नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सामाजिक न्याय पर्व कालावधी राबविण्यात येत आहे. या कालावधीत राज्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त तथा नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राकेश पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्ह्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत 2023-2024 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी शिक्षण फीची प्रतीपूर्ती करण्याकरिता जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृमीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाइन अर्ज भरलेले नाहीत, त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावेत. त्याचप्रमाणे ऑनलाइन अपलोड केलेला अर्ज व मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रती व मुळ शपथपत्र जिल्हा जात पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत जमा करावेत.
अर्जदारांनी अर्ज भरताना स्वतःचा ई मेल व मोबाईल क्रमांकाद्वारेच अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समितीचा निर्णय किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे अर्जदाराने नोंदणी केलेल्या ई-मेल वर पाठवत असल्याने अर्जदारांनी आपला युझर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावे, असे आवाहन देखील उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चे सदस्य राकेश पाटील यांनी केले आहे.
प्रलंबित प्रकरणांसाठीही विशेष त्रुटी पुर्तता मोहिम
जिल्हा जात पडताळणी समिती नाशिक येथे 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे त्रुटी पूर्तते अभावी अर्जदारांकडे प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांना जिल्हा जात पडताळणी समिती मार्फत अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई मेलवर CCVIS – II प्रणालीद्वारे त्रुटी कळविण्यात आल्या आहेत.
त्रुटींची पूर्तता अद्यापपर्यंत ज्या अर्जदारांनी केलेली नसून त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांनी त्रुटीसह व मूळ कागदपत्रांसह 30 एप्रिल 2023 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत जिल्हा जात पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र, नाशिक येथे उपस्थित रहावे. ज्या अर्जदारांकडून वर नमूद कालावधीत त्रुटींची पूर्तता न झाल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चे सदस्य राकेश पाटील यांनी कळविले आहे.
Special Campaign for 11 and 12th science student