रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – ज्ञानेश सोनार यांची कथामाला – तिरके बाणः हसऱ्या रेषांचे दिवस!

by Gautam Sancheti
जून 12, 2022 | 5:00 am
in इतर
0
IMG 20220611 WA0001

इंडिया दर्पण विशेष – ज्ञानेश सोनार यांची कथामाला
तिरके बाणः हसऱ्या रेषांचे दिवस!

एकीकडे दिवाळी अंकांतून मदमस्त व्यंगचित्रे रेखाटत असतांना तिरक्या रेषा हसरे बाण हा माझा हा व्यंगचित्र प्रात्यक्षिके व विनोदांनी भरलेला एक पात्री छान जोरात चालू होता. त्याआधी व्यावसायिक स्तरावर असा कार्यक्रम झालेला नव्हता. कोल्हापूर ते नागपूर, मुंबई ते सोलापूर, पुणे ते सांगली.. थोडक्यात महाराष्ट्रभर लोकांना मनमुक्त हसवीत होता. मिनिटा मिनिटाला पंचेस. मिनिटात व्यंगचित्र रेखाटले जाई. प्रेक्षकातला श्रोत्यांचे मिनिटांत कॅरिकेचर किंवा प्रेक्षकांनी मारलेल्या वेड्यावाकड्या रेषेवर अतिशय खुसखुशीत कार्टून श्रोत्यांना अचंबित करी.

Dnyanesh sonar
ज्ञानेश सोनार
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि लेखक
मो. 9860050016

अनेक कॉलेजेस मध्ये रिपीट कार्यक्रम झाले. कारण काय तर अनेक कॉलेजांत गॅदरिंगमध्ये गुंडागर्दी होई. ८०-९०चे ते दशक मोबाइल्स नव्हते टीव्ही प्रगत नव्हता. अनावर दौडणाऱ्या बाइक्स, तोंडावर फडके लावून स्कुटी हाकणा-या मुली नव्हत्या. चोरून चिठ्ठ्या चपाट्या मुलींना देण्याचे ते दिवस. कितीही श्रेष्ठ ज्येष्ठ लेखक वा वक्ता आला तर त्यांची भंबेरी मुले उडवीत. अशा ठिकाणी मला बोलावीत आणि प्रिन्सिपाॅल, स्टाफ निर्धास्त होई. स्टेजवर आल्यावर समोरच्या मुला मुलींना मी सांगे “तुमचे प्रिन्सिपॉल म्हणालेत, आमची काही मुले खोड्याळ आहेत त्यां मुलांना मी चॅलेंज देतो. “स्टेजवर येऊन ईझलवरील पेपरवर अशी रेष मारा अगदी कशीही, ज्यावर मला चित्र काढता येणार नाही!”

मग काय.. मुलींवर भास मारणारे हूड तरुण बोर्डवर रेष मारायला येत .समोरचा क्राऊड पाहून त्यांचा हात थरथरे. तेथे मी पंच टाकी. बघा बघा कागदावर साधी रेष मारायची तरी याचा हात थरथरतोय पण पोरीवर ‘लाईन’ मारायला सांगा.. यावर प्रचंड हास्यस्फोट होई. पोरगा आोशाळून कशीबशी रेष मारून सटके. त्या रेषेतून मी सुंदर तरुणी मिनिटात रेखाटी. प्रचंड टाळी मिळे.चार दोघांची अशी धुलाई केली की पुढचा कार्यक्रम खदखदून हसण्यात संपे. एका काॅलेज कार्यक्रमात महाभारतावर पी.एच.डी.केलेले विद्वान अध्यक्ष होते. त्यांच्या भाषणानंतर माझा कार्यक्रम होता.

