त्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न!
त्या दोघींना Olympic ला टेबल टेनिस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. इतकेच नव्हे तर पदक देखील मिळवायचे आहे ! लक्षात घ्या भारताला टेबल टेनिस मध्ये Olympic ला आजपर्यंत एकही पदक मिळालेले नाही आणि तरीही असे आत्मविश्वासपूर्वक विधान त्यांनी केले आहे! त्या दोघी म्हणजे तनिशा कोटेचा आणि सायली वाणी या आता फक्त नाशिकच्याच किंवा महाराष्ट्राच्याच नव्हे भारताचेही उद्याचे आशास्थान होऊ शकतील अशा छोट्या पण कर्तबगारीने मोठ्या टेबल टेनिसपटू होय!
अलीकडेच त्यानी WTT Youth Candidates 2021 स्पर्धेत मस्कत येथे प आशियातील अव्वल अशा खेळाडूशी टक्कर देत उपांत्य फेरीत धडक देउन आपली छाप पाडली आणि त्यामुळे सहाजिकच त्यांना असा आत्मविश्वास मिळाला असावा !दोन वर्षांपूर्वी याच स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळविले होते .
मुख्य म्हणजे कोरोना काळात सुमारे दीड वर्षे खेळायला न मिळूनही त्यांच्या खेळाची धार किंवा आस कमी झाली नाही . मोठे स्वप्न पहाण्याकरिता हीच एक गोष्ट अत्यंत आवश्यक असते आणि त्यांच्यात ती मुबलक प्रमाणात दिसून आली. याचे श्रेय त्या दोघींनी आपले आई वडील आणि प्रशिक्षक जय मोडक यांना खुलेपणाने दिले आहे . त्यांच्या सुदैवाने जय मोडकसारखा तरुण आणि खेळामधील आधुनिक तंत्र आणि मंत्र याची उत्तम जाण असलेला माजी राष्ट्रीय खेळाडू त्यांना प्रशिक्षक लाभला आहे. तो फक्त खेळामधील बारकावेच शिकवत नाही तर एक सर्वांगीण खेळाडू म्हणून त्यांची प्रगती कशी होइल हे बघतो. त्याच्या मार्गदर्शना खाली आत्तापर्यंत या दोघींनी सातत्याने दहा, बारा. पंधरा आणि सतरा या वयो गटातील राज्य आणि राष्ट्रीय विजेतेपद प्राप्त केले आहेत आणि गेल्या २-३ वर्षांपासून भारतातील ranking मध्ये अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे!
सायलीच्या यशाचे रहस्य तिच्या आक्रमक forehand मध्ये आहे शिवाय ती तिच्या racket ला लावलेल्या short pimpled रबरामध्ये आहे आणि ती racket च्या दोन्ही बाजूचा अतिशय बेमालूम उपयोग करून प्रतिस्पर्ध्याला गोंधळात टाकते. तनिशा उत्कृष्ट forehand topspin मारते आणि कमालीची आक्रमक आहे .तिचे reflexes ही अतिशय जलद असतात त्यामुळे समोरील खेळाडूला react करायला संधीच मिळत नाही. या दोघीही सातत्याने आपल्यापेक्षा अव्वल खेळाडूवर मात या गुणांमुळेच करत असाव्यात असे म्हणायला हरकत नाही!
नाशिकचा टेबल टेनिसचा इतिहास पहाता या दोघीं इतके यश विशेषता आंतरराष्ट्रीय पातळीवर अजून तरी कुणाला मिळालेले नाही. त्यांची खरी परीक्षा वरीष्ठ गटात होइल कारण age -group स्पर्धेत चमकदार खेळ करणाऱ्या खेळाडूना अतिशय उच्च दर्जा असलेल्या वरिष्ठ गटात फारशी चमक दाखवता आलेली नाही किंबहुना जास्तीत जास्त खेळाडू या खेळात खूप पैसा नसल्याने किंवा आपली मर्यादा समजून खेळच सोडतात हा इतिहास आणि हे वर्तमानही आहे. मात्र यापेक्षा वेगळे भविष्य निर्माण करणे याना जमेल का हे येणारा काळच ठरवेल! तनिशा Wisdom High शाळेत तर सायली किलबिल शाळेत दहावीत शिकत आहेत आणि खेळाला वेळ मिळावा म्हणून त्यांना commerce ला जायचे आहे!