने आघाडी घेतली होती. या रौप्यपदक विजेत्या संघातील अनिल पाध्ये हे नाशिक येथे चालू असलेल्या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथे आले होते. त्यांच्याशी झालेल्या गप्पांचा सारांश:
भारत संघाने एवढे मोठे यश मिळविले त्या बद्दल
अंतिम फेरीत भारत ज्या पोलंड संघाकडून हरला तो पोलंडचा संघ अतिशय मजबूत होता आणि त्यांनी अनेकदा विश्वचषक जिंकला आहे त्यामुळे पोलंड favourite होतेच. पण आम्ही लढत दिली अगदी अटीतटीची म्हंटले तरी चालेल . खरं तर आम्ही सुरुवातीला आघाडी घेतली देखील होती पण आम्हाला अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव नसल्याने आम्ही कमी पडलो.
रौप्यपदक मिळाल्याचा आनंद झाला की सुवर्णपदक हुकल्यामुळे दु:ख?
आमच्या भावना संमिश्र होत्या . जे पूर्वी कुणालाही जमले नाही ते आम्ही करून दाखवले त्याचा आनंद जरूर होता पण ही भावना नंतर शांतपणे विचार केल्यावर झाली. सुवर्णपदक हुकल्यामुळे दुख जास्त झाले.So near yet so far असे वाटून गेले. तथापि २०१९ साली आम्ही कांस्यपदक जिंकले होते आता एक पाऊल पुढे टाकले याचा निश्चित आनंद झाला ..
पोलंडच्या संघाचे यश कशामुळे?
पोलंड हा अतिशय लहान, अगदी भारतातील एखाद्या छोट्या राज्याइतका पण तेथील ब्रिजचा प्रसार इतका मोठ्या प्रमाणात आहे की तो जणू त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे. त्यामूळेच त्यांनी अनेक वेळा विश्वचषक जिंकला आहे .
भारतातील ब्रिजची सध्याची स्थिती काय आहे?
हा खेळ समजण्यास किमान सहा महिने लागतात आणि तेही थोडी वयाची परिपक्वता आल्यावर त्यामूळे वयाच्या खूप उशीरा ब्रिज खेळले जाते . खरं तर एकदा समजल्यानंतर इतका exciting आहे की माणूस खेळाच्या प्रेमात पडतो पण समजायला अवघड असल्याने तरुण पिढी ब्रिजकडे येत नाही. आम्ही ब्रिज शालेय पातळीवर शिकविण्यासाठी प्रयत्नशील आहोत पण हवे तसे आणि हवे तितके यश मिळत नाही . तरीही स्पोर्ट्स Authority Of India च्या आणि स्कूल गेम्स फेडरेशन च्या मदतीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. आजही जास्तीतजास्त खेळाडू हे ४०-५० वयाचे किंवा अधिक वयाचे आहेत आणि शिवाय हा खेळ श्रीमंत आणि शहरी लोकांचा मानला गेला आहे त्यामूळे सर्व सामान्य लोक ब्रिज कडे वळत नाहीत.
तुमच्या स्वतःच्या ब्रिज कारकिर्दीबद्दल
मी ८१ साली २३ व्या वर्षी खेळ सुरु केला आणि १९८६ पासून भारतीय संघाचा सभासद आहे . आज वयाच्या ६४ व्या वर्षी मी भारताकडून खेळतो आहे पण गम्म्त म्हणजे आपल्या संघाचा मी सर्वात जुनियर मेंबर आहे . आपल्या संघाचे सरासरी वय ६७ आहे ! मी सध्या संघटनेतही खेळाच्या प्रेमापोटी प्रशिक्षक म्हणूनही काम करत आहे. भारतीय महिला संघाचे नाशिक येथेच प्रशिक्षण शिबिर चालू आहे तेथे मीच प्रशिक्षण देत आहे. (ही चर्चा चालू असताना शेजारी बसलेले भारतीय ब्रिज संघाचे खजिनदार आणि महाराष्ट्राचे सेक्रेटरी हेमंत पांडे म्हणाले, ” आम्ही शिबीर आयोजित केल्यावर भारतीय संघातील महिला म्हणाल्या ब्रिज मघ्ये प्रशिक्षण शिबीर कशाला हवे ? पण अनिल पाध्ये यांनी दोनच दिवस प्रशिक्षण दिल्यानंतर महिला म्हणाल्या आम्हाला ब्रिज ची काहीही माहिती नाही हे आज अनिल पाध्ये यांचे प्रशिक्षण मिळाले तेव्हा कळले!)
ब्रिजचे फायदे आणि चांगले खेळण्यासाठी काय करायचे
ब्रिज ही नशा आहे .एकदा ब्रिज पटू झाला की तो खेळाच्या प्रेमात पडतो. बुद्धी कुशाग्र राहावी म्हणून , स्मृतिभ्रंश होऊ नये म्हणून आणि मेंदूला उत्तम खाद्य म्हणून ब्रिज सर्वोत्कृष्ट आहे म्हणूनच जगातील जास्तीतजास्त celebrities जसे बिल गेट्स आणि वोरन बफे ही ब्रिजवेडे आहेत. ब्रिज खेळाडूचा जगातील महान व्यक्ती बरोबर खेळाडू या नात्याने परिचय होतो. माझा बिल गेट्सबरोबर संवाद केवळ ब्रिज मुळे झाला आहे.
मन आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी तसेच ब्रिज खेळण्यासाठी वयाची अट नसल्याने माणूस सदा तरुण आणि चैतन्यमय राहण्यासाठी ब्रिज सारखा दुसरा खेळ नाही .
ब्रिज खेळाडू होण्यासाठी कोणतेही अवघड व्यायाम करायची गरज नाही फक्त योग आणि मेडितेशन केले तरी पुरे!