पितृपक्ष महात्म्य – भाग ३
पितरांना नक्की मुक्ती मिळवून देणारा
गीतेचा सातवा अध्याय
पितृपक्षात पितरांना मोक्ष मिळावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी घरोघरी पितरांचे श्राद्ध घातले जाते. जे लोक आपल्या पितरांच्या संपत्तीचा उपभोग घेतात परंतु त्यांचे स्मरण करीत नाही किंवा त्यांची आठवण ठेवत नाहीत. आपल्या पितरांचे श्राद्ध करीत नाहीत. पितृपक्षात पितृतर्पण करीत नाहीत अशा व्यक्तींना किंवा कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. अशी अनेक उदाहरण आपल्याला पहायला मिळतात.
पितृदोषांमुळे घरात नेहमी भांडणं होतात. संतती सुख मिळत नाही. ज्या घरात पितृदोष असतो त्या घरात स्वास्थ्यपूर्ण निरोगी संतती जन्माला येत नाही. आणि आलीच तर सतत आजारी पड़ते. अशा संततीला काही ना काही अडचणी नेहमी येतात. त्याच प्रमाणे घरात एखादे शुभकार्य आलेच तर त्यात अनेक अडचणी उद्भवतात. विघ्न येतात. मन नेहमी त्रासलेले राहते. घरात लढाई, झगडे होतात. सुख समृद्धी लाभत नाही. धनाची वाढ होत नाही. हे असं का घडतं हे कळत नाही. स्वस्थता, सुख, चैन लाभत नाही. अशा परिस्थितीचा सामना करणार्या व्यक्तींनी श्राद्ध पक्षात किंवा पितृपक्षात जाणकार, अनुभवी पंडिताला बोलावून विधीपूर्वक श्राद्ध अवश्य करावे.
पितृपक्षांत पितरांचे श्राद्ध कर्म करण्याबरोबरच अशा व्यक्तींनी पितृपक्षांत काही गोष्टी श्रद्धेने कराव्यात. कारण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध असं म्हणतात. पितृपक्षांत दररोज सकाळी लवकर उठून स्नान करुन, स्वच्छ कपडे परिधान करुन, शरीराने व मनाने शुचिर्भूत होवून आपल्या पितरांचे मनापासून स्मरण करावे. त्यांना मनोमन नमस्कार करावा. सूर्य देवतेला पाण्याचे अर्घ्य देतांना एक तांब्या पाणी आपल्या पितरांच्या आणि पूर्वजांच्या नावानेही अर्पण करावे. अतिशय साधी कृती आहे परंतु मनापासून केल्यास घरातील पितृदोष १०० टक्के दूर होतात असा अनुभव आहे.
याच प्रमाणे घरातील पितृदोष दूर करण्यासाठी पितृपक्षांत दररोज गायत्री मंत्राचा जप करावा. महामृत्यंजय मंत्राचा जप करावा.
सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे कशाही प्रकारचा पितृदोष कायमस्वरूपी स्वरूपी दूर करायचा असेल तर पितृपक्षांतील दिवसांत श्रीमद भगवद गीतेतील सातवा अध्याय दररोज वाचावा असे सांगितले जाते. लाखो लोकांनी याचा अनुभव घेतला आहे आणि ते पितृदोषांपासून मुक्त झाले आहेत. श्रीमद भगवदगीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण कसे करावे ते आपण पाहू या.
सकाळी लवकर उठून किंवा सायंकाळी स्नान करुन शुचिर्भूत होवून भगवदगीतेचा सातवा अध्याय वाचावा किंवा ऐकावा. भगवदगीतेचा सातवा अध्याय वाचाण्या किंवा ऐकण्यापूर्वी शरीराने आणि मनाने शुचिर्भुत होवून आपल्या पितरांचे मन:पूर्वक स्मरण करावे त्यांना मनापासून नमस्कार करावा. आपल्या पितरांना मुक्ती मिळावी त्यांचा आत्मा मुक्त व्हावा यासाठी मी भगवद्गीतेचा सातवा अध्याय वाचत आहे हे मनाशी मोठ्याने म्हणावे आणि नंतर सातवा अध्याय वाचावा. पितृपक्षांत गीतेचा सातवा अध्याय मनापासून नियमित वाचला किंवा ऐकला तर पितरं प्रसन्न होतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरांत असलेला पितृदोष समाप्त होतो.
हिंदू धर्मांत महाभारत काळापासून पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा चालू आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली त्यात सातव्या अध्यायात पितरांना मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी काय केले पाहिजे हे सविस्तर सांगितले आहे.
श्रीमदभगवदगीतेतील सातव्या अध्यायाचे महत्व अधोरेखित करणारी एक कथा शिवपुराणात सांगितली आहे. स्वत: भगवान शंकरानी माता पार्वतीला याविषयी सांगितले आहे.ते म्हणतात, ” हे देवी पार्वती मी तुला आता गीतेच्या सातव्या अध्यायाचे महत्व सांगतो. ते तू लक्ष पूर्वक ऐक.”
पाटलीपुत्र नावाच्या नगरात शंकूकर्ण नावाचा एक धनाढ्य ब्राह्मण राहत होता. वैश्य वृत्तीने वागून त्याने अमाप धन दौलत जमा केली होती. मात्र त्याने आपल्या आयुष्यात ना कधी पितरांचे स्मरण केले. ना कधी पितरांचे श्राद्ध केले. त्याने कधी दानधर्म देखील केला नाही. ज्यांच्या पासून धनलाभ होईल अशा राजेमहाराजे आणि श्रीमंत व्यापारी उद्योजक यांनाच तो ओळख द्यायचा.
