श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-४४
श्रीअरविंद:क्रांतिकारक ते महायोगी
पूर्ण योग
परंपरेला वाट पुसत, तिचा सन्मान करीत श्रीअरविंद हे योगविद्येतील एक नवीन प्रयोग करत होते. ऋषींची परंपरा सांगते की, विश्वात सर्वत्र एक वासुदेवच व्यापून आहे. दिसताना भिन्न भासणारी सर्व नाम व रूपे मूळ परमात्म्याच्या ठायी एकरूपच आहेत. ‘सुवर्णमणी जसा सुवर्णाला, कल्लोळ जसा पाण्याला तसा तू मला शरण ये’ असे भगवंत सांगतात. ही प्रक्रिया आरोहणाची (ascent) आहे. परमात्मा स्वतःच्या श्रीअरविंदांनी आरोहणाबरोबरच अवतरणाचीही (descent) प्रक्रिया प्रतिपादिली आहे. जीवाची शरणता आणि अभीप्सा (aspiration) इतकी उत्कट व्हावी की परमात्म-चेतनेने पार्थिव प्रकृतीत, जीवाच्या जीवपणात, जीवनात अवतरित व्हावे अशी श्रीअरविंदांची योगसाधना आहे.
कोणत्याही मर्यादित हेतूने नव्हे तर भगवंतासाठीच भगवंतावर प्रेम करणे, भगवंताच्या स्व-भावाशी आपला स्व-भाव एकरूप करणे आणि आपली इच्छाशक्ती, आपले कर्म आणि आपले जीवनच भगवंतांच्या हातातले साधन व्हावे यासाठी साधना करणे हा श्रीअरविंदांचा योग. यालाच पूर्णयोग असे नाव आहे. शरीर-मन-बुद्धीसह समग्र अस्तित्वामध्ये तसेच व्यक्ति, समष्टि आणि परमेष्टीमध्ये परिपूर्ण ईश्वरीय परिवर्तन घडवून आणणारा योग तो पूर्णयोग.
मानव ते देवमानव
पृथ्वीवरचे जीवन पाहिले तर ते क्रमशः उत्क्रांत होत आहे असे दिसते. अमीबापासून विकसित बुद्धीच्या मानवापर्यंत या उत्क्रांति-प्रक्रियेचा प्रवास झाला आहे. पण मानव हा या प्रवासातला अखेरचा टप्पा नव्हे. सत् , चित् आणि आनंद अशी ईश्वरी शक्ती उद्याच्या मानवात अधिकतेने प्रकटणार आहे. किंबहुना दीर्घ कालानंतर देवमानवांचा (superman) समाजच येथे अस्तित्वात येणार आहे. ही प्रक्रिया दीर्घ असली तरी साधनेने ‘याचि देही याचि डोळा’ मानवाचा देवमानव होणे शक्य आहे.
(क्रमशः)
Special Article ShreeArvind Part44