आयुर्वेद व्यासपीठ : एक आरोग्य चळवळ
आयुर्वेद हे पाचवा वेद म्हणून भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळविणारे शास्त्र. जनमानसाच्या चित्तात खोलवर रुजलेली अशी ही जीवनशैली आहे. मात्र तिला गेल्या शंभर एक वर्षात ग्रहण लागले ते आधुनिक वैद्यक शास्त्राच्या वेगवान प्रचाराने. हा अंधार नाहीसा करण्याचे आणि पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे भगीरथ कार्य केले आहे — “आयुर्वेद व्यासपीठ” या संस्थेने. सेवा-संशोधन-प्रचार -शिक्षण ही चतु:सूत्री धारण करून गेली तीन दशके संस्था व्यापक आणि समर्पित पद्धतीने कार्य करत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आयुर्वेदाची पुनःप्रतिष्ठा आणि वैद्यांचे निरंतर शिक्षण अशा ध्येयाने कार्य सुरू आहे. त्याला आणखी बळ प्राप्त व्हावे म्हणून नाशिकमध्ये आज संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय – चरक सदन – लोकार्पण करीत आहोत.

(संस्थापक अध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ)
आयुर्वेद क्षेत्रातील वैद्य विनय वेलणकर यांच्या पुढाकाराने १९९७ मध्ये ही संघटना निर्माण झाली. आयुर्वेद क्षेत्रातील काही तरुण वैद्य व काही ज्येष्ठ वैद्य एकत्र आले आणि आयुर्वेद क्षेत्रात काहीतरी भरीव, रचनात्मक, सर्व समाजावर प्रभाव टाकणारे व शास्त्राच्या वृद्धीसाठी हातभार लागेल अशा प्रकारचे काम करण्याचे ठरले. पहिली बैठक वा अभ्यासवर्ग कोयना परिसरातील राममळा या गावी संपन्न झाला. त्यामध्ये वैद्य विनय वेलणकर, वैद्य विजय कुलकर्णी, वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य उपासनी, वैद्य सरदेशमुख इ. प्रमुख वैद्य उपस्थित होते.
आयुर्वेद प्रचार-प्रसार, संशोधन, सेवा शिक्षण या चार गोष्टी समोर ठेऊन काम करण्याचे ठरले. तोपर्यंत समाजातील आयुर्वेदाची स्थिती गंभीर होती. शुद्ध आयुर्वेदीय चिकित्सा करणारे, पंचकर्म चिकित्सा करणारे वैद्य तुरळक प्रमाणात होते. आयुर्वेदाची माहिती समाजात अत्यल्प होती. आयुर्वेदीय महाविद्यालयात चांगले शिक्षण मिळत नव्हते, प्रत्यक्ष रुग्ण चिकित्सा करण्याचा प्रात्यक्षिक अनुभव मिळत नव्हता. त्यामुळे समाजात स्वतःला वैद्य म्हणवून घेणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी होती. अशा सर्व परिस्थितीत आयुर्वेदाच्या जोडीला ॲलोपथी शिकवली जात होती. अशा विपरीत परिस्थितीत आयुर्वेद व्यासपीठाचे काम चालू झाले.
*वैद्य तितुका मेळावावा ।*
*आयुर्वेद मस्तकी धरावा ।*
*अवघा हलकल्लोळ करावा ॥*
या उक्तीप्रमाणे सर्वांचा उत्साह होता आणि आहे. त्यावेळी आपला अनुभव दुसऱ्या वैद्याला सांगणे हे अपवादाने होत असे. त्यामुळे Clinical Meeting (रुग्णचर्चा सत्र) हा कामाचा मूलमंत्र ठरला. याची सुरुवात डोंबिवली पासून झाली. पुढे याचा प्रसार महाराष्ट्रातल्या २५-२६ जिल्ह्यात झाला. आता गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, केरळ, गोवा इत्यादी प्रांतात चालू आहे.
चर्चासत्रामुळे दरमहा विविध जिल्ह्यातील वैद्य एकत्र येऊ लागले. आपले रुग्णानुभव सादर करून त्यावर साधक बाधक चर्चा होऊ लागली. परिणामस्वरूप जवळ जवळ ३ हजार वैद्य दर महिना विविध ठिकाणी एकत्र येऊ लागले.
आयुर्वेदाची चिकित्सा करणार्या वैद्यांची संख्या वाढत गेली. वैद्यांचा आत्मविश्वास वाढला. आयुर्वेदीय औषधांचा खप वाढला, पंचकर्म चिकित्से संदर्भात समाजात जागृती निर्माण झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यभर जवळ जवळ १२५च्या वर परिसंवाद संपन्न झाले. आज आयुर्वेद व्यासपीठाकडे ४५० वैद्यांची यादी उपलब्ध आहे, जे विविध राज्यात जाऊन विविध विषयांवर व्याख्याने देतात. यामध्ये महिला वैद्यांची संख्या सुद्धा उल्लेखनीय आहे.









