टंचाईग्रस्त मनमाडमध्ये चक्क स्विमिंग पूल
शेती विकून सेवानिवृत्त जवानाचा भन्नाट उपक्रम
– जगदीश देवरे
कोणत्याही सिझनमध्ये तुम्ही मनमाडला जा, तिथल्या नगरपालिकेच्या नळांना पिण्याचे पाणी रोज येत नाही. परिस्थितीनुसार साधारणपणे १८ ते २० दिवसांच्या अंतराने हे पाणी मनमाडकरांना मिळत असते. सुरूवातीपासूनच नैसर्गिक दृष्टया लाभलेला कमी पावसाचा शाप, पावसाने दिलेले ओजंळीभर पाणी साठवून ठेवण्यासाठी फार मोठी क्षमता नसलेले वागदर्डी धरण आणि मग पालखेड सारख्या नजिकच्या डॅममधून येणारे उसने पाणी…. या सगळया प्रवासात मनमाडकरांची जिवीका चालत असते. परंतु, अशा या ‘पाणीबाणी’ असलेल्या गावाजवळ कुणी स्विमींग टॅन्क बांधायची कल्पना मांडली आणली तरॽ…
सहाजिक आहे, लोक हसतील. ज्याने ही कल्पना मांडली त्याला वेडा म्हणतील आणि त्याच्या कल्पकतेकडे दुर्लक्षही करतील. परंतु मनमाड पासून काही अंतरावर असलेल्या वागदर्डीजवळ रापली रोडला, रापली रेल्वे गेटसमोर आर्मीतून रिटायर झालेल्या दत्ताञय बाळासाहेब पगार यांनी एक स्विमींग टॅन्क बांधलाय हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. यातली आणखी एक महत्वाची गोष्ट, उगीच बांधायचा म्हणून हा तरण तलाव अगदी छोटा वगैरे बांधलेला नाही….जवळपास ३० मीटर लांब आणि १७ मीटर रूंदीच्या या स्विमींग टॅन्कची क्षमता ८५०० लाख लिटर इतकी आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा लांबलचक आणि टप्यानुसार खोली वाढवत जाणारा हा टॅन्क स्विमींग प्रशिक्षणासाठी अतिशय उपयुक्त असा आहे. अर्थात, प्रत्येक चांगल्या गोष्टीला अडथळे असतात तसे हा टॕन्क बांधून झाल्यानंतर लगेचच आले आणि ते म्हणजे लॉकडाऊन सुरु झालं. परंतु, या सगळया अडथळयांच्या शर्यती पार केलेला हा ‘जिजाऊ तरणतलाव’ आता जोमाने सुरू झाला असून मनमाड शहर आणि परिसरातल्या लोकांना स्विमींग शिकण्याची नामी संधी या तरणतलावाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
२००६ साली कच्छ, भुज येथे आर्मीत नोकरीला असतांना तिथे आर्मीतर्फे स्विमींग टॅन्कचे बांधकाम सुरू होते. हे बांधकाम बघतांना आणि त्यानंतर त्याचे मेन्टेनन्सचे काम देखील जवळून बघतांना त्या कामावर बारीक लक्ष ठेवून असलेल्या दत्ताञय पगार यांनी, त्यावेळेलाच आपण आर्मीतून सेवानिवृत्ता झाल्यानंतर मनमाडला स्विमींग टॅन्क बांधायचा विचार मनात आणला होता. पोहायला जाण्यासाठी नैसर्गिक नद्या, नाले, तलाव आता शिल्लक राहीलेले नाहीत. असले तरी,आजच्या पिढीला तिथे जायला मोबाईलमधून वेळ मिळत नाही. याशिवाय सुरक्षेची भिती असते ती वेगळीच. अशा वेळेला स्विमींग शिकण्यासाठी तरणतलाव ही एक महत्वाची जागा ठरते.
