इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– व्हिजन नाशिक – भाग ९
“विशेष काळजी घेणारे शहर”
मित्रांनो, आपण मागील लेखात नाशिकचे शैक्षणिक क्षेत्र आणि “एज्युकेशनल हब” बनण्याच्या क्षमतांविषयी आढावा घेतला. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला आहे. परंतु नाशिक मध्ये ‘विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग’ (चिल्ड्रेन विथ स्पेशियल नीड्स, CWSN) शिक्षणाची एकंदरीत काय परिस्थिती आहे? विशेष विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि गरजा काय असतात? त्यांचे शिक्षक आणि विशेष शाळांसमोर आव्हाने काय आहेत? चला बघूया…
विशेष गरजा असलेल्या मुलांना विशेष शाळेत विशेष शिक्षकांतर्फे विशेष शिक्षण दिले जाते आणि अश्या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. विशेष मुले म्हणजे अध्ययन अक्षमता, स्वमग्न, मतीमंद, गतीमंद, अंध, अंशतः अंध, कर्णबधिर, वाचादोष, अस्तिव्यंग, बहुविकलांग, इत्यादी २१ प्रकारच्या विशेष गरजा असलेले मूल. त्यांच्या मध्ये एक वेगळी आणि अनाकलनीय शक्ती असते म्हणून त्यांना अपंग न म्हणता दिव्यांग म्हणावे असे आपल्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितले तेव्हापासून या दिव्यांग बांधवांकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे समाजाचे विशेष लक्ष वेधले गेले.
नाशिकमध्ये आ. रजनीताई लिमये यांनी १९७७ साली ‘प्रबोधिनी ट्रस्ट’ चे इवलेसे रोपटे लावून मानसिक अपंग मुलांच्या विकासासाठी शिक्षणाची दारे उघडली, उत्तर महाराष्ट्रातील हि पहिली शाळा. ह्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधिनी विद्यामंदिर, सुनंदा केले विद्यामंदिर, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विशेष शिक्षक प्रशिक्षण केंद्र, बालमार्गदर्शन केंद्र बालवाडी, प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा, इत्यादी संस्था निर्माण करून दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी सजगपणे अथक प्रयत्नाची पराकाष्ठा केली. ह्या संस्थांमधून शेकडो विशेष मुले येथे केवळ शिक्षणच घेत नाहीत तर त्यांच्या क्षमता आणि गरजा ओळखून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध कार्यशाळेच्या माध्यमातून कौशल्यावर आधारित प्रशिक्षण हि दिले जाते. ही प्रशिक्षित विशेष मुले विविध कंपन्यांचे जॉबवर्क घेऊन अर्थार्जन देखील करीत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
आपल्या नाशिक मध्ये केवळ विशेष मुलींसाठी कार्यरत असणारी उत्तर महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव अशी सामाजिक संस्था म्हणजे ‘घरकुल परिवार संस्था’. विद्याताई फडके आणि त्यांच्या सहकार्यांनी स्थापन केलेल्या ह्या निवासी कार्यशाळेचे वैशिष्ठ्य म्हणजे अगदी सुरक्षा रक्षकापासून ते संपूर्ण व्यवस्थापन महिलांकडेच आहे, त्यामुळेच घरकुलात संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेल्या ह्या विशेष मुलींना अगदी घराप्रमाणे सुरक्षितता आणि मायेचा आधार मिळतो. महत्वाचे म्हणजे २४ तास समर्पित असे महिला सहकारीवृंद येथे असून ह्या विशेष मुलींना मानसिक आधारासोबतच, नियमित आरोग्य तपासणी, औषधोपचार, पोषक आहार वेळोवेळी दिला जातो, शिवाय त्यांना नृत्य, संगीत, योगा, ऐरोबिक्स चे प्रशिक्षण दिले जाते आणि कलात्मक कामे करण्यासाठी हि प्रवृत्त करतात. ह्या माध्यमातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील कलागुण, कौशल्याची वृद्धी आणि त्यांच्या क्षमतेनुसार कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येते. ह्या मुली गृहपयोगी आणि सजावटीच्या वस्तू, ग्रीटिंग्स, रंगीबेरंगी दिवे, पणती, आकाशकंदील आणि खाद्य पदार्थ हि तयार करतात, ह्या सर्व वस्तुंना खूप मागणी असते. महाराष्ट्र मध्ये विशेष मुलींची संख्या मोठी असून केवळ मुलींसाठी काम करणाऱ्या अश्या संस्था मात्र खूपच कमी आहेत.
