मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला आता बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी (२ व ३ जुलै) विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाचीही निवड होणार आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देशित केले आहे. शनिवारी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्यासाठी बोलविण्यात आले आहे. बहुमत चाचणीवेळी विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. विद्यमान सरकारकडे बहुमताचा आकडा आहे की नाही हे बहुमत चाचणीद्वारे ठरविले जाते. निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहात उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल ठरतो. राज्याच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. त्यामुळे बहुमतासाठी १४५ आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे.
बहुमत चाचणीमध्ये मतदान करायचे की नाही, याचा निर्णय आमदार स्वतः घेऊ शकतात. जेवढ्या आमदारांनी मतदान केले, त्याच निकषावर बहुमताचा आकडा ठरतो. बहुमत चाचणीसाठी आमदारांना व्यक्तिश: हजर राहावे लागते. तसेच सर्वांसमोर मतदान करावे लागते. बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, शीरगणतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतले जाते. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचे हा निर्णय राज्यपालांचा असतो.
Special Assembly session floor test Shinde Govt