इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरातील विजया ममता थिएटरपासून टाकळी गावाकडे जाणाऱ्या डी.पी. रोड आणि मखमलाबाद रोडवरील रस्ते दुरुस्ती कामांची सखोल आज पाहणी आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी केली. या पाहणी दौऱ्यात शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या या रस्त्यांच्या स्थितीचा बारकाईने आढावा घेण्यात आला.
त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त-२ मा. प्रदीप चौधरी, सार्वजनिक बांधकाम (पंचवटी विभाग) चे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, नाशिक पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र बागूल, गुणवत्तानियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील तसेच पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील उपअभियंते, कनिष्ठ अभियंते आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
शहरातील प्रमुख रस्ते, डी.पी. रस्ते आणि अंतर्गत भागांमध्ये खड्डेमुक्तीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मक्तेदारांची नेमणूक करण्याची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रभागातील सर्व रस्त्यांवर खड्डे कुठे, किती आणि कोणत्या प्रकारचे आहेत याचे डिजिटल सर्वेक्षण करून त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम निश्चित करून कामांना त्वरित गती देण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.
रस्ते दुरुस्ती करताना प्रत्येक खड्डा योग्यरीत्या चौकोनी किंवा आयताकृती स्वरूपात कट करून, आवश्यकतेनुसार गुणवत्ता प्रमाणित खडी व डांबर वापरणे, योग्य compaction करून MPM पद्धतीने टिकाऊ दुरुस्ती केली जावी, यासाठी तांत्रिक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
या सर्व प्रक्रियेत दर्जा, सुरक्षितता आणि टिकाव याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, नागरिकांना खाचखळग्यांपासून मुक्त, गतीशील आणि सुरक्षित वाहतुकीचा अनुभव मिळवून देण्यासाठी नाशिक महानगरपालिका कटिबद्ध आहे. या कामात कुठलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, आणि दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर अथवा ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश आयुक्त मनिषा खत्री यांनी स्पष्टपणे दिले आहेत.