महाभारतावर त्यांनी आढ्यतेचा बाज सांभाळीत उत्तम रटाळ भाषण केले. तेही फिरकीबाज कॉलेजीअन्स समोर.भाषणानंतर एका तरुणीने बोट वर केले व म्हणाली सर, प्रश्न विचारू..’प्लिज १०० कौरवांची नावे सांगा ना..? पीएचडी सरांना घाम फुटला.खूप वेळ ते एकट्या दुर्योधनाच्या मागे लपून बसले .ज्यांना नावे हवीत त्यानी मला नंतर संपर्क करावा असे म्हणत त्यांनी आवरते घेतले. नॉन करप्ट व अत्यंत शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे श्री. अरविंद इनामदार हे पीटीसी चे (पोलिस ट्रेनिंग सेंटर नाशिक ) प्राचार्य होते.तेथे कँडेट्ससाठी ते अनेक व्याख्यान आयोजीत करीत. काव्य, शास्त्र, विनोद यावर जास्त भर असे. हेतू असा की कॅडेट्सना केवळ पोलिस खाक्या बरोबर इतर क्षेत्राचेही ज्ञान असावे ,ज्ञानी गुणी विद्वज्जनांपुढे विनम्र व्हावे.

तेथे माझा कार्यक्रम पाचशे कॅडेटस समोर झाला. जे नंतर मोठे ऑफिसर्स झाले पण मी हसविलेले विसरले नाही. नंतर अनेकांनी तसे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात करतानाच मी त्यांना बजावले. कडक प्राचार्यांना घाबरुन हसू दाबू नका मन मोकळे हसा, टाळ्या वाजवा कारण कार्यक्रम त्यांनीच ठेवला आहे .यावर पोरं खदखदून हसली.कार्यक्रमात बायको जमातीवर मी अनेक ‘पंच’ टाकले. समारोप भाषणात इनामदार म्हणाले, सोनार साहेबांच्या धाडसाच खूप कौतुक वाटलं .आम्ही पोलिस इतरांसाठी वाघ असतो पण बायकोपुढे शेळी होतो. सोनार साहेबांनी सौ. सोनारांच्या समोर त्यांच्या फिरक्या घेतल्या! यावर टाळ्या पडल्या .मी मध्येच उभं राहून म्हटले,माझ्या भोवती एवढे प्रचंड पोलीस प्रोटेक्शन असताना घाबरायचं कशाला .. क्वचित आलेली संधी कधीच सोडायची नसते !” यावर डबल टाळ्या पडल्या .

मुंबईला एकदा माझीही फजिती झाली. हिंदू कॉलनीत माझे व्यंगचित्रकार मित्र वसंतराव गवाणकर रहात. तेथील एका महिला मंडळ दरवर्षी त्यांच्या स्नेहसंमेलनात मनोरंजनाचे कार्यक्रम घेत वसंतरावांनी माझे नाव सुचविले व त्यांनी मला निमंत्रित केले . यथाकाल कार्यक्रम सुरू झाला माझ्या पहिल्या एकदोन चित्रातच मी बाजीगर होत असे. दोन चार सहा चित्रे, विनोद केले समोरच्या हायफाय भगिनी एकदाही हसल्या नाही.चौकार षटकार ठोकणारा मी अस्वस्थ झालो .कार्यक्रम एकदाचा संपला मी हुश्श करून खुर्चीवर बसलो. आणि हा हा म्हणता त्या सुंदर ललनानी माझ्या भोवती गराडा घातला.

आणि “सोनारजी, तुम्ही सुंदर बोलता , काय सुंदर चित्र काढता एवढ्या सुंदर बायकां तुम्हाला कुठे भेटल्या? काय सुंदर कार्यक्रम झाला असा कार्यक्रम याआधी आम्ही एन्जाॅय केला नाही .. अस काही बाही म्हणू लागल्या . मी उचकून म्हणालो ,अहो पण मला कुणीही मनसोक्त हसताना दिसल नाही.एक पोक्त बाई पुढे येऊन म्हणाल्या ,सोनार साहेब, खी खी करुन तोंड वेंगाडून हसायलाआम्ही पुरुष नव्हत..आम्ही चित्रे व विनोद मनसोक्त एन्जॉय करत होतो. हसत होतोच मात्र गालातल्या गालात ..जेवण वसंतराव गव्हाणकरांच्या घरी होते .जेवताना मी घडलेला किस्सा सांगितला .वसंतराव महा मिस्किल .ते म्हणाले तुमचे नशीब कार्यक्रम पूर्ण तरी झाला.याआधी अनेक जण अर्धवट कार्यक्रम टाकून गायब झालेत .व. पु. काळे यांचा एक किस्सा सांगतो .वपुंचे दोन तीनदा कथाकथनाचे कार्यक्रम येथे झाले होते.महिला मंडळ एकदा म्हणाले व पु यावेळी वेगळं काहीतरी ऐकवा गडे..व पु पाघळले .म्हणाले, मी बऱ्यापैकी गातो चालेल ना ..?