असा हा शंकुकर्ण चौथा विवाह करण्यापूर्वी बंधू व मुलांसह यात्रेला निघाला. एका रात्री एका गावी मुक्कामाला असताना एका सर्पाने झोपेत असलेल्या शंकूकर्णाला दंश केला. त्यामुळे शंकुकर्ण मरण पावला. त्यानंतर अनेक वर्षे तो प्रेत योनीत भटकत राहिला व शेवटी सर्प योनीत त्याचा जन्म झाला. परंतु तेव्हाही त्याचे मन धनाच्या वासनेने भरलेले होते. सतत धनाचा विचार करत असताना त्याला आठवले की मनुष्य योनीत असतांना खुप धन कमावले होते. पण ते धन आपल्या मुलांना न देता तो सर्प होवून त्या धनाचे रक्षण करू लागल. पुढे त्याचाही कंटाळा आल्यावर एके दिवशी त्याने आपल्या सर्व मुलांच्या स्वप्नात जावून जमिनीत गाडलेल्या धनाविषयी सांगितले.
त्यांच्यातला मधला मुलगा मध्य रात्रीच कुदळ घेउन बाहेर पडला. त्याला धन पुरल्याची निश्चित जागा माहित नव्हती पण त्याने चिन्हा वरून खणायला सुरुवात केली. जेथे धनाच्या रक्षणार्थं सर्प बिळात लपून बसलेला होता. तो मुलगा जमीन खणू लागताच त्या बिळातून एक खुप मोठा आणि भयंकर सर्प फुत्कार करीत बाहेर आला. कृद्ध झालेला तो सर्प माणसाप्रमाणे बोलू लागला, “अरे मूर्खा, तू कोण आहेस? आणि हा बांध तू का खणतो आहेस? तुला कुणी पाठवले आहे? हे मला खरं खरं सांग.”
मुलगा म्हणाला, ” अहो बाबा, मी तुमचाच मुलगा आहे. माझं नाव शिवा आहे. मध्य रात्री मी एक स्वप्न पहिलं. या ठिकाणी गाडलेल्या धनाविषयी आपणच मला सांगितले. तुम्ही जे धन गाडून ठेवलं होतं ते धन घ्यायलाच मी आलो आहे.”
आपल्या मुलाचे हे बोल ऐकून सर्प मोठ मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला.” अरे मुला, तू मला या सर्प योनीतून मुक्त कर. जमिनीत गाडलेल्या या धनामुळेच मी सर्प योनीत अडकलो आहे. माझी या सर्प योनीतून मुक्तता कर.”
मुलगा म्हणाला, “पिताजी, आपली मुक्ती कशी होईल ते आपणच मला सांगा. तुम्हाला उपाय माहित असेल तर कृपया मला सांगा.”
सर्प म्हणाला ,” मला मुक्ती मिळावी यासाठी तू भगवदगीतेतील सातव्या अध्यायाचा पाठ कर. माझ्या मुक्तीसाठी तीर्थदान, तप आणि यज्ञ देखील समर्थ नाही. केवळ गीतेतील सातवा अध्यायच मला या सर्प योनीतून मुक्त करू शकेल. कारण केवळ भगवदगीतेतील सातवा अध्याय प्राण्यांच्या जरा, मृत्यू आदि दु:खापासून मुक्ती देऊ शकतो. म्हणून हे पुत्रा, श्राद्धाच्या दिवशी गीतेच्या सातव्या अध्यायांचे नियमित पठण करणाऱ्या ब्राह्मणाला तू श्रद्धा पूर्वक जेवण दे. ज्या दिवशी माझा मृत्यू झाला त्या तिथीला माझे श्राद्ध कर्म कर. असं केल्यावर मला मुक्ती मिळेल. हे पुत्रा आपल्या क्षमतेनुसार पूर्ण श्रद्धा आणि विश्वास पूर्वक ब्राह्मणाना भोजन घाल.”
तिथे जमलेल्या शंकूकर्णच्या सर्व मुलांनी सर्प योनीतील आपल्या पित्याचे बोलणे ऐकले. त्यांनी श्रद्धा पूर्वक श्राद्ध केले. भरपूर दानधर्म केला तेव्हा शंकूकर्ण सर्प योनीतून मुक्त झाला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. आपले जमिनीत गाडलेले सर्व अमाप धन आपल्या मुलांना दिले.
शंकूकर्णच्या मुलांनी मिळालेले संपूर्ण धन विहिरी खणणे, मंदिरं आणि धर्मशाला बांधणे, गरजू लोकांना दान करणे यासाठी वापरले. त्याचप्रमाणे त्यांनी आयुष्यभर नियमितपणे गीतेतील सातव्या अध्यायाचे पठण केले. त्यामुळे त्यांना देखील मुक्ती मिळाली.” ही कथा सांगून भगवान शंकर म्हणाले,” देवी पार्वती, मी तुला आज भगवदगीतेच्या सातव्या अध्यायाचे महात्म्य सांगितले. हा अध्याय ऐकल्याने आणि त्याचे श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आणि यामुळे त्याच्या पितरांना निश्चित मोक्ष प्राप्ती होते.”
(क्रमश:)
(छायाचित्र व संदर्भ सौजन्य विकिपीडिया व धार्मिक ग्रंथ)