श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला:
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-९:
विवाह आणि टिळकांची भेट
श्रीअरविंद घोष यांचा विवाह ३० एप्रिल १९०१ रोजी श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी – मृणालिनीदेवी – यांच्याशी झाला. परदेशगमन करून आलेल्या श्रीअरविंदांचे, तत्कालीन प्रथेनुसार शुद्धीकरण (प्रायश्चित्त विधि) करण्याचा प्रसंग समोर उभा ठाकला, प्रागतिक विचारसरणीच्या श्रीअरविंदांनी त्याला साफ नकार दिला. कलकत्ता येथे संपन्न झालेल्या या विवाहप्रसंगी सर जगदीशचंद्र बोस सपत्निक उपस्थित होते. श्रीअरविंद तेव्हा २९ वर्षांचे होते.
श्रीअरविंद हे बडोदा नरेश श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात कार्यरत होते. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर श्रीअरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत.
लोकमान्य टिळक भेट
कालांतराने श्रीअरविंदांनी सर्व तऱ्हेच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधून स्वत:ला बाजूला केले आणि ते गुप्तपणाने राजकीय कार्यात इ. स. १९०५ पर्यंत कार्यरत राहिले. परंतु क्रांतिकारक पक्षाचा संभाव्य नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल अशा लोकमान्य टिळकांशी त्यांनी संपर्क साधला आणि अहमदाबाद काँग्रेस परिषदेमध्ये (इ. स. १९०२) ते लोकमान्य टिळकांना भेटले. टिळकांनी त्यांना मंडपाच्या बाहेर नेले आणि तेथील मैदानावरच त्यांनी, महाराष्ट्रामध्ये त्यांना अभिप्रेत असलेली कार्यपद्धती कोणती त्याविषयी श्रीअरविंदांशी एक तासभर चर्चा केली. असे करत असताना, सुधारणावादी वा उदारमतवादी चळवळीविषयीचा तिरस्कारही लोकमान्य टिळकांच्या शब्दांमधून अभिव्यक्त होत राहिला.
(क्रमश: …)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series Shree Arvind Wedding and Tilak Meet