श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-१४ः
नव्या पक्षाची स्थापना
स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल हे त्याकाळी त्यांच्या ‘न्यू इंडिया’ या साप्ताहिकामधून स्वयंसाहाय्यता आणि असहकार धोरणाचा प्रचार-प्रसार करत असत, त्यांनी आता ‘वंदे मातरम्’ नावाचे दैनिक काढले, पण अर्थातच हे साहस अल्पकालीनच ठरणार होते. कारण स्वत:च्या खिशातल्या ५०० रू. च्या आधारे त्यांनी हे साहस आरंभले होते आणि भविष्यामध्येही आर्थिक साहाय्य मिळण्याची कोणतीही शाश्वती नव्हती. आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती त्यांनी श्रीअरविंद घोष यांना केली आणि त्यांनीही त्याला तात्काळ संमती दिली कारण आपल्या क्रांतिकारक हेतुंचा सार्वजनिकरित्या प्रचार-प्रसार करण्यास आरंभ करण्याची हीच संधी आहे असे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी काँग्रेसमधील पुरोगामी विचारसणीच्या युवकांच्या समूहाची एक बैठक बोलाविली आणि त्या सर्वांनी एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करून, उघडपणे समोर यायचे असे ठरविले. त्यासाठी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या, महाराष्ट्रातील समानधर्मा गटाबरोबर हातमिळवणी करायची आणि कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये आधीच नामोहरम झालेल्या मवाळ पक्षाशी दोन हात करायचे असे त्यांनी ठरविले.
नव्याने स्थापन झालेल्या या पक्षाचे प्रयोजन आणि कृतिकार्यक्रम यांचा प्रचार करण्यासाठी बिपिन चंद्र पाल गावोगावी जात असत तेव्हा, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये श्रीअरविंदांचे मार्गदर्शन या दैनिकाला लाभत असे. अल्पावधीतच हा नवा पक्ष एकदम यशस्वी झाला आणि ‘वंदे मातरम्’ हे वृत्तपत्र भारतभर वितरित होऊ लागले.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part 14