गेल्या आठवड्यात एका सुखद बातमीने माझे लक्ष वेधून घेतले, आपल्या नाशिकच्या ‘पडसाद कर्णबधिर’ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन’ मार्फत नुकत्याच एम.आय.टी. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल मिशन- २०२३’ ह्या प्रशिक्षण कार्यशाळेत भाग घेतला होता. आणि ह्या विशेष विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक दुर्बलतेवर मात करीत त्यांना दिलेले उद्दिष्ट सांकेतिक भाषेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सहाय्याने अवघ्या १२ मिनिटांत पूर्ण केले. राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांमधून ‘पडसाद’ च्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा कोड मिळविला. पुण्यासह देशभरात अन्य ठिकाणी झालेल्या प्रशिक्षणात अनेक विद्यार्थी या सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांची देशपातळीवर परीक्षा होणार असून, यातील १०० विद्यार्थ्यांना चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट बनविण्याची संधी मिळणार आहे.
तामिळनाडूमधील कांचिपुरमजवळील पट्टीपुरम् येथून हे रॉकेट अवकाशात सोडले जाणार आहे. सुचेता ताई सौंदणकर यांनी ११९१ साली ‘पडसाद कर्णबधिर’ विद्यालयाची स्थापना केली, त्यांची विशेष मुलांच्या शिक्षणा बद्दलची संकल्पना अगदी सोपी आहे; सर्वाना मोफत आणि दर्जेदार शिक्षण. पडसाद येथील सर्व विशेष विद्यार्थी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील आहेत, सुचेता ताई आणि त्यांचे सहकारी झोपडपट्टी भागात जाऊन सर्वेक्षण करून कर्णबधिर विद्यार्थ्यांची नोंदणी करतात. अर्ली डिटेक्शन आणि इंटरव्हेंशन सेंटर मुले कर्णबधिर मुलांचे लवकर ओळख होऊन त्वरित उपचार करता येतात. श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी प्री-स्कूल, श्रवण चाचणी, श्रवण यंत्र, स्पीच थेरपी, उपचार आणि प्रशिक्षण देण्यात येते.
आज आपल्या नाशिक मध्ये विशेष मुलांच्या व्यक्तिमत्व व शैक्षणिक विकासासाठी वाहून घेतलेल्या आणि तळमळीने काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, ‘शासकीय अंध शाळा’, ‘नॅशनल असोसिएशन अंध (NAB) युनिट संचलित भावना चांडक महानॅब शाळा’, ‘द ब्लाइन्ड वेलफेयर ऑर्गनायझेशन (BWO)’, ‘श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय’, ‘जागृती कर्णबधिर निवासी विद्यालय’, ‘विकास मंदिर मूकबधिर विद्यालय’, गणेश सूर्यवंशी यांचे ‘श्री सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था’, डॉ. उमाताई बच्छाव यांचे ‘माईलस्टोन ट्रस्ट’, रोहिणीताई वाघ यांचे ‘प्रयास लर्निंग व थेरपी केंद्र’, ‘निरंजन बहुविकलांग केंद्र’, ‘प्राणा द हिलिंग ट्री फॉउंडेशन’, ‘ऐबीलिटी फॉउंडेशन’, देवळाली कॅम्प मधील ‘रुसी इराणी केंद्र’, ‘व्ही-एक्सएल एजुकेशन ट्रस्ट, चेन्नई’ संचलित (VLC) नाशिक लर्निंग सेंटर, ‘रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेन्ट व लर्निंग सेंटर’, सटाणा येथील काकासाहेब भामरे अपंग पुनर्वसन केंद्र इत्यादी.
अश्या विविध सरकारी, गैर-सरकारी संस्था (NGO), अनुदानित, विनाअनुदानित, ट्रस्ट संचलित अथवा खाजगी संस्था मार्फत विशेष मुलांकरीता देण्यात येणाऱ्या सेवां मध्ये ऑटिझम (स्वमग्न), मतिमंदता, सेरेब्रल पाल्सी, लर्निंग डिसॅबिलिटी, संवेदनाक्षमता, विकासात्मक बालरोग मूल्यांकन, IQ मूल्यांकन, सायको-शैक्षणिक मूल्यांकन, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपी, बालरोग, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, वर्तन समस्या, उपचारात्मक शिक्षण, दैनिक जीवन कौशल्य क्रियाकलाप, आणि पालक समुपदेशन इत्यादी संबंधित सेवांचा समावेश आहे.
