उत्तर महाराष्ट्राच्या विकासात महाराष्ट्र चेंबरचे योगदान
महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचा विचार केल्यास स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालावधीचा विभागले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राज्याच्या औद्योगिक व व्यापार क्षेत्राचा विकास व्हावा , व्यापार उद्योगास चालना मिळावी हा मुख्य उद्देशाने द्रष्टे उद्योगपती श्री वालचंद हिराचंद व श्री म.ल. डहाणूकर यांनी सन १ ९ २७ साली चेंबरची स्थापना केली. आज ९ ६ वर्षे चेंबरचे कार्य अविरत चालू आहे. त्याच कार्याचा हा आढावा…
सुरवातीला चेंबरचे हे कार्य शहरी विभागापूरते मर्यादित होते. परंतू राज्याच्या सर्वागिन विकास साधावयाचा असेल तर महाराष्ट्र चेंबरचे कार्य ग्रामिण भागाचाही विकास व्हावयास हवा व यासाठी चेंबरने प्रयत्न करावे असा विचार स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढे आला. विशेषतः शेठ लालचंद हिराचंद यांच्या अध्यक्षीय काळात राज्यभर दौरे करुन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला , महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या बाजारपेठाना भेटी देवून चेंबरचे कार्य राज्यात सर्वत्र पोहचविण्याचा प्रयत्न अधिक जोमाने करण्यात आले. त्याममध्ये नाशिक , धुळे , जळगाव , अहमदनगर अशा भागातून चेंबरचे कार्य पोहचू लागले. सन १९६६ मध्ये मुंबई बाहेर संपर्क कार्यालय अथवा शाखा कार्यालय सुरु करण्याबाबत विचार सुरु झाला.
सन १ ९६८-६९च्या कालावधीत श्री देवकिसनजी सारडा महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष झाल्यावर आणि त्यानंतर कै पद्मश्री बाबूभाई राठी हे प्रथम उपाध्यक्ष झाल्यावर नाशिक महसूल विभागात व मराठवाडयात चेंबरने आपले पाय घट्ट रोवले. चेंबरचे कार्य उत्तरमहाराष्ट्रात रुजत गेले. याच नाशिकला औद्योगिकरणाचे वारे वाहू लागले होते. नाशिक विभागातून मोठया प्रमाणात व्यापारी व उद्योजक चेंबरचे सभासद झाले. सन १९७१ मध्ये एक मोठी व्यापारी परिषद नाशिकला भरविण्यात आली होती. या परिषदेच्या माध्यमातून व्यापारी वर्गाचे प्रश्न महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून परिणामकारक सोडविले जातील अशा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे केवळ नाशिक जिल्हयातून ७०० हून अधिक सभासद नोंदणी यावेळी झाली. त्याचबरोबर जळगाव , धुळे , अहमदनगर याभातूनही ५०० हून अधिक सभासद नोंदणी झाली. ही संख्या चेंबरच्या एकूण सभासद संख्येच्या ५० टक्के इतकी होती , त्यामुळे स्वतंत्र शाख कार्यालय सुरु करण्याची निकड प्रकर्शाने निर्माण झाली व परिणामी दिनांक २३ मार्च १ ९ ७३ रोजी श्री माधवराव आपटे अध्यक्ष असतांना उत्तर महाराष्ट्र विभागासाठी नाशिकला चेंबरची स्वतंत्र शाखा सुरु झाली. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पुरवठा मंत्री व नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री भाऊसाहेब वर्तक यांचे हस्ते या शाखेचे उद्घाटन संपन्न होऊन शाखेची सुरवात झाली. चेंबरच्या इतीहासातील सुवर्ण अक्षरात नोंदला गेलेला हा क्षण आहे. गेली ४ ९ वर्षे उत्तर महाराष्ट्र विभाग शाखेचे कार्य प्रभावीपणे चालू आहे. हे वर्ष या शाखेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे.
