महायोगी श्रीअरविंद सार्धशती सांगता
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद
‘संपूर्ण स्वराज्य’ या संकल्पनेचा उद्घोष आणि मागणीचा ज्यांनी पहिला जाहीर उच्चार केला ते क्रांतिकारक श्रीअरविंद घोष म्हणजेच महायोगी श्रीअरविंद यांचे भारतीय स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करत असताना स्मरण होणे स्वाभाविक आहे. श्रीअरविंद घोष, ज्यांनी उत्तरायुष्यामध्ये पृथ्वीमध्ये अमृत तत्त्वाची बीजे रूजविण्यासाठी प्रयत्न केले… ज्यांनी उत्तरायुष्यामध्ये उत्क्रांतीच्या वाटचालीमधील मानवाच्या पुढील टप्पा ‘अतिमानव’ असल्याचा स्पष्ट शब्दांत निर्वाळा दिला.
श्रीअरविंद ह्यांनी उत्तरायुष्यामध्ये अतिमानवाच्या आगमनासाठी, मानवाने कशी पूर्वतयारी केली पाहिजे याचा संपूर्ण नकाशाच उलगडवून दाखविला. अशा महायोगी श्रीअरविंदांचे पूर्वायुष्यदेखील तितकेच रोमहर्षक होते. त्यांचा एकंदरच जीवनप्रवास समजावून घेण्यासारखा आहे. त्यांच्या जीवनातील स्थित्यंतरे ही एका उच्च कोटीच्या साधकाची वाटचाल दर्शवून देणारी आहेत.
अवतार जन्माला का येतो, याची मीमांसा करताना श्रीअरविंदांनी सांगितले आहे की, ”ईश्वराने आम्हा मानवांसाठी खाली उतरून येणे म्हणजे अवतार. आपण मर्त्य मानवांनी त्या दिव्य अवस्थेत वर चढून जावे हे त्याच्या अवतरणाचे प्रयोजन असते.” मर्त्य मानवांनी दिव्य अवस्थेप्रत कसे आरोहण करावे याचा मार्ग अवतार स्वत:च्या उदाहरणाने दाखवून देत असतो. मानवी अस्तित्वाचा एक पूर्णत्वसंपन्न नमुना म्हणून ईश्वराने ते आपल्या डोळ्यांसमोर ठेवलेले उदाहरण असते. या दृष्टिकोनातून श्रीअरविंदांचा जीवनप्रवास समजून घेण्यासारखा आहे.
श्रीअरविंद यांच्या जन्माला यंदा म्हणजे २०२२ यावर्षी दीडशे वर्षे पूर्ण झाली, या सार्धशती वर्षाची सांगता दि. १५ ऑगस्ट रोजी होत आहे, त्या निमित्ताने श्रीअरविंदांचा जीवनप्रवास आपण उद्यापासून *क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद या मालिकेद्वारे समजावून घेणार आहोत.
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series on ShriArvind on India Darpan