ह्या क्षेत्रा विषयी काही जाणकार मंडळींशी चर्चा करतांना अश्या संस्थांना सतत येणाऱ्या काही समस्या देखील कळल्यात. दिव्यांग हे सुद्धा देशाचे नागरिक आहेत. सार्वजनिक जीवनात त्यांना विशेष सोयी सुविधा, रस्ते, रॅम्प, गरजेनुसार दर्जेदार शिक्षण, स्कॉलरशीप, विविध स्पर्धांचे आयोजन, पुरस्कार, आरक्षण, संरक्षण, रेस्टरूम, प्रवासात साहाय्य, साइन लँग्वेज, सामाजिक प्रबोधन, शासकीय योजना, रोजगार, व्यवसायासाठी कर्ज, विमा, एकाच छताखाली सर्व उपचार, मिळणे अत्यंत आवश्यक आहे. दिव्यांगांना उपयुक्त व गरजेची साधने, यंत्र-उपकरणे, औषधी, सहज आणि सवलतीत मिळावीत. सर्व प्रकारच्या दिव्यांगांची लवकर ओळख (अर्ली डिटेक्शन) होऊन त्यांचेवर त्वरित उपचार (औषधोपचार किंवा शस्रक्रिया) झाल्यास बऱ्याचदा अपंगत्वावर मात करता येऊ शकते.
सरकार आणि प्रशासन कडून दिव्यांगांकरिता काम करणाऱ्या संस्थांच्या अडी-अडचणी, परवाने, नूतनीकरण, अनुदान, विशेष शिक्षकांचे वेतन, विविध विभागांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव इत्यादी बाबींमध्ये सकारात्मतेने व प्राधान्याने लक्ष देऊन समस्या सोडविणे आणि सर्व संबंधित प्रक्रिया सुलभ व सुव्यवस्थित करणे अपेक्षित आहे. ह्या करीता आजच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन च्या युगात शासनाकडून सर्व प्रकारच्या दिव्यांगांचा डाटाबेस, त्यांचे पालकांशी नियमित संपर्क, दिव्यांग एक खिडकी योजना, कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित ऑनलाईन प्रक्रियेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आनंदाची बाब अशी की, आपले मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ह्याबाबत नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. दिव्यांग विकास मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार असून या मंत्रालयाच्या मार्फत दिव्यांगांकरिता विकास व कल्याणात्मक योजना राबवल्या जातील.
दिव्यांग व्यक्तींना समाजाने सहानभूती दाखविण्यापेक्षा त्यांना समाजामध्ये सामावून घेण्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीमध्ये कोणतातरी विशेष गुण असतो, तो गुण ओळखून त्यांच्यातील क्रियाशीलतेला वाव देऊन त्यांना आत्मनिर्भर करणे गरजेचे असते. अनेक गुणवान दिव्यांग खेळाडूंनी विविध स्पर्धांमधून जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय चमकदार कामगिरी करून त्यांचा कर्तृत्वाची दखल घेण्यास भाग पाडले आहे. परंतु खेळामध्ये करिअर करताना त्यांना सोयी सुविधांसाठी खूप झगडावे लागते, कारण दिव्यांग खेळाडूंकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदललेला नाही. शहरी भागात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील अश्या विशेष विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचून त्यांना सर्व सोयी सुविधा देऊन सक्षम करणे खूप गरजचे आहे. बऱ्याच संस्था ह्या केवळ संवेदनशील दानशूर व्यक्ती व सामाजिक क्षेत्रामंध्ये काम करण्याऱ्या संस्थाच्या माध्यमातून आणि कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी (CSR) फंडातून आपले समाजहिताचे उद्दिष्ठ पूर्ण करीत आहेत.
‘सुगम्य योजने’ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी आणि शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगस्नेही सुविधा निर्माण केल्याबद्दल आपल्या नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान देखील झालेला आहे. परंतु दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अजून खूप काम करायचे बाकी आहे. सरकार व प्रशासनाच्या सोबतीने सर्व संवेदनशील व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन जाणीवपूर्वक सकारात्मक प्रयत्नांती आपले नाशिक दिव्यांगांची “विशेष काळजी घेणारे सर्वोत्कृष्ठ शहर” बनवूयात आणि दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे अशा प्रकारची एक नवीन ओळख मिळवून देऊया.
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
– पियुष सोमाणी (सहलेखक – विशाल जोशी)
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Special Children’s Divyang Care Homes Schools Nashik by Piyush Somani