डोक्यात नुसत्या कल्पना असून चालत नाही, त्या अंमलात आणण्यासाठी खिशात पैसा सुध्दा लागतो. स्विमींग टॅन्क बांधायचा, ही कल्पना जरी डोक्यात असली तरी फौजेतल्या सेवेनंतर दत्ताञय पगार यांना १४ ते १५ लाख मिळाले. ती रक्कम या कामासाठी थोडी कमीच होती. शेतात त्यासाठी खड़डा खोदल्यानंतर आणि स्टील, सिमेंट आणून काम सुरू केल्यानंतर पैसे कमी पडायला लागले तेव्हा खरी दत्ताञय पगार यांची अडचण झाली. यांच्या डोक्यात असलेली स्विमींग टॅन्कची कल्पनाच कुणाला रूजत नव्हती. इथे आणि स्विमींग टॅन्क…ॽ हा फौजी वेडा दिसतोय… असे म्हणणारे लोक मदतीसाठी पुढे येईनात. मग अशा वेळेला पैशाची गरज पुर्ण करायची म्हणुन पगार यांनी वडिलांच्या मालकीचं एक एकर शेत विकून टाकलं, बँन्केचं लोन उचललं आणि या कामासाठी पैसा जमा केला.
मनमाड सारख्या ठिकाणी जिथे नगरपालिकेच्या नळातून पिण्याचे पाणी, सुमारे वीसएक दिवसानंतर येते तिथे इतक्या अवाढव्य स्विमींग टॅन्कला पाणी आणायचं कुठूनॽ …. परंतु याचीही योजना पगार यांच्या मनात तयार होती. त्यांच्या शेतातल्या विहीरीला मुबलक पाणी होते. खरेतर शेतकरी त्याच्या शेतातले पाणी थेट पिकांना देत असतो. मनमाड सारख्या शहरानजिक असलेल्या शेतजमिनीत कांदे, वांगे, टमाटे, मिरची अशी पिके विहीरीतल्या पाण्यावरच घेतली जातात. हल्ली शेततळे बांधण्याची एक नवी संकल्पना अस्तीत्वात असल्याने शेततळयातले पाणी देखील थेट पिकांना वापरले जाते. परंतु, अशा प्रकारच्या विहीर किंवा शेततळयासारख्या जलाशयातले पाणी थेट पिंकाना न देता ते आधी स्विमींग टॅन्कमध्ये टाकण्याची शक्कल पगार यांनी लढवली. स्विमींग टॅन्कच्या शेजारी एक बॅलन्सींग टॅन्क उभारला व त्यात स्विमींग टॅन्कचे वापरलेले किंवा ओव्हर फ्लो झालेले पाणी सोडण्यात आले त्या बॅलन्सींग टॅन्कमध्ये असलेले पाणी नंतर पिकांना सोडण्यात येते. असे केल्याने पाण्याची बचत तर होते आहेच शिवाय स्वच्छ आणि नितळ पाण्याचा उपयोग स्विमींगसाठी केला जातोय.
कमीतकमी क्लोरीनचा वापर करून या टॅन्कमधील पाण्याचे फिल्टरेशन कसे केले जाईल याची काळजी दत्ताञय पगार स्वतः घेत असतात. सकाळी ८ ते १० च्या कालावधीत हे काम ते स्वतः करतात. त्यांच्या शेतात आणखी एक विहीर आहे आणि त्या विहीरीच्या पाण्याची शुध्दता पातळी थोडी कमी आहे. तरणतलावातील फिल्टरेशनच्या वेळेला जे रिजेक्ट झालेले पाणी आहे ते, त्यातल्या चिखल मातीसह एका वेगळया पाईपलाईनव्दारे या विहीरीच्या जवळ बांधण्यात आलेल्या एका शोषखडयात सोडले जाते. त्यामुळे हे पाणी देखील वाया जात नाही आणि कालांतराने शुध्द होउन विहीरीत झिरपल्यानंतर शेतीसाठी वापरले जाते.
