पितृपक्ष महात्म्य
श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्ष सुरु झाला आहे. भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हणतात. आजपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. यानिमित्ताने ‘पितृपक्ष महात्म्यं’ ही विशेष लेखमाला आपल्या माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहोत.
पितृपक्ष श्राद्ध का करावं? कुणी करावं? कसं करावं?
पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. यालाच ‘महालय’ असेही नाव आहे.आपल्या नातेवाइकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या नातेवाइकाचे श्राद्ध, पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते.. या पक्षात यमलोकातून पितर (आपले मृत पूर्वज) आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने, हा पक्ष (पंधरवडा) अशा पितृकार्याला योग्य समजला जातो.
यावर्षी भाद्रपद कृष्ण पक्षांत म्हणजेच २१ सप्टेम्बर पासून ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष पाळला जात आहे. बर्याच जणांना श्राद्ध का करावे याची माहित नसते. हिंदूधर्मं शास्त्रानुसार श्राद्ध म्हणजे आपल्या पितरांचे स्मरण करणे आणि त्यांच्या मुक्ती साठी प्रयत्न करणे. आपल्या या पुर्वजांमुळे आपण या भूतलावर जन्माला आलो त्यांचे मनापासून आदरपूर्वक स्मरण करणे आणि त्यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करने. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर पितरांविषयी ग्रॅटीटयुड व्यक्त करण्याचा पंधरवाडा. मानसशास्त्रात या ‘ग्रॅटीटयुड टेक्निक’ चे फार महत्व मानले जाते मराठीत आपण याला आभार प्रदर्शन करने किंवा धन्यवाद देणे म्हणु शकतो. इंग्लिश मध्ये यालाच ‘थॅंक्स गिव्हिंग’ म्हणतात. याचे अनेक फायदे होतात असे मानसशास्त्र म्हणते.
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजे दूसरा पंधरवाडा खास पितरांची आठवण करण्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी अनेक शतकापासून काढून ठेवला आहे. या कृष्ण पक्षांत आपले पितृ म्हणजेच पितरं आपल्या वंशजाना म्हणजे आपल्याला सूक्ष्म रुपाने भेटायला येतात अशी मान्यता आहे. आपल्या पूर्वजांचे निधन ज्या तिथीला झाले असेल त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करण्याची पद्धत आहे. परन्तु ज्यांचं निधन भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी झाले आहे त्यांचं श्राद्ध १५ व्या दिवशी म्हणून सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करावं असं आपल्या धर्म ग्रंथात सांगितलं आहे. काही कुटुम्बात मात्र पोर्णिमा तिथीलाच श्राद्ध करतात. तेहि चुकीचं नाही असं अधिकारी व्यक्तींच मत आहे.
या पंधरवाड्याला ‘पितृपक्ष’. ‘श्राद्ध पक्ष’ किंवा ‘महालय’ असे देखील म्हणतात. या पितृ पक्षांत आपण का्य करावं हे पाहू या. पितरं, पितृ किंवा पितृ देवता कोणाला म्हणायचे असा प्रश्न अनेकांना पडतो.आपल्या कुटुम्बातील एवढच नाही तर आपल्या जवळच्या नात्यामध्ये, आपल्या ओळखी मध्ये आपल्या मित्रपरिवारात ज्या व्यक्ती मृत पावल्या आहेत त्यांना पितरं, पितृ किंवा पितृ देवता असं म्हटलं जातं.
धर्म शास्त्रानुसार अशा पितरांना किंवा पितृ देवतेला आपण मनोभावे स्मरण करून त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करने म्हणजेच आपण पितरांच्या ॠणातुन मुक्त होणे असं म्हटलं जातं. आपल्या पूर्वजानी श्रावण महिन्यापासून चातुर्मासाची मांडणी किती व्यवस्थित केली आहे पहा. निसर्गाच्या बदला नुसार ही माडणी केली आहे.श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपसनेचा समजला जातो.भाद्रपद शुद्ध चर्तुर्थी पासून गणेश उपासनेचे दिवस येतात. तर आश्विन महिन्यात शक्तिची उपासना केली जाते. शक्तिची उपासना करण्या पूर्वी आपल्या पितरांच्या ॠणातुन मुक्त होण्यासाठी भाद्रपद कृष्ण पंधरवाड्यात पितृपक्षाची रचना केली आहे.