वा वा चालेल ना! स्त्री मंडळ खुशीने म्हणालं .कार्यक्रमाला व. पु . मलमली झब्बा, वर व्हेलवेटचे जाकीट, शाल खांद्यावर घेऊन गायला बसले. दोन चार गाणी बऱ्यापैकी पार पडली . ते म्हणाले, आता गुळाच्या गणपतीतील पं. भीमसेनजींचे ‘इंद्रायणीकाठी गातो ‘ बायकांनी संमतीच्या टाळ्या वाजवल्या . गाणे तसे अवघड पण व. पुं नी पेललं . कडाडून टाळी पडली वन्स मोअर ची मागणी झाली .ते खूप खुश झाले पुन्हा ताना घेत त्यांनी दुस यांदा म्हटले .पुन्हा वन्स मोअर ची मागणी झाली.व पु ना शंका आली खरंच का तुम्हाला गाणं इतकं आवडलं ?त्यांनी विचारलं .पैठणील्या एका आजीबाईंनी त्यांना म्हटलं , व पूु जी जोवर तुम्ही चालीत गात नाही तोवर आम्ही वन्समोअर देणार आहोत.. चालू द्या .. (हा किस्सा किती खरा किती खोटा हे गवाणकर व. पु. व खट्याळ महिलाच जाणोत.)

कोल्हापूरचे डाॅ.अविनाश जोशी, श्री.रवींद्र उबेराॅय,गोकुळ चे श्री.अरुण नरके यांच्यामुळे ‘आम्ही रसिक मित्र मंडळा’ तर्फे कोल्हापूरला चारपाच कार्यक्रम झाले .शिवाजी महाराजांचे देखणेपण, धडधाकट मर्दानीपण महाराष्ट्राला दाखवणारे श्री. चंद्रकांत मांढरे व भाऊ सूर्यकांत शेजारी शेजारीच रहात.दोघेही देखणे होते अभिनय व प्रकृतीने दांडगे होते मात्र अत्यंत सत्त्वशील सहृदय होते . चंद्रकांतजी उत्तम चित्रकार होते.लँडस्केप्स अप्रतिम करीत.त्यांना भेटायला उत्सुक होतो . एका सकाळी दहा च्या दरम्यान त्यांची ‘ निसर्ग ‘ आर्ट गॅलरी पहायला रवींद्रजीं बरोबर त्यांच्याकडे गेलो.ते ऐसपैस वाड्यात रहात. चित्र गॅलरी व वाडा त्यांनी नंतर सरकारला अर्पण केला.(संतान नसल्याने) जी आजही स्थित आहे .चंद्रकांतजी साठीचे असावेत.सौम्य

चेहरा.धडधाकट बांधा शुभ्र धोतर त्यावर पांढरी शुभ्र बंडी,गळ्यात काळा दोरा उजव्या मनगटात चांदीचे कडे .मी नमस्कार केला ओळख दिली .ते मंदसे हसले त्यांना नाव बहुधा माहीत नसावे .” चला वर माडीवरच जाऊ!” त्यांच्या मागोमाग गेलो .छोट्या मोठ्या फ्रेम्समध्ये वाॅटरकलर मध्ये केलेली प्रसन्न लँडस्केप स्टम्प्स पावडर मध्ये केलेली दोन चार पोर्ट्रेट्स जे कॅमेऱ्याचे फोटोग्राफ्स वाटावेत इतके बेमालूम .लँडस्केप पन्हाळ्याच्या आसपासचेी निसर्गरम्य.एकेका लॅण्डस्केपची ते माहिती देत होते .कालच्या राजबिंडय़ा शिवाजी महाराजांना मी निरखीत होतो.दाराआडून क्षणभर त्यांच्या गोऱ्यापान पत्नींनी डोकावले.त्या क्षणभरातही त्यांचा घरंदाजपणा जाणवला.वाकून पायांना स्पर्श करीत मी म्हणालो , ” दादासाहेब, रात्री माझा व्यंगचित्र प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम ‘शाहू स्मारकात ‘ आहे .आपणास निमंत्रण द्यायला आलो आहे . आपण आलात तर खूप आनंद होईल!

