श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-३२:
श्रीअरविंद क्रांतिकारक ते महायोगी:
आर्य मासिकाचा शुभारंभ
योगी श्रीअरविंद आणि मीरा व पॉल रिचर्ड्स यांनी मिळून ‘आर्य’ नावाचे मासिक काढावयाचे ठरविले. १५ ऑगस्ट १९१४ रोजी ‘आर्य’ या तत्त्वज्ञानात्मक मासिकाच्या प्रकाशनाला आरंभ केला. त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था लावण्याची जबाबदारी सुश्री मीरा यांनी आपल्या खांद्यावर घेतली. वर्गणीदारांची यादी त्यांनी स्वत: लिहून काढली. त्या जमाखर्च ठेवू लागल्या. ‘आर्य’च्या फ्रेंच आवृत्तीसाठी पॉल रिचर्डस् हे श्रीअरविंदांचे लिखाण फ्रेंचमध्ये अनुवादित करत. त्या कामातही मीरा त्यांना मदत करू लागल्या….
नंतर श्रीअरविंदांचे बहुतेक सगळे मुख्य लिखाण, म्हणजे Isha Upanishad, Essays on the Gita, Life Divine, The Synthesis of Yoga हे ‘आर्य’ या नियतकालिकामध्ये क्रमशः प्रकाशित होत असे. योगसाधना करत असताना त्यांच्यामध्ये ज्या आंतरिक ज्ञानाचा उदय झाला ते ज्ञान या ग्रंथांमध्ये शब्दबद्ध झाले आहे.
त्यांचे इतर लिखाण हे भारतीय सभ्यता व संस्कृतीचे महत्त्व आणि तिचा आत्मा, वेदांचे रहस्य, मानवी समाजाची प्रगती, काव्याचा विकास आणि त्याचे स्वरूप, मानवी वंशाच्या एकात्मतेची शक्यता या विषयांशी संबंधित आहे. इंग्लंडमध्ये व बडोद्यात असताना आणि नंतर राजकीय चळवळीच्या कालावधीमध्ये आणि पाँडिचेरीच्या वास्तव्यामधील पहिल्या काही वर्षांमध्ये त्यात आणखी काही कवितांची भर पडली, अशा सर्व कविता त्यांनी याच सुमारास प्रकाशित करण्यास सुरुवात केली.
मात्र दि. २२ फेब्रुवारी १९१५ पॉल व मीरा यांना फ्रान्सला जाण्यासाठी निघावे लागले; निमित्त होते पहिल्या महायुद्धाचे. आता दर महिन्याला ६४ पाने लिहिण्याची जबाबदारी एकट्या श्रीअरविंदांवर येऊन पडली होती.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind part32