*संघटन शक्ती वाढविण्याचे कार्य* : महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र शाखेने महत्वाचे कार्य केले ते राज्यभर संघटन वाढविण्याचे व्यापारी व उद्योजकांच्या अनेकविध समस्या असतात व अन्यायकारक बाबींचा निपटारा करण्यासाठी सामूहीक प्रयत्नांची गरज असते. त्याकरीता सर्वच पातळीवर संघटन शक्ती निर्माण करुन त्याचे जाळे निर्माण करण्याची गरज असत पायाभूत व महत्वपूर्ण असे हे काम चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र शाखेने आरंभले व आजही ते कार्य जोमाने सर्वत्र चालू आहे. उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर मराठवाडा विभागात प्रमुख बाजारपेठा व औद्योगिक केंद्रे याचे पदाधिकाऱ्यांनी दौरे केले , मेळावे , बैठका , सभा घेतल्या सर्व गाव , तालूका व जिल्हा पातळीवर व्यापारी वउद्योजकांच्या संघटना निर्माण केल्या. यामुळे राज्यभर जाळे निर्माण होवून संघटन निर्माण झाले. यामुळे तालूका पातळीवरही व्यापारी व उद्योजकांच्या मनात महाराष्ट्र चेंबर पोहचले असल्याचे जाणवते. महाराष्ट्रात व्यापारी संघशक्ती उभे करण्याचे कार्यातील चेंबरच्या उत्तरमहाराष्ट्र शाखेचे योगदान मोलाचे आहे.
लढाऊ पवित्रा :
उत्तर महाराष्ट्र शाखा सुरु झाली त्यावेळी कापूस एकाधिकार योजना गाजत होती. तसेच सरकारच्या पुरवठा खात्याच्या धोरणाने सर्व व्यापारी त्रासून गेले होते. त्यामुळे शाखेच्या सुरवातीपासूनच लढाऊ पवित्रा स्विकारावा लागला. त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष श्री माधवराव आपटे यांच्या सडेतोड भुमीकेमुळे चेंबरच्या इतीहासाला एक नवे वळणच होते. त्यानंतर भारत सरकारचे गहू व्यापार राष्ट्रीयकरणाची घोषणा केली. त्यासाठी व्यापारीवर्गाला सोबत घेवून प्रखर विरोध करावा लागला व सरकारला नमते घ्यावे लागले. यावेळी कै पद्मश्री बाबूभाई राठी यांचे नेतृत्वाखाली एक मोर्चा काढण्यात आला होता , चेंबरच्या इतीहासातील हा पहिला मोर्चा होता. अशा प्रकारे सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेवून काम उत्तर महाराष्ट्र शाखेला करावे लागले. त्यानंतरही अनेक आंदोलने राज्यपातळीवरील झालीत परंतू त्यासाठी प्रमुख योगदान हे उत्तर महाराष्ट्र शाखेने दिले आहे.
परिषदा व मेळावे:
व्यापारी व उद्योजकांच्या परिषदा व मेळावे घ्यावेत तर ते चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र शाखेनेच असा नाव लौकीक आज प्राप्त झाला आहे. नेटके संयोजन अभ्यासपूर्ण नोटस , निवेदने समग्र चर्चा , भरगच्च उपस्थिती , परिषदामधील परिणामकारक कामकाज व त्यामधुन झालेली फलश्रृती यामुळे ही ख्याती झाली आहे. ज्या विषयाला हात घातला त्यात यश मिळाले आहे , समस्यांचे निराकरण झाले आहे. विशेष करुन उल्लेख करायचा झाल्यास जकात हटाव आंदोलन , विक्रीकर आंदोलन , भेसळ प्रतिबंधक कायदा , मार्केट अॅक्ट , प्रवेश कर , मुद्रांक शुल्क दरवाढ , विज दरवाढ आंदोलन , सेवाकर , लोकल बॉडी टॅक्स अशा अनेक यशस्वी आंदोलनाचे कार्य हे उत्तर महाराष्ट्र शाखेतूनच चालविण्यात आले , ते यशस्वी झाले आहेत. या शिवाय नाशिक महसूल विभागातील विविध परिषदा , मेळावे यामध्येही चेंबरच्या शाखेने योगदान दिले आहे. गेल्या पाच दशकामध्ये शेकडो मेळावे , बैठका , सभा घेण्यात आल्या आणि व्यापारी वर्गाच्या समस्यांवर उहापोह करुन मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाचे कार्य :