“आताशा मी कार्यक्रमांना जात नाही पण पाहतो ” असे म्हणत त्यांनी मला छातीशी घेऊन थोपटले.क्षणभर शिवाजी महाराजांचा मला भास झाला कृतकृत्य वाटले…. सातला सुरू झालेला कार्यक्रम साडेआठ वाजता संपला .जाणकार रसिक श्रोत्यांपुढे कार्यक्रम करताना तो उत्तमच रंगतो .चंद्रकांतजी सपत्नीक पहिल्या रांगेत बसले होते .कार्यक्रम संपल्यावर मी खाली उतरलो .माझी पत्नी अनुराधा ही तेथे आली .आम्ही दोघांनी त्यांना व बाईसाहेबांना वाकून नमस्कार केला .प्रसन्न चेह-याने ते म्हणाले,ज्ञानेश,या व्यंगचित्र कलेची नवलाई मी प्रथमच पाहिली. मी थक्क झालो . चित्रांचे कौतुक करावे की तुमच्या विनोदी शैलीचे समजत नाही “।दादासाहेब, तुम्ही तर प्रत्यक्ष शिवाजी महाराज उभे केलेत. त्यांचे संवाद किती तोलामोलाने किती ताकदीने व सहजतेने आपण ऐकविले .

” अहो, ते लेखकाने लिहिलेले, आमची फक्त पोपटपंची !” त्यांच्या बोलण्यातला सहजभाव विनम्रता जाणवली . त्यांचे लक्ष अनुराधेकडे गेले.मी म्हटलं, ” माझी पत्नी अंनुराधा!”
ते हसले व उद्गारले, “अच्छा आता समजले तुमच्या चित्रांतली तरुणी इतकी देखणी कशी…” लाजलेल्या अनुला बाईंनी हसत हळूच थोपटले.
…नाशिकच्या ताज हॉटेलात एका हाय फाय क्लबची कॉन्फरन्स होती.पुरुष मीटिंगमध्ये व्यस्त तर बायकांमुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम होत होते .क्लबच्या काही सुंदर ललना माझ्या घरी आल्या.एकीने विचारले, “आपला कार्यक्रम हवा याल का ?”
येईन.. पण मी मानधन घेतो इतके इतके ..
” सर, आनंदाने देऊ गाडी पाठवतो !”

गाडी व ड्रायव्हर आहे माझ्याकडे उद्या पाचला येतो .ठरल्यावेळी ताजला गेलो एका हॉलमध्ये तीस चाळीस उंची साडय़ा, गळाभर दागिने ल्यायलेल्या तीस चाळीस बायका, त्यांची मुले दाटीवाटीने बसली होती .मुले असली की कार्यक्रमात त्यांच्या जोगी चित्रेही काढत असे. कार्यक्रम सुरू झाल्यावर हशा टाळ्यांचा गजर ऐकून सुटाबुटातली पुरुष मंडळीही गोळा झाली .सगळे खूश झाले. ” चला सर, हॉलमध्ये बसू! “एक सदस्य म्हणाले .

चमचमणा-या झुंबरांच्या प्रशस्त अशा भव्य हॉलमध्ये बसलो .सगळे कार्यक्रमाची स्तुती करत होते.जरा वेळाने क्लबचे सेक्रेटरी एक पाकीट हातात घेऊन आले .माझ्या हातात देत व पुन्हा मागे घेत म्हणाले ,सर क्लबतर्फे आम्ही आदिवासी पाड्यात शाळा चालवतो .आपले मानधन त्यांना डोनेट करावे ही विनंती..!चालेल ना ..अरेवा! अवश्य देता येईल की पण एक प्रश्न विचारू?
विचारा ना सर!
ताजमध्ये कॉन्फरन्स म्हणजे खर्च खूप आला असेल ना..शिवाय तीन दिवस कॉन्फरन्स ..
” हो ना सर एका फॅमिलीला जवळपास ८० हजारावर ! ”
त्यावर मी म्हटले, ” समजा शाळेसाठी आपण तीन दिवसांत एक ब्रेकफास्ट, लंच, किंवा डिनर न घेता डोनेट केले असते तर माझ्या मानधनाच्या दहापट पैसे देऊ शकला असता .. खरे की नाही जे आपण केलेले दिसत नाही.मात्र पाहुण्यांचे मानधन शाळेसाठी तुम्हाला हवेय.. थींक लॉजिकली..मंडळी भरपूर वरमली.चेहरे जमीनवर पडता पडता राहिले.

