पितृपक्ष महात्म्य
कावळ्याला एवढे महत्त्व का?
पितृपक्ष सुरू झालाय, आता घराघरांतून कावळ्यांची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जातेय. जन्मानंतरचा पहिला घास काऊच्या साक्षीनं खाणाऱ्या माणसाचा शेवटचा प्रवास कावळ्याच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नाही, ही भारतीय परंपरा आहे. शहरी लोकांना सर्वात परिचित पक्षी म्हणजे कावळा. लहानपणापासून आपण चिऊ काऊच्या गोष्टी ऐकतो. रोज त्याचे ‘कावकाव’ कानावर पडते. काही लोकं रोज कावळ्याकरता खिडकीबाहेर थोडं अन्न ठेवतात. शहरात सर्वत्र पडलेल्या कचऱ्याच्या ढिगांवर कावळे दिसतात. पिंडाला शिवणारे कावळे दिसतात आणि आता पितृपक्षात पुन्हा कावळे आपल्याला आठवतात. ते का हेच आज आपण जाणून घेणार आहोत…
भाद्रपद महिन्यातील वद्य पक्ष पितर वा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. या पितृपक्षात प्राणी, पक्षी, अतिथी, पाहुणे यांचा अपमान करू नये, असे म्हटले जाते. तसेच या कालावधीत कावळा आणि गायीला दिलेले अन्न विशेष मानले गेले आहे. आपण कधी विचार केला आहे का की, गाय आणि कावळा यांचे पितृपक्षातील महत्त्व अधिक का आहे? कावळ्याला पूर्वजांचे प्रतीक का मानले जाते? काकस्पर्शाचे नेमके महत्त्व काय?
काकस्पर्श
एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर १२ ते १३ दिवसांचे कार्य केले जाते. यामध्ये मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते. १० व्या दिवशी पिंड ठेवले जातात आणि काकस्पर्शाची वाट पाहिली जाते. तेथे काकस्पर्श झाल्यास पूर्वजांनी आपण ठेवलेल्या अन्नाचे ग्रहण केले, असे मानले जाते. अन्यथा मृत पावलेल्या व्यक्तीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, असे मानून ते पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखवला जातो. दिवसवाराप्रमाणे श्राद्ध तर्पण विधी करतानाही कावळ्याचा काकबळी काढून ठेवला जातो.
अशी आहे अख्यायिका
काही पुराणांमध्ये कावळा देवपुत्र मानला गेला आहे. एका कथेनुसार, इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रुप धारण करत सीता देवीच्या पायाला चोच मारली. कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या काडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंतचा डोळा क्षतीग्रस्त झाला. तेव्हा जयंत याने श्रीरामांकडे क्षमायाचना केली. मर्यादा पुरुषोत्तमांनी जयंतला क्षमा करून वरदान दिले की, कावळा रुपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल, अशी एक कथा सांगितली जाते.
पैल तो गे काऊ कोकताहे
घराच्या खिडकीवर किंवा दारावर येऊन कावळा ओरडू लागला की, पाहुणे येणार असल्याचे संकेत असल्याचे लोकमान्यता रुढ आहे. तसेच घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते. कावळा चोचीत फूल-पाने घेऊन आला, तर तो शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. कावळा गायीच्या पाठीवर चोच घासताना दिसल्यास धन, धान्याची कमतरता भासणार नाही, असा संकेत असल्याचे सांगितले जाते. आणि कावळा आपल्या चोचीत गवताची काडी घेऊन आल्यास भविष्यकाळात उत्तम धनलाभ होण्याचे योग असतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
जाती व सवयी
बीएनएचएसच्या ‘बर्डस ऑॅफ द इंडियन सबकाँटिनंट – अ फिल्ड गाईड’ या पक्षी मार्गदर्शकात भारतातील विविध कावळ्यांच्या जातींची नोंद केली आहे. कावळा, जंगल कावळा, डोम कावळा, हिमालयीन जंगल कावळा, हिमालयीन कावळा, तपकिरी मानेचा डोम कावळा, पिवळ्या चोचीचा कावळा व लाल चोचीचा कावळा. पहिल्या तीन जाती महाराष्ट्रात आढळतात. उकिरड्यावर टाकलेले अन्न, विष्ठा, लहान पक्षी, त्यांची अंडी व मेलेल्या प्राण्यांचे मांस असे कुठलेही अन्न कावळ्यांना चालते. एप्रिल ते जून हा त्यांचा विणीचा काळ. पिलांच्या भुकेल्या लाल चोचीत भरवणारे कावळे आपण पाहतो. कावळे समाजप्रिय असतात व वेळोवेळी एकत्र जमतात.