उत्तर महाराष्ट्र शाखेने आपले कार्य वाढवितांना प्रशिक्षणाचे कार्यही हाती घेतले. व्यापारी आणि उद्योजकांस अनेकविध विषयाचे प्रशिक्षण मिळावे म्हणूनही महत्वाचे कार्य केले आहे. ग्रामिण भागात जावून व्यावसायीकांना मराठीतून विविध कायदे , नियम , नविन कल्पना , व्यवस्थापनाचे धडे देण्याचे कार्य सुरु केले. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा , शॉप अॅक्ट , फॅक्टरी अॅक्ट , वजन मापे कायदा , आवेष्टीत वस्तू व नियम विक्रीकर , व्यवसाय कर , मार्केट अॅक्ट , त्याचबरोबर हिशेब कसे लिहावे , व्यवस्थापन यावर प्रशिक्षण वर्ग सर्व राज्यभर घेतले. यामुळे व्यावसायिकांना विविध कायदे , नियम व नविन कल्पना याची माहिती सहजपणे मिळाली. परिस्थितीचा विचार करुन आपण व्यापार व उद्योगात कसे बदल केले पाहिजेत , आपले व्यवस्थापन कसे हवे यावर माहिती मिळाली. त्याचा उपयोग व्यावसायीकांना झाला आहे. केवळ व्यापारावरच अवलंबून न राहता निर्यात कशी करता येईल यासाठीही चेंबरच्या शाखेने सतत प्रयत्न केले. सर्वत्र प्रशिक्षणाच्या माध्यमातून निर्यात वृध्दी मंडळाच्या सहकार्याने सभा , चर्चासत्रे , प्रशिक्षण , फिल्म शो , अशा माध्यमातून माहिती देण्यात आली. परिणामी आज निर्यातदार पुढे येत आहे , याचे श्रेय निश्चितच उत्तर महाराष्ट्र शाखला जाते. हे कार्य केवळ स्थानिक पातळीवर न करता नाशिक , जळगाव , धुळे , अहमदनगर या चार जिल्हयातील तालूका पातळीवर घेण्यात आले. काळानुरूप व्यापारी व उद्योजकांना ज्ञान व माहिती मिळत रहावी यासाठी उत्तर महाराष्ट्र शाखेची सतत धडपड केली आहे.
औद्योगिक विकासासाठी प्रयत्न :
उत्तर महाराष्ट्र विभागात कारखानदारी वाढावी यासाठी नाशिक शाखेने विविध स्तरावर प्रयत्न केले. औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर सातत्याने चर्चा घडवून आणल्या. नाशिक , नगर , जळगाव , धुळे अशा शेती प्रधान जिल्हयामध्ये कृषी उत्पन्नावर आधारीत कारखानदारी वाढावी , नविन उद्योग उभारले जावेत यासाठी उत्तर महाराष्ट्र शाखेतून प्रयत्न केले आहेत. ठिकठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या संघटना कार्य करीत आहेत त्यांच्या सहकार्याने सतत तेथील विकास योजनांचा आणि प्रश्नांचा पाठपुरवा करण्याचे कार्य करण्यात आले. औद्योगिक विकासासाठी रस्ते , वीज , पाणी दळण वळण इत्यादी सोयी व्हाव्यात म्हणून उत्तर महाराष्ट्र शाखेतून प्रयत्न करण्यात आले. नाशिक जिल्हयातील कळवण , सटाणा , मालेगाव , कळवण , येवला , मनमाड , नांदगाव , चांदवड , येवला , इगतपूरी सिन्नर धुळे जिल्हातील शिरपूर , दोंडाईचा , धुळे , जळगाव जिल्हयात जळगाव , चोपडा , भुसावळ , नगर जिल्हयातील संगमनेर , श्रीरामपूर , कोपरगाव याठिकाणी औदयोगिक वसाहतीच्या विकासासाठी व उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले आहेत. आज या सर्व औद्योगिक वसाहतीमधुन लघु व मध्यम उद्योग सुरु आहेत , रोजगार निर्मित झाली आहे औद्योगिक विकास हा उत्तर महाराष्ट्र शाखेच्या विषय पत्रिकेत कायम महत्वाचा विषय असलयाने गेल्या ५ दशकात मोठी झेप घेतली गेली.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्य :
