डॉ. जितेंद्र नामदेवराव डोंगरे, येवला (एमबीबीएस एमडी, मानसोपचार तज्ञ)
जगभरात २४ मे हा दिवस स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून साजरा केला जातो. जनमानसात स्किझोफ्रेनिया व संबंधित आजारांची जागृती व्हावी याकरता हा दिवस पाळला जातो. डॉ. फिलिपी पिनेल या फ्रान्स येथील व्यक्तीच्या सन्मानार्थ या दिवसाचे महत्त्व आहे. ज्यांनी मानसिक आरोग्य व मानसिक रोगी यांच्याकरिता भरीव कामगिरी केली आहे. स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर स्वरूपाचा व जटिल होणारा मानसिक आजार असून योग्य वेळी व योग्य प्रकारचा उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रणात येऊ शकतो अथवा बरा होऊ शकतो. या आजाराची सुरुवात साधारणतः कुमारावस्थेतच्या शेवटी अथवा तारुण्याच्या पदार्पणात जास्त करून आढळून येते.
जगात दर शंभर व्यक्ती मागे एका व्यक्तीला स्किझोफ्रेनिया हा आजार होतो म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या एक टक्के लोक या आजाराने पीडित असतात. एकोणिसाव्या शतकापर्यंत स्किझोफ्रेनिया हा मेंदूशी निगडीत आजार आहे ही संकल्पना रूढ नव्हती. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मनोविकारावरील औषधोपचारात उत्क्रांती झाली व लक्षणे बरे होण्याचे प्रमाण वाढत गेले. २१ व्या शतकामध्ये या आजारावर बरेच संशोधन झाले व वेगवेगळी परिणामकारक औषधी ज्यांची साईड इफेक्ट कमी आहेत अशी आज आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत. स्किझोफ्रेनिया आजाराच्या लोकांना विचार, भावना, वर्तणूक, संभाषण संबंधी समस्या उद्भवतात. लक्षणांवर आधारित निकषावर ह्या रोगाचे निदान केले जाते.
प्रामुख्याने आढळणारी लक्षणे
– सकारात्मक लक्षणे (Positive symptoms) – मनात संभ्रम निर्माण होणे(Delusions) हा विचारांशी निगडीत लक्षण असून चुकीच्या व अस्तित्वात अथवा सत्तेत नसलेल्या गोष्टीवर ठाम दृढ विश्वास बसणे, विविध प्रकारचे भास होणे कानात आवाज येणे चित्र दिसणे संवेदना संबंधी भास होणे(Hallucinations).
– नकारात्मक लक्षणे(Negative symptoms)- स्पष्ट व ध्येय पूर्ण बोलणे संबंधी, मोटिवेशन ची कमतरता, मनातल्या भावना प्रकट न करता येणे, कशातच आवड निर्माण होणे.
– वर्तणूक संबंधी लक्षणे- स्वतःची काळजी न घेणे, भटकत राहणे, विचित्र हावभाव, विचित्र वागणे
– संज्ञानात्मक कार्य(Cognitive)- बिघडणे जसे की लक्ष विचलित होणे व स्मृतीमध्ये बिघाड, निर्णय क्षमता नसणे.
यासोबतच सामाजिक व व्यावसायिक आयुष्यात बिघाड आदी लक्षणे आढळून येतात. कमीतकमी एक महिने सलग लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ह्या आजाराचे निदान केले जाते.
सिझोफ्रेनिया आजाराची कारणे
हा आजार मेंदूतील रासायनिक ( केमिकल लोच्या) किंवा रचनात्मक बदल अथवा दोन्ही प्रकारचे बदल यामुळे होऊ शकतो. अनुवंशिकता, जनुकांमध्ये बदल, विविध प्रकारचे व्यसन असणे व जन्माशी निगडित काही आजार, दुखापत इत्यादी कारणांमुळे हा आजार होण्याची शक्यता असते. आयुष्यात घडलेल्या ताणतणावाच्या परिस्थितीचा ही ह्या आजारावर प्रभाव पडतो.
स्किझोफ्रेनिया वरील उपचार पद्धती
गेल्या दहा वर्षात स्किझोफ्रेनिया आजारावर विविध उपचार पद्धती व औषध औषधी यावर सखोल संशोधन झाले आहे. आज आपल्याकडे कमी साईड इफेक्टस असलेल्या गोळ्या (अँटीसायकॉटिक), इंजेक्शन्स, ECT शॉक ट्रीटमेंट, समुपदेशन व सायकोथेरपी इत्यादी द्वारे उपचार केले जातात. बरेचदा रुग्ण नातेवाईक औषधी गोळ्या घेण्यास नकार देतात अथवा उशीर करतात यामुळे आजार वाढत जातो व जटिल होत जातो.
वेळेवर उपचार केल्यास हा आजार आटोक्यात येऊ शकतो. काही गंभीर रुग्णांना आयुष्यभर औषधे घेण्याची गरज भासू शकते. काही अपवाद वगळता ह्या आजारातील व्यक्ती औषधी गोळ्या घेऊन समाजात मिसळणे, स्वतःची उपजीविका चालवणे व स्वतःची कुटुंबाची काळजी घेणे हे समर्थपणे करू शकतात. खूप कमी रुग्ण हे हिंसक व इतरांना व स्वतःला दुखापत करतील असे वागतात.
या आजाराला, लक्षणांना व संबंधित व्यक्तीला समजून घेऊन योग्य मार्गदर्शन उपचार व उपचार पश्चात पुनर्वसन करणे फार गरजेचे ठरते.वेळीच मानसोपचार तज्ञांना भेटा.
मो .नंबर – 7769033004