नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून ‘किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी’ ही मोहिम 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 24 एप्रिल 2022 रोजी ‘विशेष ग्रामसभे’चे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, जिल्ह्यातील सर्व प्रधानमंत्री किसान योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी 24 एप्रिल 2022 रोजी विशेष ग्रामसभेत विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. गंगाथरन डी. यांनी सांगितले आहे.
विशेष ग्रामसभेत पात्र शेतकऱ्यांनी भरून दिलेले अर्ज घेऊन सर्व संबंधित बँक यांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड 1 मे 2022 पर्यंत मंजुर होतील यादृष्टिने विहित पद्धतीनुसार कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी 1 मे 2022 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज भरून या योजनेचा लाभ घावा, असेही जिल्हाधिकारी श्री. गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.