उत्तर महाराष्ट्र विभाग हा प्रामुख्याने कृषी विभाग म्हणून ओळखला जातो. कृषी उत्पादन जास्त झाल्याने व मागणी कमी झाल्यास मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चांगल्या बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात , परदेशी बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात , उत्पादन वाढीसाठी लागणारे नविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी चेंबरच्या नाशिक शाखेच्या माध्यमातून सन २००४ पासून कृषी प्रदर्शने आयोजित केली. यातून परिसंवाद , चर्चा सत्रे , बी २ बी च्या माध्यमातून मालाची विक्री , निर्यातीच्या संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या अपेडा व अन्य कृषी विषयक कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून सातत्याने चर्चासत्रे व मेळाव्याचे आयोजन उत्तर महाराष्ट्र शाखेतून करण्यात आले. यामुळे नाशिकची द्राक्षे , जळगावची केळी , भाजीपाला , धुळे जिल्हयातून सोयाबीन , तेले याची निर्यात होत आहे हे उत्तर महाराष्ट्र शाखेचे यश आहे असे म्हटले तर वागवे ठरु नये.
दळण – वळण विषयक कार्य :
कोणत्याही विकासामध्ये आवश्यक बाब असते दळणवळण साधनांची सुयोग्य आणि गतीमान उपलब्धता रेल्वे , रस्ते , टेलीफोन , हवाई वाहतूक या बाबींसाठी नाशिक शाखेने पुढाकार घेतला , नाशिकला मिळालेली पंचवटी अक्सप्रेस , गोदावरी अक्सप्रेस , नाशिक पुणे अक्सप्रेस , मनमाड – इगतपूरी शटल मुबई – भुसावळ पॅसेंजर आदी सर्व चेंबरच्या शाखेच्या प्रयत्नाचे फळ आहे. या शिवाय नाशिक पुणे सुरत रेल्वे मार्ग , मनमाड इंदोर रेल्वे मार्ग , या चेंबरच्या साततच्या पाठपुराव्याला केंद्र सरकारने मंजूरी देवून प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्याचे काम लवकर सुरु होईल. उत्तर महाराष्ट्रातून देशात सर्वत्र विमान सेवा असावी , तसेच नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर टर्मिनस सुविधा मिळावी हे विषय अजूनही शाखेच्या विषयपत्रिकेतील महत्वाचे विषय आहे.
उल्लेखनीय यश :
१ ९ ७३ मध्ये चेंबरचे शाखा कार्यालय सुरु झाले त्यावेळी आणीबाणीही आली. त्यावेळचे वातावरण अतिशय घुसमट करणारे होते. जीवनावश्यक वस्तू कायद्याने व्यापारी वर्गावर मोठी दहशत निर्माण केली होती. या 1 त्यासोबतच भेसळ प्रतिबंधक कायद्याची अत्यंत तात्रीक पध्दतीने होणारी अंमलबजावणी त्रासदायक ठरली होती. व्यापारी एक पाय दुकानात तर दुसरा पाय तूरंगात अशा पध्दतीने व्यापार करीत होता. अशा परिस्थितीत उत्तर महाराष्ट्र शाखेच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व करून तांत्रीक चुकांसाठी व्यापाऱ्यांना दोषी ठरवू नये यासाठी प्रयत्न केले व त्यास मोठे यश आले. अनेक व्यावसायीकांच्या प्रकरणात शाखेच्या माध्यमातून बाजू मांडल्या आहेत तसेच वकिलांनाही मार्गदर्शन केले आहे. असंख्य व्यावसायीकांना