इंडिया दर्पण विशेष लेखमाला – सुप्रसिद्ध दत्तस्थाने
श्रीपादांचे जन्मस्थानः श्री क्षेत्र पीठापूर
कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारा नंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे.
गुरुदेव दत्तांचे अवतार ” शिवरुप आणि “देवदेवेश्वर “
श्री दत्त नवरात्रोत्सवा निमित्त आपण श्री दत्तात्रेयांनी धारण केलेल्या सोळा अवतारांची महती जाणून घेतो आहोत. आज आपण दत्त गुरुंच्या तेराव्या आणि चौदाव्या अवताराची माहिती घेऊ या. गुरुदेव दत्तात्रेयांच्या तेराव्या अवताराचे नाव आहे शिवरुप ” आणि बाराव्या अवताराचे नाव आहे “देवदेवेश्वर.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभु यांचा तेरावा अवतार शिवगुरु अथवा शिवदत्त या नावाने ओळखला जातो. पिंगळांग नावाचा एक वेद-शास्त्रांमध्ये पारंगत असलेला ब्राह्मण माहूर येथे राहत होता. एकदा त्याने पाहिले की एक तेजस्वी दिगंबर युवक कृष्णाम्लाच्या वृक्षाखाली पाहिला.ते पाहून पिंगळांगाला कळून चुकले की हे तर साक्षात अनसूया नंदन श्री प्रभू दत्तात्रेय आहेत. त्याने विनम्रतेने श्रीगुरूंना वंदन केले आणि आत्मकल्याणासाठी उपदेश करण्याची विनंती केली. हा अवतार सोमवारी, श्रावण शुद्ध अष्टमीला झाला. शिवरूप दत्तात्रेयांना माझ्या शार्दुलांना माझा नमस्कार असो.

मो. ९४२२७६५२२७
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला, शततारका नक्षत्रावर, शुक्रवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस श्रीगुरू, नर्मदा नदीच्या तीरावर माहूरच्या जंगलात “देवदेवेश्वर ” नावाने अवतरीत झाले. ब्रम्हदेवादी सर्व देवता, गौतम ऋषींचे पुत्र शतानंद महर्षी इत्यादी सर्व श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. याकाळात श्रीगुरूंनी नर्मदा नदीमध्ये तसेच आसपासच्या अनेक तीर्थांमध्ये स्नान केले आणि इतर अनेक ऋषी-मुनींना दर्शनही दिले. कृष्णाम्लाच्या वृक्षांनी हा परिसर परिपूर्ण असल्याने या स्थानाला ‘कृष्णाम्लाकी तीर्थ’ असे नाव पडले. कृष्णाम्लाकी तीर्थाच्या परिसरात निवास करणाऱ्या, सर्वांचे कल्याण करणाऱ्या, देवदेवावतार धारण केलेल्या माझ्या श्रीगुरू दत्तात्रेयांना नमस्कार असो.
श्री क्षेत्र पीठापूर
श्री दत्तात्रेयाच्या श्रीपाद अवताराची जन्मकथा
आंध्र प्रदेशात ‘पीठापूर’ गावी एक आपळराजा नावाचा आपस्तंब शाखेचा ब्राह्मण राहत होता. त्याची पतिव्रता भार्या सुमति नित्य अतिथि-पूजा करीत असे. एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्रीदत्तात्रेय अतिथी स्वरूपात आले. ब्राह्मण भोजन झाले नव्हते. त्यावेळी आपळाराजा घरी नव्हते. त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली. भगवान् श्रीदत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे. या प्रसंगानंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले.
तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता गुरू असे केले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. सात वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्यावेळी तो बालक चारही वेद, मीमांसा इ. म्हणू लागला. तो १६ वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ, धर्म आचार इ. शिकवत असे. १६ वर्षानंतर त्याच्या मातापित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजिले. पण पुत्राने पूर्ण नाकारले, उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली. माता – पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरूष आहे. तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले.
पुत्राने देखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधु जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशिर्वाद दिला संततीयुक्त, दीर्घायुषी, मातृ-पितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल. वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल. आपल्या आई-वडिलांना श्रीदत्त-स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पीठापूर सोडले.
हेच पीठापूर श्रीपाद-श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्रीदत्त-महाराज भिक्षेस येतात. तसेच पादगया हे ठिकाणही श्रीक्षेत्र पीठापूर येथे आहे. तेथील मंदिरासमोरच्या तीर्थ कुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे. या क्षेत्रामध्ये स्वत: भगवान शंकर कुक्कुटेश्वराच्या रुपामध्ये आहेत. हे एक शक्तीपीठ आहे.
शक्तीमान व महान असे पीठ
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे. सन १३२० साली श्रीपादांचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी अप्पल्लराजु शर्मा तथा महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला.
साधारणतः सन १९८३ साली पू. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन १९८५ साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले. तसेच सन १९८७ साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली व सन १९८८ साली २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.
जन्मस्थान मंदिर
या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्ती आहेत. या मुर्तींची स्थापना दिनांक ६/२/१९९२ ला झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत.
हे मंदिर पहाटे ५.०० वाजता उघडते व साधारणत सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरूवात केली जाते. दुपारी साधारणत एक ते चारच्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदीर बंद केले जाते. संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदीराभोवती केल्या जातात. पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते. मंदीर लहान असल्यामुळे सध्यातरी राहण्याची व जेवण्याची सोय देवळाजवळच केली जाते. साधारणत रात्री ९.०० वाजता मंदिर बंद होते.
