श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला – २
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद
इंग्लंडमध्ये शिक्षण
इंग्लंड येथे चौदा वर्षे श्रीअरविंद यांचे वास्तव्य होते. इ. स. १८८४ मध्ये लंडन येथील सेंट पॉल शाळेमध्ये ते शिकू लागले. श्रीअरविंदांनी मँचेस्टर आणि सेंट पॉल येथे असताना अभिजात साहित्य अभ्यासण्याकडे लक्ष पुरविले. अभ्यासाव्यतिरिक्तचा उरलेला सगळा वेळ ते अवांतर वाचन, विशेषत: इंग्लिश काव्य, साहित्य आणि कथाकादंबरी, फ्रेंच साहित्य आणि युरोपातील प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास अशा वाचनात व्यतीत करत असत. काही थोडा वेळ ते इटालियन, जर्मन आणि थोडेफार स्पॅनिश शिकण्यासाठी देत असत. ते बराचसा वेळ काव्यलेखनामध्ये व्यतीत करीत.
शाळेच्या अभ्यासासाठी फार कष्ट करायला हवेत असे त्यांना वाटत नसे, त्यामुळे शालेय अभ्यासासाठी त्यांना फारच थोडा वेळ खर्च करावा लागत असे. किंग्ज कॉलेजमध्ये असताना तर त्यांनी ग्रीक आणि लॅटिन काव्यासाठी असलेली सर्व पारितोषिके पटकाविली होती. त्यांचे ग्रीक, लॅटिन आणि इंग्लिश व फ्रेंच भाषांवर प्रभुत्व होते तसेच जर्मन आणि इटालियन या भाषांसारख्या इतर युरोपीय भाषादेखील त्यांना अवगत होत्या.
(क्रमश: …)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShriArvind Part 2 England Education