श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-२३
सर्वत्र कृष्ण दर्शन
(अलीपूर बॉम्ब खटल्यामधून श्रीअरविंद घोष यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, त्यानंतर कलकत्त्यामधील उत्तरपारा येथे, ‘धर्मरक्षिणी सभे’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दि. ३० मे १९०९ रोजी श्रीअरविंद यांनी जे भाषण केले, ते ‘उत्तरपाराचे भाषण’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या भाषणात ते आपल्या कारावासातील दिवसांविषयी सांगत आहेत…)
”मी सुटून येणार हे मला माहीत होते. अटकेचे एक वर्ष एकांतवास व अभ्यास यासाठीच होते जणू! ‘ईश्वरा’च्या हेतुनुरुप जितका वेळपर्यंत राहणे आवश्यक होते त्यापेक्षा अधिक वेळपर्यंत मला कोण तुरुंगात ठेवू शकणार होते? ईश्वराने मला एक संदेश सांगण्यासाठी म्हणून दिला होता आणि माझ्यावर एक कार्य सोपविले होते; आणि जोपर्यंत मी तो संदेश पोहोचवीत नाही तोपर्यंत कोणतीही मानवी शक्ती मला गप्प बसवू शकणार नाही, हे मला माहीत होते. तसेच जोपर्यंत ते कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत ईश्वराच्या माध्यमाला कोणीही अडवू शकणार नाही, मग ते माध्यम कितीही दुर्बल असो वा लहान असो, हेही मला माहीत होते.
“…ज्यावेळी मला पकडून लालबझार पोलीस ठाण्यात नेण्यात आले तेव्हा क्षणभर माझी श्रद्धा डळमळीत झाली होती कारण, त्याचे प्रयोजन काय आहे ते मला समजेना. त्यामुळे क्षणभर मी स्तंभित झालो होतो आणि मी हृदयापासून ईश्वराला टाहो फोडला आणि म्हणालो, ‘‘माझ्या बाबतीत हे काय घडले आहे? माझ्या देशातील लोकांकरता कार्य करण्यात जीवन व्यतीत करावे असे मी म्हणत होतो व ते कार्य पुरे होईपर्यंत तू माझे रक्षण करशील असा माझा विश्वास होता. तर मग मी येथे का? आणि असला आरोप माझ्यावर का करण्यात आला आहे?’’ एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले, नंतर माझ्या अंत:करणातून एक ‘आवाज’ आला, ‘‘स्वस्थ रहा आणि पाहा.’’ तेव्हा मग मी शांत होऊन स्वस्थपणे वाट पाहू लागलो.
“मला लालबझारहून अलीपूरला नेण्यात आले व एक महिन्याकरता लोकांपासून दूर अशा एकांत कोठडीत ठेवण्यात आले. तेथे मी माझ्या अंतरीच्या ईश्वराच्या आदेशाची अहोरात्र वाट पाहिली. ईश्वर मला काय सांगणार आहे, मला काय कार्य करायचे आहे हे समजावे म्हणून वाट पाहिली. या एकांतवासामध्ये मला अगदी सुरुवातीलाच ईश्वराचा साक्षात्कार झाला आणि पहिला पाठ मला मिळाला. त्या वेळेस मला आठवण झाली की, माझ्या अटकेच्या सुमारे एक महिन्यापूर्वी ‘सर्व कार्य बाजूला ठेवून मी एकांतवासात जावे आणि ईश्वराशी अधिक सान्निध्य घडावे म्हणून, स्वत:मध्ये डोकावून पाहावे’ अशी मला आज्ञा झाली होती, पण मी त्यासाठी तेवढा समर्थ नव्हतो आणि ती आज्ञा स्वीकारू शकलो नाही. माझे तेव्हा चालू असलेले कार्यच मला जास्त प्रिय होते आणि हृदयातील अभिमानामुळे मला वाटले की, मी इथे नसेन तर कार्याचे नुकसान होईल, इतकेच नव्हे तर, त्यात अपयश येईल किंवा ते थांबेल; त्यामुळे मी ते कार्य सोडणार नाही.
“मला असे वाटते आहे, ईश्वर पुन्हा एकदा माझ्याशी बोलला आणि म्हणाला की, ‘‘जी बंधने तोडण्याचे सामर्थ्य तुझ्याकडे नव्हते ती तुझ्याकरता मी तोडली आहेत. कारण तू करत आहेस ते कार्य तसेच चालू रहावे, अशी माझी इच्छा नाही आणि तसा माझा कधीच हेतूदेखील नव्हता. मला तुझ्याकडून दुसरीच गोष्ट करून घ्यायची आहे. ती गोष्ट तुला स्वत:ची स्वत:ला शिकता येणार नाही म्हणून ती शिकवण्यासाठी मी तुला येथे आणले आहे. माझ्या कार्यासाठी तुला प्रशिक्षित करण्यासाठी म्हणून मी तुला येथे आणून ठेवले आहे.’’
