श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-३८
श्रीअरविंद : क्रांतिकारक ते महायोगी
श्रीअरविंद आश्रमाची स्थापना
( श्रीअरविंद स्वत: आश्रमाच्या स्थापनेविषयी खुलासा करत आहेत. श्रीअरविंद स्वत:च्या नावाचा उल्लेख, त्रयस्थ व्यक्तीचा उल्लेख करावा त्याप्रमाणे, ‘श्रीअरविंद’ असाच करत असत. हे कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.)
श्रीअरविंद राजकारण-संन्यास घेऊन, सुरुवातीला पाँडिचेरी येथे चार-पाच शिष्यांसमवेत राहात होते. कालांतराने त्यांच्या आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यासाठी येणाऱ्या साधकांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि ती संख्या एवढी वाढली की, उच्चतर जीवनासाठी सर्वस्वाचा त्याग करून आलेल्या या साधकांच्या निर्वाहासाठी आणि त्यांना सामूहिक मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून साधकपरिवाराची रचना करणे अत्यावश्यक ठरले. अशा रीतीने, ‘श्रीअरविंद आश्रमा’ची स्थापना झाली. ती करण्यात आली असे म्हणण्यापेक्षा, श्रीअरविंदांभोवती केंद्र म्हणून त्याची स्वाभाविकपणे वाढ होत गेली, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
सुरुवातीला आश्रम नव्हता. तर काही थोडे लोक श्रीअरविंदांपाशी येऊन राहू लागले आणि साधना करू लागले. कालांतराने जेव्हा श्रीमाताजी जपानहून परतल्या, तेव्हा त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला. श्रीअरविंदांचा किंवा श्रीमाताजींचा तसा काही हेतूही नव्हता किंवा तसे काही नियोजनही नव्हते, पण बऱ्याच साधकांना त्यांचे समग्र आंतरिक व बाह्य जीवन श्रीमाताजींवर मोठ्या विश्वासाने सोपवायचे होते आणि त्यामधूनच त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला.
दरम्यानच्या काळात, श्रीमाताजी फ्रान्स आणि जपानमधील दीर्घ वास्तव्यानंतर दि. २४ एप्रिल १९२० रोजी पाँडिचेरीला परतल्या आणि त्यानंतर मग अनुयायांची संख्या वेगाने वाढू लागली, असे दिसून आले. (१९२६ साली फक्त २४ साधक होते, पण लवकरच ती संख्या वाढत गेली. १९२७ मध्ये ती संख्या ३६ झाली आणि नंतरच्या वर्षांत ती संख्या ८५ झाली… आज त्याचे स्वरूप विशाल झाले आहे.) जेव्हा आश्रम विकसित होऊ लागला तेव्हा त्याची व्यवस्था लावण्याची जबाबदारी श्रीमाताजींवर आली. श्रीअरविंद लवकरच एकांतवासामध्ये निघून गेले आणि आश्रमाची सारी भौतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी श्रीमाताजींवर आली.
दर्शन दिवस
चरित्र लेखक श्री. के. आर. श्रीनिवास अय्यंगार त्यांच्या श्रीअरविंद-चरित्रामध्ये नमूद करतात की, “योगाचे स्वामी (श्रीअरविंद) आता दृश्य-पटलाच्या मागे सरकले होते आणि श्रीमाताजींनी शिष्यांच्या साधनेची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती आणि आता ‘श्रीअरविंद आश्रम’ औपचारिकरित्या अस्तित्वात आला होता.” श्रीअरविंदांचा एकांतवास हा अगदी निरपवाद (absolute) असा नव्हता. कारण ते वर्षातून तीनवेळा साधकांना दर्शन देत असत.
दि. २१ फेब्रुवारी (श्रीमाताजींचा जन्मदिवस),
दि. १५ ऑगस्ट (श्रीअरविंद यांचा जन्मदिवस)
आणि दि. २४ नोव्हेंबर (सिद्धी दिन) या तीन दिवशी ते साधकांना दर्शन देत असत. पुढे १९३९ नंतर, दि. २४ एप्रिल हा दिवसही ‘दर्शनदिन’ म्हणून साजरा व्हायला सुरूवात झाली. (श्रीमाताजी नित्यासाठी पाँडिचेरी येथे वास्तव्यास आल्या तो हा दिवस.)
श्रीमाताजी आणि एकदोन निवडक साधक, श्रीअरविंदांच्या कायम संपर्कात असत. आणि श्रीअरविंद साधकांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पत्रांच्या माध्यमातून देत असत. त्यांची आश्रमीय जीवनामधील आस्था पूर्वीप्रमाणेच कायम होती पण त्याचे रूप मात्र बदलले होते.
प्रचंड पत्रव्यवहार
श्रीअरविंद १९३३ साली लिहिलेल्या एका पत्रामध्ये नमूद करतात की, ”सामान्य पत्रव्यवहार, असंख्य अहवाल या सगळ्यामध्ये मला बारा बारा तास खर्च करावे लागतात हे तुमच्या लक्षात येत नाही. दुपारी तीन तास आणि सकाळी ६ वाजेपर्यंत आख्खी रात्र मी यामध्ये गुंतलेला असतो.” साधकांबाबत आपल्याला जे कार्य करायचे आहे त्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग या दृष्टिकोनातून श्रीअरविंद या पत्रव्यवहाराकडे पाहत असत.
श्रीअरविंद म्हणतात, ‘माझा हा पत्रव्यवहार म्हणजे माझ्या मुख्य हेतूच्या दिशेने नेणारे एक प्रभावी साधन होते आणि म्हणूनच मी त्याला इतके महत्त्व देत असे. (प्रत्येकावर या पत्रव्यवहाराचा काही ना काही सकारात्मक परिणाम होत असे, त्याविषयी सांगून झाल्यावर श्रीअरविंद म्हणतात,) अर्थातच हा केवळ पत्रव्यवहाराचा परिणाम होता असे नाही तर त्या पत्रव्यवहाराच्या पाठीमागे, जडभौतिक प्रकृतीवर ‘शक्तीचा’ जो दाब (pressure) वाढत चाललेला होता, ती शक्तीच हे सारे करू शकत होती, परंतु तरीही त्यास एक योग्य वळण देणे आवश्यक होते आणि त्या पत्रव्यवहारातून तो हेतू साध्य झाला.”
श्रीअरविंदांच्या प्रकाशित झालेल्या पत्रव्यवहाराची पृष्ठसंख्या पाहिली तर ती संख्या दोन हजार छापील पृष्ठसंख्येपेक्षा अधिक आहे.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part38