माझ्या हातात पाकीट देत सेक्रेटरी म्हणाले, सर, आम्ही चुकलो क्षमा करा.आजच्या कॉन्फरन्स मधला हा सगळ्यात मोठा लेसन आपण दिलात थँक्स !
लासलगावी दरवर्षी व्याख्यानमाला भरायची.एके वर्षी माझा कार्यक्रम ठरला .स्टेज समोर हजार बाराशे माणसे बसलेली. हॅालोजनच्या प्रकाशात परिसर लकाकत होता.मी श्रीगणेशा करून सुरवात केली न केली तोच लाइट गेली .असे बरेचदा घडे .आली का पंचायत ? दहा पंधरा मिनिटं मिट्ट काळोखात गेली .तसं गाव छोटं तेही अंधारलं होतं. आणि अचानक वीस पंचवीस गॅसबत्त्या स्टेज वर उत्साही कार्यकर्त्यांनी आणल्या .त्या प्रकाशात कार्यक्रम छान रंगला .विशेष म्हणजे अंधारातले श्रोते गायब झालेले नव्हते .

…पुण्याच्या केसरीवाड्यात एका गणपती उत्सवात कार्यक्रम ठरला.शैलेश टिळक यांनी निमंत्रित केले होते .लागूनच असलेल्या मोकळ्या मैदानात हजारेक लोक बसले होते .स्टेजच्या डाव्या हाताला बाप्पा बसले होते .त्यांनी माझे अनेक कार्यक्रम पाहिले होते पण सौजन्यमूर्ती असल्याने सहन करीत होते . त्यांना नमस्कार करून कार्यक्रमाची नांदी म्हटली .कार्यक्रम रंगला.. हजारातला एकही माणूस दोन तास हलला नाही.नेहमीप्रमाणे टाळ्या व हास्याचा पाऊस पडला.कार्यक्रम संपला .स्टेजवरून उतरून खाली रिकाम्या जागी एका खुर्चीवर बसलो .आजूबाजूला अंधारलेले हाेते .इतक्यात अंधारातून एक व्यक्ती पुढे झाली म्हणाली, वा! बढिया, बहोत खुब, मजा आला!मी चमकून पाहिले .प्रत्यक्ष नटसम्राट चित्तरंजन कोल्हटकर उभे होते .मी उठून वाकून नमस्कार केला.

” ज्ञानेशजी,दीड दोन तास कसे गेले समजले नाही .एकटा माणूस लाईटिंग, साजसंगीताची साथ नाही प्राॅम्पटर नाही. केवळ विलक्षण !असं म्हणत त्यांनी मिठीच मारली .” सर आपला किती दबदबा किती सुंदर अभिनय,संवादा वरील हुकूमत त्यापुढे माझा कार्यक्रम म्हणजे..मी नम्रपणे बोललो .अरे भल्या माणसा, दीड तासांचे नाटक करायचे तरआमच्या मागे पाच पन्नास माणस राबत असतात .त्यातून सतत धास्ती, नाटक लोकांना आवडेल का याची. मजा आया!कार्यक्रम खूपच विनोदी झाला .शेजारी शैलेश टिळक येऊन उभे होते .म्हणाले, विनोद तर वेगळाच आहे .पुणेरी माणूस दीड तास एका जागी बसून नाक न फेंदारता खदाखदा हसत होता !”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वीज पडून बैल ठार; सुदैवाने…शेतक-याचा मुलगा थोडक्यात बचावला

Next Post

बाबो! आला अतिशय शक्तिशाली स्मार्टफोन; एकदा चार्ज केल्यावर बॅटरी टिकणार तब्बल ९४ दिवस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
Oukitel WP19 e1654957840740

बाबो! आला अतिशय शक्तिशाली स्मार्टफोन; एकदा चार्ज केल्यावर बॅटरी टिकणार तब्बल ९४ दिवस

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011