“… तुरुंगावरील अधिकाऱ्यांची मने त्याने माझ्याकडे वळविली आणि त्यांनी प्रमुख इंग्रजी तुरुंगाधिकाऱ्याला सांगितले, ‘‘या बंदिवासात त्याचे हाल होत आहेत; सकाळ संध्याकाळ निदान अर्धा तास तरी त्याला कोठडीबाहेर फिरू द्यावे.’’ त्याप्रमाणे व्यवस्था केली गेली आणि अशाप्रकारे एकदा बाहेर फिरत असताना ‘ईश्वरी’ शक्ती पुन्हा एकदा माझ्यात प्रविष्ट झाली. लोकांपासून मला दूर करणाऱ्या तुरुंगाकडे मी पाहिले, तेव्हा मला बंदिवान करणाऱ्या त्या तुरुंगाच्या उंच उंच भिंती नव्हत्या, तर ‘वासुदेवा’नेच मला वेढले होते. माझ्या बराकीसमोर असलेल्या वृक्षांच्या फांद्याखालून मी फिरत असे तेव्हा, तेथे तो वृक्ष नसून, तो साक्षात ‘वासुदेव’च आहे, माझ्यावर ‘श्रीकृष्ण’च त्याची छाया धरून उभा आहे, असे मला जाणवत असे. मी माझ्या कोठडीच्या लोखंडी दरवाजांच्या गजांकडे पाहिले आणि तेथेही मला पुन्हा ‘वासुदेव’च दिसू लागला. तो ‘नारायण’ पहारेकरी म्हणून उभा होता आणि माझे रक्षण करत होता. मला बिछाना म्हणून दिलेल्या खरबरीत कांबळ्यावर मी झोपलो तेव्हा ‘श्रीकृष्णा’च्या – माझ्या सख्याच्या, माझ्या प्रेमिकाच्या – बाहुंमध्ये मी पहुडलो असल्याचे मला जाणवले. ईश्वराने मला जी सखोल दृष्टी दिली त्याचे हे पहिले प्रत्यंतर होते. मी तुरुंगातील कैद्यांकडे, चोर-दरोडेखोरांकडे, खुनी माणसांकडे, ठग लोकांकडे पाहिले आणि पाहतो तर काय, मला ‘वासुदेवा’चे दर्शन झाले. मला त्या तमोमय जिवांमध्ये व दुर्वर्तनी शरीरांमध्येदेखील ‘नारायण’च दिसला.’’
“खालच्या कोर्टात खटला सुरु होऊन, जेव्हा आम्हाला मॅजिस्ट्रेटसमोर उभे केले गेले तेव्हाही माझी ती अंतर्दृष्टी टिकून होती. ‘तो’ मला म्हणाला, ‘‘जेव्हा तुला तुरुंगात टाकण्यात आले होते तेव्हा तू उद्विग्न होऊन, माझा धावा करत होतास आणि मला म्हणालास ना की ‘कुठे आहे तुझे संरक्षण?’ तर पाहा आता या मॅजिस्ट्रेटकडे, पाहा त्या फिर्यादीच्या वकिलाकडे.’’ मी मॅजिस्ट्रेटकडे पाहिले आणि मला मॅजिस्ट्रेट न दिसता, त्यांच्याजागी ‘वासुदेव’च दिसू लागला. न्यायासनावर साक्षात ‘नारायण’च बसला आहे असे मला दिसू लागले. मी फिर्यादी वकिलाकडे पाहिले, तर तेथे मला खटल्याचे कामकाज चालविणारा वकील दिसले नाहीत तर त्यांच्याऐवजी ‘श्रीकृष्ण’च तेथे बसलेला दिसला. माझा प्रेमी आणि माझा सखा तेथे बसला होता आणि माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होता. ‘तो’ मला विचारू लागला, ‘‘अजूनही तुला भीती वाटते? अरे, सर्व माणसांच्या हृदयात मीच वसत आहे आणि त्यांचे आचार-विचार, त्यांची वाणी यांवर माझीच सत्ता चालते. मी तुझा पाठीराखा आहे, त्यामुळे तुला आता घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुझ्या विरुद्धचा हा खटला माझ्या हाती सोपवून दे. हा खटला तुझ्यासाठी नाही. या खटल्यासाठी मी तुला येथे आणलेले नाही, तुला येथे मी अन्य काही कारणासाठी आणले आहे. माझ्या कार्यासाठी हा खटला हे केवळ एक निमित्त आहे. त्याहून अधिक काही नाही.’’
आणि पुढे यथावकाश अरविंद घोष यांची निर्दोष सुटका झाली.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Sarvatra Shrikrishna Part23