हुशार पक्षी
प्राण्यांमध्ये जसे हत्ती व डॉल्फिन हुशार असतात, तसं पक्ष्यांमध्ये हा मान कावळ्यांना द्यायला हरकत नाही. माशांच्या टोपल्या टपावर बांधलेल्या टॅक्सीवर आपण कावळे बघतो, तसेच कचऱ्याच्या ट्रकवर सुद्धा त्यांची सफर चालू असते. टणक फळे फोडण्याकरता कावळ्यांनी ती चालत्या वाहनांच्या पुढे टाकताना काही लोकांनी पहिले आहे! इसापनीती मधील गोष्ट आपल्याला माहीत आहेच. निमुळत्या भांड्याच्या तळाशी असलेले पाणी कावळ्याने दगड टाकून वर आणले. घरटे बांधताना सुद्धा कावळे विविध सामुग्री वापरून मजबूत बनवतात. परंतु या चतुर पक्षाला सुद्धा शेरास सव्वाशेर भेटतोच. विणीच्या हंगामात एखादी हुशार कोकीळा कावळ्याच्या घरट्यात आपली अंडी घालून मोकळी होते. प्रसंगी कावळ्याची थोडी अंडी बाहेर ढकलून देते. विनासायास पिले कावळ्यांच्या संगोपनात मोठी होतात.
आपला मित्र
कावळे हे निसर्गाचे साफसफाई कर्मचारी आहेत. कुठेही घाण किंवा मेलेला प्राणी दिसला की हे हजर . पूर्वी शहराबाहेर या कामात गिधाडे सुद्धा मोठा वाटा उचलत. ती दुमिर्ळ झाल्याने आता हे सत्कृत्य प्रामुख्याने कावळे व घारी करतात. रोगराई पसरण्यास यामुळे प्रतिबंध होतो. जंगलात कावळ्याकडून अनेक वेळा भक्षक प्राण्याच्या अस्तित्वाचे संकेत मिळतात. पावसाळ्यापूवीर् कावळे पिलांकरता घरटी बांधतात. ज्या वषीर् कावळ्याचं घरटं भरपूर पानांमध्ये दडलेलं असतं, त्या वषीर् पाऊस चांगला पडतो असे म्हणतात.
भारतीय परंपरेत
आपल्या पूर्वजांना कावळ्याच्या जीवसाखळीतील महत्वाच्या स्थानाची पूर्ण कल्पना होती. मृत्युनंतर पिंडाला कावळा शिवणे व पितृपक्षात पितरांकारता ठेवलेले अन्न कावळ्याने खाणे चांगले समजले जाते. सर्वत्र आढळणाऱ्या व परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या या पक्ष्याला सहाजिकच असे महत्व दिले गेले आहे. कावळ्याला शनीदेवाचे वाहन मानतात व त्यामुळे चोरी सारखे अरिष्ट येत नाही असे समजतात. कावळ्याचा चौकसपणा व अनोळखी व्यक्ती किंवा प्राणी आला तर त्याचा आरडा-ओरडा यामुळे आपल्याला वेळीच सतर्क राहण्याची सूचना मिळते .तिबेट मध्ये दलाई लामांच्या जन्माचे संकेत कावळ्यांकडून मिळतात असे मानतात व त्याला धर्मपाल महाकाल किंवा निसर्गनियमांचे रक्षण करणारा असेही समजतात.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी
आज शहरांमध्ये इतका कचरा निर्माण होतो की त्यावर लाखो कावळे मजेत गुजराण करतात. डम्पिंग ग्राउंडवर तर कावळे व घारींचा नुसता सुळसुळाट असतो. हल्ली गल्लीबोळात साचलेल्या कचऱ्यावर कावळ्यांच्या झुंडी दिसतात. मुळातच आक्रमक असलेला हा पक्षी मग इतर पक्ष्यांना हुसकावून लावतो. छोट्या पक्ष्यांच्या पिलांना खातो. कावळे घारीशी सुद्धा पंगा घेतात! गावांत कचरा कमी असल्याने कावळेही कमी असतात. जंगलात तर कावळ्यांचे प्रमाण अगदी नगण्य असते. थोड्या संख्येने तिथे जंगल कावळे दिसतात. इतर वेळी कावळयांना हुसकावून देणारे, कावळयांकड़े दुर्लक्ष करणारी माणसं पितृपक्षांत मात्र कावळयांची मनापासून वाट पहातात. प्रसंगी लहान होउन ‘कावss कावss’ देखील करतात!
(क्रमशः)
(छायाचित्र व संदर्भ सौजन्य – विकिपीडिया व धार्मिक ग्रंथ)