या श्राद्ध पक्षात आपण आपल्यावर असलेले आपल्या पितरांचे ॠण फेडू शकतो. आपल्या पितरांना मुक्त करण्यासाठी प्रार्थना करू शकतो. श्राद्ध म्हणजे का्य? तर जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध! हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीवर तीन प्रकारचे ॠण असतात. देवॠण, ॠषिॠण आणि पितृ ॠण. याचं पितृॠणातुन मुक्त होणं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आपली जबाबदारी आहे.
विधीचे स्वरूप
महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण –पूजन करण्याची परंपरा आहे. यामध्ये दिवंगत आई, वडील, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतात. आपण विविध गुरूंकडून आयुष्यभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरू आणि शिष्य त्यांचेही आपण स्मरण करतो.
आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर, अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशूनही हे श्राद्ध करतात. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
पितृपक्षात श्राद्ध विधि केले जातात. परंतु काही वेळेला माहिती नसल्यामुळे,वेळेच्या अभावी किंवा आर्थिक अडचणीं मुळे काही व्यक्ती किंवा कुटूम्बाकडून श्राद्ध केले जात नाही. मात्र श्राद्ध करण्याची प्रत्येक व्यक्तीची ,कुटूम्बाची इच्छा असते.अशा व्यक्ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे श्राद्ध करून आपल्या पितरांच्या मुक्तिसाठी मनापासून प्रार्थना करू शकतात.
धर्मशास्त्रा नुसार या पितृपक्षातील पंधरवाड्यात आपल्या पितरांच्या मुक्ती साठी तीन गोष्टी करू शकता.
१) कोणत्याही दिवशी किंवा पितरांची तिथि असेल त्या दिवशी महाविष्णुचे नव घेउन पिंपळाच्या वृक्षाला ५/११/२१ प्रदक्षिणा घालाव्या. प्रदक्षिणा घालतांना ॐ नमो भगवते वासुदेवाय ,पुरुषोत्तमाय नम: असा मंत्र म्हणावा. तसेच पिंपळाच्या वृक्षाला जानव्यांचे ७ जोड़ अर्पण करावेत. आपल्या पितरांचे नाव घेउन त्यांच्या मुक्तीसाठी मनापासून प्रार्थना करावी.
२) मातीच्या भांड्याला (मडकं) खाली बारीक़ छिद्र पाडावे. या मडक्यात पाणी भरून हे मडके पिंपळाच्या झाडाला अडकून ठेवावे. यामुळे पिंपळाच्या वृक्षाला सतत पाण्याचा अभिषेक होईल. शक्य झाल्यास हे भांडे १५ दिवस पिंपळाच्या वृक्षाला टांगून ठेवावे यामुळे पिंपळाच्या वृक्षाला जलसेवा अर्पण केली जाईल.यालाच पितृसेवा असे म्हणतात. जलसेवा अर्पण करतांना आपल्या पितरांचे नाव घेउन त्यांच्या मुक्तीसाठी मनापासून प्रार्थना करावी.
३) आपल्या पितरांची नावे स्मरण करून गाय,कुत्रा, कावळा यांना घास द्यावा. जितका जास्त जमेल तितक्यावेळा द्यावा.आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून पितृपक्षात दानधर्म करावा. अर्थात दान नेहमी योग्य व्यक्तीलाच करावे असं धर्मशास्त्र निक्षूण सांगते. समाजातील ज्या घटकांना मदतीची खरी गरज आहे त्यांना आपल्या ऐपती नुसार दान करावं आणि त्यावेळी आपल्या पितरांचे नाव घेउन त्यांच्या मुक्तीसाठी मनापासून प्रार्थना करावी.
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना चार धर्मपिंडे देण्याची पद्धत या |श्राद्धात आहे. चार दिशांना मृत झालेल्या ज्ञात-अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केला तरी चालतो.
पितृपक्षातील श्राद्धाचा नैवेद्य
भरणी श्राद्ध : चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात. अविधवा नवमी: भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणात.
सर्वपित्री अमावास्या
भाद्रपद अमावास्येला मातामह श्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) असतेच, पण या शिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे.तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवशी करता येते.
पितृ पक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू होत असून १४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
(क्रमश:)
(संदर्भ व छायाचित्र विकिपीडिया)