श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-२७
राजकारणाचा त्याग
श्रीअरविंद ह्यांनी बंगाल सोडले तेव्हा, अधिक अनुकूल परिस्थिती मिळाली की, राजकीय क्षेत्राकडे परतावे, असा काहीसा त्यांचा इरादा होता. पण लवकरच त्यांनी हाती घेतलेल्या आध्यात्मिक कार्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले आणि आपल्या साऱ्या ऊर्जा निरपवादपणे याच कामी पूर्णतया लावाव्या लागणार आहेत, हे त्यांना दिसून आले. आणि अंतिमतः त्यांनी राजकारणाशी असलेले सारे संबंध तोडून टाकले; राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून वारंवार करण्यात आलेल्या साऱ्या विनवण्या त्यांनी नाकारल्या आणि ते राजकारणापासून पूर्णपणे दूर झाले.
आपल्या राजकारणातून दूर जाण्याचे कारण श्रीअरविंदांनी पुढे एकदा स्पष्ट केले. ते म्हणतात, “मला राजकारणात काही करता येण्यासारखे नव्हते म्हणून मी राजकारण सोडले असे म्हणता येण्यासारखे नाही, अशी कल्पना देखील माझ्यापासून कोसो दूर आहे. मी त्यापासून दूर आलो कारण कोणत्याही गोष्टीची माझ्या योगसाधनेमध्ये मला लुडबूड नको होती आणि याबाबतीत मला अगदी निश्चित असा ‘आदेश’ प्राप्त झाला होता. मी राजकारणाशी असलेले संबंध पूर्णत: तोडून टाकले कारण तसे करण्यापूर्वी मला याची आतूनच जाणीव झाली होती की, मी जे कार्य तिथे हाती घेतले होते ते पुढे चालविले जाणारच आहे, मी ज्या दिशेने त्या कार्याचा विचार केला होता, त्याच दिशेने इतरांकडून केले जाणार आहे, आणि मी ज्या कार्याला सुरुवात केली होती त्या चळवळीचा माझ्या प्रत्यक्ष वैयक्तिक कृतीविना किंवा माझ्या उपस्थितीविनाही अंतिम विजय होणारच, हे मला ज्ञात होते. माझ्या निवृत्तीमागे निरर्थकतेची कोणतीही भावना किंवा नैराश्याची यत्किंचितही प्रेरणा नव्हती.
अज्ञातवासात
फेब्रुवारी १९१० मध्ये श्रीअरविंद घोष चंद्रनगर येथे अज्ञातवासामध्ये निघून गेले. तेथे त्यांचे वास्तव्य श्री. मोतीलाल रॉय यांच्या फर्निचरच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये होते. त्यांनीच श्रीअरविंदांच्या अज्ञातवासाची सर्व व्यवस्था केली होती. चंद्रनगर येथे श्रीअरविंदांचे सुमारे दीड महिना वास्तव्य होते.
मोतीलाल रॉय म्हणतात
श्रीअरविंद घोष यांचा आपल्या मनावर कोणता ठसा उमटला त्याचे वर्णन श्री. मोतीलाल यांनी करून ठेवले आहे. ते लिहितात : “श्रीअरविंद घोष म्हणजे पूर्णतः समर्पित झालेली अशी व्यक्ती होती. ते जेव्हा बोलत असत तेव्हा त्यांच्या माध्यमातून दुसरेच कोणीतरी बोलत असावे असे वाटत असे. मी एकदा त्यांच्या समोर जेवणाचे ताट ठेवले; त्यांनी नुसतेच माझ्याकडे पाहिले आणि अगदी यांत्रिकपणाने त्यातील थोडे अन्न ग्रहण केले.” खात असतानासुद्धा ते ध्यानमग्न असल्यासारखेच वाटत होते. ते उघड्या डोळ्यांनी ध्यान करत असत आणि त्यावेळी त्यांना विविध सूक्ष्म आकार आणि आध्यात्मिक दृश्यं दिसत असत. चंद्रनगर येथील वास्तव्यामध्ये त्यांची साधना मोठ्या तीव्रतेने चालू होती. ध्यानावस्थेत त्यांना सूक्ष्म जगतांची दृश्ये दिसत असत. तेथे ध्यानामध्ये त्यांना तीन देवतांचे दर्शन घडत असे. त्या देवता म्हणजे वेदांमध्ये वर्णिलेल्या ‘इला, मही (भारती) आणि सरस्वती’ होत्या, असे त्यांना पुढे त्यांच्या पाँडिचेरी येथील वास्तव्यात ज्ञात झाले.
चंद्रनगर येथील वास्तव्यामध्ये श्रीअरविंद घोष हे, त्यांना काय हवेनको ते पाहणाऱ्या एकदोन सहकाऱ्यांखेरीज आणि मोतीलाल रॉय यांच्याखेरीज कोणालाही भेटले नाहीत.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part27