वार्षिक उत्सव
श्रीक्षेत्र पीठापुर येथे १) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जयंती २) श्री दत्तजयंती ३) श्री गुरूद्वादशी ४) श्री कृष्णाष्टमी ५) श्री पू. वासूदेवानंद सरस्वती जयंती ६) गुरूपौर्णिमा हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्री दत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. पीठापुर हे पूर्व काळापासूनच सिध्द क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात.
स्थान माहात्म्य
श्रीपादांची बहीण विद्याधारी, राधा व सुरेखा यांचा विवाह पिठापूर येथे झाला. त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापूरात सवित्रकाठकचयन यज्ञ केला. काशी निवासाचे फळ पिठापूर निवासामध्ये आहे. ज्याला पिठापूर निवासाची इच्छा आहे त्यालाच ही संधी मिळते. पीठापुरला खास पौराणिक महत्त्व आहे. कुक्कुटेश्वर मंदिरासमोर १२१ Χ १२१ फूटाचा पक्का तलाव आहे. येथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते. मंदिराचे आवारात मागील भागात चार हात, तीन शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू श्रीदत्त मंदिर आहे. तेथे एक महाशक्ती-पीठ आहे. हा परिसर ‘पुरुहुत्तिका’ म्हणून प्रसिद्ध आहे.
पीठापूर हे पूर्वकाळापासूनच सिद्धक्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की, सुर्योदय होईपर्यंत उठायचे नाही, मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासुर सकाळ झाली समजून उठला. भगवंतानी त्याचा उद्धार केला ते कुक्कुटेश्वर देवस्थान पिठापूरात आहे. याच परिसरात कालाग्नीशमन दत्तमंदिर आहे. काळ्या पाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते. हे दत्तमंदिर श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते.
श्री दत्त पादुका
पीठापूर आंध्रप्रदेशातील पूर्ण गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतात ५१ शक्तीपिठापैकी मानले जाते. तेथे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. येथील दत्तमंदिरात श्री दत्तगुरु व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या मूर्ती आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका आहेत. भारतात काशी येथे बिंदुमाधव प्रयाग व वेणीमाधव, रामेश्वर येथे सेतुमाधव, त्रिवेत्रम येथे सुंदरमाधव तर पिठापूरमध्ये कुंतीमाधव अशी माधवाची ५ मंदिरे आहेत. पांडवांची माता कुंती हीने माधवाची पूजा केली ते हे स्थान.
श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे. येथे अभिषेक लघुरुद्र करुन आपणास सेवा अर्पण करता येते. सायंकाळी ७ वाजता पालखी सेवा असते. स्नान करुन सोवळे घालून आपणास पादूकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते. संस्थान तर्फे भोजन व चहाची मोफत व्यवस्था आहे. स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे. मंदिरातून सोडून जाताना डोळे अक्षरश: पाणावतात. व श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्र्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतात.
पीठापूरला कसे जावे?
पीठापूर हे आंध्र प्रदेशात आहे. मुंबई-भुवनेश्र्वर कोणार्क एक्सप्रेसने सामलकोट जंक्शन येथे उतरावे. (अंदाजे अंतर १३०० कि.मी) पीठापूर हे रेल्वे स्टेशन आहे. परंतु पॅसेंजर अथवा हैद्राबाद, सिकंदराबाद येथून सुटणाऱ्या काही गाड्या येथे थांबतात. जवळचे रेल्वे स्टेशन काकीनाडा, व थोडे लांबचे विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन आहे. सामलकोट येथे उतरल्यानंतर ऑटोरिक्षा करावी व श्रीपादश्रीवल्लभ महासंस्थान (वेणूगोपाळ मार्ग) येथे जावे. सामलकोट ते पीठापूर फक्त १२ कि.मी आहे. वाहन व्यवस्था भरपूर आहे.
पीठापूर रेल्वे स्टेशनपासून मंदिर ५ मिनिटाच्या अंतरावर आहे. महासंस्थान येथे आधी फोन केल्यास आणि हिंदी, इंग्रजी भाषेतून येण्याबाबत कळवल्यास तेथे राहायला खोल्या मिळतात. गाडी उशिरा पोहोचल्यास रेल्वे वेटींग रूम अथवा लॉजमध्ये राहता येईल. पीठापूर येथील श्रीपाद- श्रीवल्लभ जन्म-स्थानात आरती, अभिषेक, रात्री पालखी सोहळा होतो. दोन्ही वेळा मोफत प्रसादाची सोय आहे. कुक्कुटेश्वर मंदिर, कुंती माधव मंदिर, काकीनाडा समुद्र किनारा, अन्नावरम् (सत्यनारायण मंदिर) जवळच राजमहेंद्री (गोदावरी नदी) या ठिकाणी भेट द्यावी.
संपर्कः श्रीपाद-श्रीवल्लभ महासंस्थान,
जि. पूर्व गोदावरी, आंध्रप्रदेश – ५३३४५०,
फोन – (०८८६९) २५०३००, २५२३००
संदर्भ : पीठापूर महात्म्य, धार्मिक ग्रंथ आणि काही संकेतस्थळे