केवळ ताकीद देवून खटले मागे घेतले आहेत. शिवाय मुंबई विक्रीकर कायदा व त्यातील बदल , खुरासणी तेलाचे स्टॅन्डर्ड निश्चित करणे , करी पावडर अन्न धान्यातील किडयांचे नियोजन , प्रायमरी फुडची तरतूद , तेलाच्या डब्यांचा पूर्नवापर , शॉप अॅक्ट कायदा व त्यातील जाचक तरतूदी , अत्यावश्यक कायद्यातील तरतूदी , मार्केट अॅक्ट मधील नियम बजने मापे कायदा , सेवाकराच्या तरतूदी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून व्यापारी व उदयोजकांच्या हिताचे बदल करून घेण्यात यश आले आहे. अत्यावश्यक कायद्यातील तरतूदीमुळे व्यावसायीकांना प्रत्येक वस्तूची विक्री करण्यासाठी त्याचा स्वतंत्र परवाना घ्यावा लागत होता , त्याची पूर्तता करता करता व्यापारी जेरीस येत. चेंबरच्या शाखेच्या माध्यमातून यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सरकारने घावूक व किरकोळ व्यावसायीकांसाठी एकत्रीत परवाना पध्दत सुरु केली त्यामुळे व्यापायाचा त्रास कमी झाला. साठा मर्यादाही वाढवून मिळाल्याने छोटया असंख्य व्यावसायीकांची या परवाना जंजाळातून मुक्तता झाली.
महाराष्ट्र चेंबरची स्थापना झाल्यापासून आज पर्यंत ३ ९ अध्यक्षांनी नेतृत्व केले. मुंबई बाहेरील ११ अध्यक्ष झाले. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील श्री देवकिसनजी सारडा , कै. पद्मश्री बाबूभाई राठी , कै बाबूराव कुलकर्णी , श्री खुशालचंद्र पोद्दार , श्री विक्रम सारडा , श्री हेमंत राठी कै. दिग्विजय कापडीया , श्री संतोष मंडलेचा मराठवाडा विभागातून श्री मानसिंग पवार , श्री रामभाऊ भोगले , तर पश्चिम महाराष्ट्र विभागातून के शिवाजीराव देसाई यांनी अध्यक्षपद भुषविले आहे. चंबरचे कार्य पुढे नेण्यामध्ये सचिवालयातून के रामभाऊ मोहाडीकर व श्री दिलीप साळवेकर यांचे योगदानाचा विशेष उल्लेख करावा लागेल. आज चेंबरचा ४० व्या अध्यक्षपदाचा मान मला मिळाला आहे. मी याप्रसंगी ग्वाही देतो की मी निश्चितच या पदाला न्याय देवून चेंबरचे कार्य देश पातळीवर वाढविण्याचा व चेंबरचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करेल.
उत्तर महाराष्ट्र शाखेचा रोप्य महोत्सव १० जून १ ९९ ८ रोजी तत्कालीन राज्यपाल डॉ पीसी. अॅलेक्झांडर यांचे उपस्थितीत संपन्न झाला होता व सुवर्णमहोत्सव वर्षाची सुरवात राज्यपाल मा. श्री भगतसिंह कोशारी यांचे हस्ते होत आहे.
५० वर्षांचा काळ हा संस्थात्मक जीवनात फार मोठा टप्पा आहे. उत्तर महाराष्ट्र शाखेच्या माध्यमातून व्यापारी व उद्योजकांच्या मनातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी केलेले कार्य , संघटीतपणा वाढविण्यासाठी केलेले कार्य आणि व्यवसाय करणे सुलभ होईल सोडविलेले अनेक प्रश्न असा अनेक बाबींचा आढावा घेतला तर ज्या हेतूने ही शाखा सुरू करण्यात आली तो हेतू सफल झाला आहे. यामागे चेंबरचे सर्व सभासद , सहकार्य करणारे अधिकारी , मार्गदर्शक , उद्योजक व व्यावसायीकांच्या संघटना आणि कार्यकर्ते यांचा मोठा हातभार आहे. सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करून शाखेच्या पुढील वाटचालीस सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो.