श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला:
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-८
वृत्तपत्रांतून लेखन
इंग्लंडमध्ये असतानाच श्रीअरविंद घोष यांनी त्यांचे ‘आयुष्य देशसेवेसाठी आणि त्याच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वाहून घेण्याचे’ ठरविले होते. भारतात आल्याबरोबर, राष्ट्राला भविष्याबद्दलच्या कल्पनांविषयी जागृत करावे या हेतूने केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी लगेचच वृत्तपत्रामधून राजकीय विषयांवर निनावी लिखाण करावयास सुरुवात केली.
श्रीअरविंद भारतात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. काही काळातच त्यांनी मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘इंदुप्रकाश’ या वृत्तपत्रामध्ये ‘New lamps for old’ ही लेखमाला सुरू केली. त्या लेखमालेमधून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. त्यामध्ये तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या विनंती, अर्जविनवण्या आणि विरोध या धोरणावर कडाडून टिका करण्यात आली होती आणि स्वयंसहाय्यतेवर आणि निर्भयतेवर आधारित कृतिशील नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये, इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः इंग्रज सरकारचे…
याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी तत्कालीन संपादक श्री. के. जी. देशपांडे यांच्या मार्फत, ‘असे जहाल लिखाण लिहू नये’, असा निरोप श्रीअरविंदांना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका न्या. रानडे यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, श्रीअरविंदांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली.
(क्रमश: …)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series SheeArvind part 8