दत्ताञय पगार भुजला आर्मीतल्या ज्या रेजीमेन्टला होते त्या रेजीमेन्टच्या अंतर्गत फक्त सैनिकांसाठी एक मोठा स्विमींग पुल आणि दर्शक गॅलरीसह इनडोअर खेळाचे एक स्टेडीअम आहे. या स्विमींग टॅन्कवर प्रशिक्षणासह त्याच्या मेन्टेनन्सची जबाबदारी श्री, पगार यांनी सुमारे आठ वर्ष सांभाळली आहे. आता त्यांनी बांधलेल्या या स्वतःच्या मालकीच्या स्विमींग टॅन्कवर त्यांच्याकडे असलेल्या या अनुभवाचा फायदा त्यांना होतो आहे. स्विमींग येत नसलेल्या व्यक्तीला अवघ्या एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर स्विमींग शिकवण्याची हमी ते देतात. विशेष म्हणजे कुठल्याही प्रशिक्षणार्थीला हात न लावता येथे उपलब्ध असलेल्या आधुनिक साधन सामुग्रीच्या आधारे हे प्रशिक्षण दिले जाते. आर्या आणि समीक्षा या दोघी दत्ताञय पगार यांची मुलगी आणि पुतणी आहेत. या दोघी शाळकरी मुली देखील स्विमींगमध्ये तरबेज झाल्या असून पगार यांच्या देखरेखीखाली महिला वर्गाला त्या प्रशिक्षण देतात.
सध्या उन्हाळयाच्या सुटयांमध्ये मुलांना या तरणतलावावर खास प्रशिक्षण देण्याची सुविधा आखण्यात आली आहे. नाशिक सारख्या शहरी भागात अशा प्रशिक्षणासाठी मुलांच्या पालकांना मोठा मोबदला मोजावा लागतो. त्या तुलनेत कमी मोबदला घेवून श्री पगार हे या ठिकाणी स्विमींगचे प्रशिक्षण देणार आहेत. या खेरीज पुरूष आणि महिलांसाठी रेग्युलर बॅचेस देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. थोडक्यात काय तर, इच्छाशक्ती असेल तर कुठलाही प्रकल्प किंवा मनात असलेली संकल्पना कुठेही उभारता येते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे या ‘जिजाऊ तरणतलावाकडे’ बोट दाखवावे लागेल.
पाणी हा घटक तरण तलावासाठी महत्वाचा असतांना त्या पाण्याची जिथे कमतरता आहे, तिथेच तो तरणतलाव उभारण्याची हिम्मत करणे आणि तो उभारल्या नंतर स्वतः जवळ असलेल्या अनुभवाचा उपयोग करून तो तरणतलाव पुढे चालवणे हे जिकीरीचे काम दत्ताञय पगार सध्या मनमाडमध्ये करीत आहेत. एक फौजी म्हणून रिटायर झाल्यानंतर शेतीत राबतांना शेतीला स्विमींग टॅन्कची जोड देणारी ही शक्कल अफलातून आहे. असे म्हणतात की, पुर्वीच्या काळात मुलं मोठी झाली की नदीच्या पाण्यात किंवा खळयातल्या विहीरीत किंवा नजिकच्या तलावात डुबकी मारायला जायचे.
‘पाण्यात पडलं की आपोआप पोहायला येतं’ या उक्तीप्रमाणे पोहायला शिकायचे. आता तसं राहीलेलं नाही. नद्या, विहीरी आटल्या आहेत. नजिकच्या तलावावर पोहायला जाणं धोक्याचं मानलं जातंय. अशा परिस्थीतीत पाण्यात पडून पोहायला शिकायचं असेल तर तरण तलावाशिवाय पर्याय राहीलेला नाही. हा पर्याय दत्ताञय पगार यांनी मनमाडकरांना आणि नजिकच्या पंचक्रोशितील लोकांना तरणतलावाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलाय. या हिमतीला दाद दयावी लागेल हे निश्चीत.