पितृपक्ष महात्म्य
खीर-पुरीच का करतात?
हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. या संपूर्ण १५ दिवसांमध्ये, पूर्वजांना अन्न आणि पाणी देऊन त्यांना संतुष्ट करण्याची प्रथा आहे. वडिलांच्या मृत्युतिथीला या पितृपक्षकाळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. त्यानिमित्त पिंडदान करतात. या काळात जो स्वयंपाक करतात त्यासाठी काही दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच, श्राद्धासाठी खीर-पुरीचाच स्वयंपाक का करतात हे आपण आज जाणून घेणार आहोत…
प्रत्येक गृहस्थाश्रमीला तीन प्रकारचे कर्ज (ऋण) फेडायचे असते, असा समज आहे. मातृऋण, पितृऋण व समाजऋण. ही सर्व ऋणे पुत्राने/पौत्राने फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे, असा शास्त्रसंकेत आहे. या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात. श्राद्धविधी सुरू असतांना मृत व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो, असा समज आहे. पितरांचे श्राद्ध करतांना पिता, पितामह, प्रपितामह, मातामह यांचेही स्मरण करतात. त्या आधीच्या पिढ्या ह्या मुक्त झालेल्या असतात, असे मानतात. शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो, अशी भावना आहे.
पितृपक्षात पितरांची आठवण केली जाते.
विशेष म्हणजे, पितृपक्षात आपल्या पितरांची आठवण काढली जाते. त्यासाठी त्यांचा आत्म्याच्या शांतीसाठी काही विधी केले जातात. यावेळी काही विशेष काळजी घ्यावयाची असते. हिंदू पौराणिक ग्रंथात आणि ज्योतिषी शास्त्रात पितृदोषाचाही उल्लेख केलेला आढळतो. असे मानले जाते की, पितरांच्या रागापोटी आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागते.
अशी आख्यायिका आहे की, श्राद्ध पक्षात आपले सर्व पितरं पृथ्वीवर येतात, म्हणून पितृपक्षात तर्पण आणि श्राद्धासह देणगी देण्याचे देखील महत्व आहे. असे मानले जाते की, असे केल्याने पितरं प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात.
स्वयंपाक करताना ही सावधगिरी बाळगा
श्राद्ध पक्षात जे अन्न शिजवले जाते, ते प्रसाद म्हणून असतं. यावेळी अन्न अगदी सोप्या आणि शुद्ध पद्धतीने तयार करावं. असे न केल्याने पितर अन्नाला ग्राह्य करीत नाही आणि आपणास श्राद्ध पूजेचे पुण्य लाभत नाही. श्राद्धाच्या जेवणात खीर आणि पुरी आवश्यक असते. स्वयंपाक करताना गंगेचे पाणी, दूध, मध, कुश आणि तीळ सर्वात महत्वाचे असते. तीळ जास्त असल्याने त्याचे फळ जास्त मिळतं. तीळ श्राद्धाचे पिशाचांपासून संरक्षण करतात.
चुकून देखील हे अन्न शिजवू नये
श्राद्ध पक्ष आणि पितृ पूजेत मोहरी, काळ्या मोहरीची पाने, शिळे आणि खराब झालेले अन्न, हरभरा, मसूर, उडीद, कुळीद, सातू, मुळा, काळे जिरे, कांचनार, काकडी, काळे उडीद, काळे मीठ, दुधी, कांदा आणि लसूण, फळं आणि मेवे हे चुकूनही वापरू नये.
खीर-पुरीच का
पितृपक्षात शिजवलेले अन्नदान देण्याचे विशेष महत्व आहेत. खीर हे पायस अन्न मानले जाते. पायस हा पहिला प्रसाद मानला जातो. यामध्ये दूध आणि तांदळाची शक्ती आहे. तांदूळ असे धान्य आहे जे जुनं झाले तरीही खराब होत नाही. तांदूळ जेवढा जुना असतो तेवढाच चांगला असतो. तांदळाच्या या गुणधर्मामुळे ते जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या संस्कारात समाविष्ट केला जातो. म्हणून पितरांना खिरीचा प्रसाद असतो. या मागील सार्वजनिक मान्यता अशी आहे की, भारतीय समाजात खीर-पुरी साधारणतः सणासुदीच्या वेळेस केले जाणारे पदार्थ आहे. पितृपक्ष हे देखील पितरांचा सण मानले जाते. असे म्हणतात की, याकाळात आपले पितृ किंवा पूर्वज आपल्या घरी भेट देतात. त्यांचा आतिथ्यासाठी खीर-पुरी बनवतात.
यामागे एक व्यावहारिक कारण देखील आहे. श्रावणाचा महिना उपवासाचा महिना म्हणून असतो. बरेच जण महिनाभर उपवास करायचे, त्यामुळे त्यांना फार अशक्तपणा येत असे. भाद्रपद महिन्यात श्राद्धात खीर-पुरीचे जेवण त्यांना सामर्थ्य देत असायचे. म्हणूनच खीर-पुरी बनवायची ही प्रथा सुरु करण्यात आली.
वड्याच्या नैवेद्याचं महत्त्व
श्राद्ध कर्मात भोजनात सामील खाद्य पदार्थांमध्ये वड्याचं खूप महत्त्व आहे. खीर-पुरी प्रमाणेच पानात वडे देखील असणे आवश्यक मानले गेले आहे. अनेक ठिकाणी तर या काळात केले जाणारे वडे वर्षभरात कधीही न करण्याचा नियम असतो. अशात पितृ पंधरावड्यात याची चव काही वेगळीच असते. हे वडे करतांना दोन वाटी जाड तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ, आणि १ वाटी हरभर्याची डाळ. या डाळी भाजून गिरणीतून भरडा काढतात. नंतर या पिठात मीठ, तिखट, हळद, आवडीप्रमाणे वाटलेली मिरची पेस्ट आणि गरम तेलाचं मोहन घालून कोमट पाण्याने पीठ भिजवतात. यानंतर हे मिश्रण प्लास्टिकवर थापून मध्यभागी भोक पाडून खरपूस तळून घेतलं की झाले पितरांना आवडणारे वडे तयार!
(संदर्भ सौजन्य – विकिपीडिया व धार्मिक ग्रंथ)