श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला:
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-२२
स्वामी विवेकानंद यांचे मार्गदर्शन
अलिपूरच्या कारावासात असताना श्रीअरविंद घोष यांनी ‘भगवद् गीता’प्रणीत योगमार्गाची साधना केली आणि उपनिषदांच्या साहाय्याने ध्यान केले. केवळ याच ग्रंथांमधून त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांना कोणता एखादा प्रश्न पडला वा अडचण आली तर ते गीतेकडे वळत असत आणि बहुतेक वेळा त्यांना त्यातून उत्तर वा साहाय्य मिळत असे.
कारावासामध्ये असताना, एकांतात त्यांची जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा (१५ दिवस) त्यांना सातत्याने स्वामी विवेकानंदांची ‘वाणी’ ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी त्यांच्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सागंण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली होती.
स्वामी विवेकानंदांनी आपल्याला अंतर्ज्ञानात्मक स्तर दाखवून दिला आणि त्यासंबंधी प्रशिक्षण दिले असे श्रीअरविंद यांनी पुढे एकदा शिष्यवर्गाशी बोलताना सांगितले होते.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part22